मुंबई : रितेश देशमुख होस्ट करत असलेला ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. १०० दिवस सुरु राहणारा बिग बॉसचा खेळ यंदा मात्र ७० दिवसांमध्येच संपणार असल्याची घोषणा नुकतीच बिग बॉसने केली. त्यांचा हा निर्णय ऐकताच सदस्यांची चांगलील भांबेरी उडालेली दिसली.
२८ जुलैला घरात एकूण १६ सदस्यांनी प्रवेश घेतला होता. यानंतर वाइल्ड कार्ड म्हणून संग्राम चौगुले यांनी घरात एन्ट्री करत एक वेगळंच वातावरण निर्माण केलं. आत्तापर्यंत ९ सदस्यांनी आतापर्यंत घराचा निरोप घेतला असून वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या सदस्याला गृहीत धरता आता उर्वरित आठ जणांमध्ये आता ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरशीची लढत होणार आहे. त्यामुळे आता घरात पुन्हा नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आहे. मात्र, वारंवार ट्विस्ट देणाऱ्या या सीझनमध्ये आणखी एक ट्विस्ट देत यंदा ‘बिग बॉस’ने कोणताही नॉमिनेशन टास्क न घेता सगळ्या आठ सदस्यांना थेट नॉमिनेट केलं आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन शंभरऐवजी ७० दिवसांमध्ये संपवण्यामागे हिंदी बिग बॉस कारणीभूत ठरल्याच्या चर्चा सुरू आहेत. मेकर्सला दोन्ही ‘बिग बॉस’मध्ये क्लॅश नको असल्यामुळे जर का दोन्ही सीझन एकाच वेळी सुरू राहिले, तर प्रेक्षकवर्गदेखील विभागला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आणि त्याचमुळे मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाला ७० दिवसांत बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.