अमेरिकेत युनूस यांच्याविरोधात निदर्शने

अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांविरोधात बांगलादेशींकडून राजीनाम्याची मागणी

    26-Sep-2024
Total Views |

yunus
 
 
वॉशिंग्टन डीसी: बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारचे प्रमुख असलेल्या मोहम्मद युनूस यांच्याविरोधात अमेरिकेतील बांगलादेशी नागरिकांनी नुकतीच जोरदार निदर्शने केली आहेत. बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात ही निदर्शने करण्यात आली. मोहम्मद युनूस सध्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७९व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या दौर्‍यावर असून, याचवेळी त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्य असलेल्या हॉटेलसमोर ही निदर्शने करण्यात आली आहेत.

“गलिच्छ राजकारणाचा भाग म्हणून युनूस बांगलादेशात सत्ता काबीज करते झाले असून, त्याने बांगलादेशचे काहीही भले होणार नाही,” असे निदर्शनावेळी आंदोलकांनी सांगितले. तसेच “युनूस यांनी हाती घेतलेली सत्ता ही बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असून संयुक्त राष्ट्रसंघाला आम्ही विनंती करतो की, मोहम्मद युनूस हे आम्हा बांगलादेशींचे प्रतिनिधित्व करत नाहीत,” असेही आंदोलकांनी सांगितले. “मोहम्मद युनूस हे जनतेतून निवडून आलेले नेते नाहीत, तर ११७ दशलक्ष नागरिकांनी निवडून दिलेल्या सरकारला उलथवून त्यांनी सत्ता बळकावली आहे,” असा आरोपदेखील निदर्शकांनी केला. बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर अत्याचार आणि अन्याय होत असून त्याप्रकरणी युनूस यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील संतप्त आंदोलकांनी लावून धरली.

दिनांक ८ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी बांगलादेशातील सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या वादावरून वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, सत्तेचा राजीनामा देत बांगलादेश सोडला होता. त्यानंतर काळजीवाहू सरकारच्या मदतीने सत्तेची कमान मोहम्मद युनूस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली होती. या काळात झालेल्या हिंसाचारात २०० हून अधिक बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला होता.

रोहिंग्यांना बांगलादेशात जागा नाही : युनूस
“संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७९व्या महासभेला संबोधित करताना मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशात आता रोहिंग्यांसाठी जागा नसल्याचे सांगितले. बांगलादेशातील रोहिंग्यांची संख्या आता लक्षणीय वाढली असून त्याचा परिणाम बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवर दिसत आहे. परिणामी, बांगलादेशातील रोहिंग्यांना म्यानमारने त्यांच्या मायदेशी घेण्याची तजवीज करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने लक्ष द्यावे,” असे मोहम्मद युनूस यांनी म्हटले आहे.