नवी दिल्ली : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’पुढे गुडघे टेकणारे पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्डमार्शल जनरल असीम मुनीर यांना ‘मास मर्डरर’ असे संबोधून अमेरिकेतील पाक नागरिकांनी त्यांचे अमेरिकेत स्वागत केले आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या अमेरिकेच्या भेटीदरम्यान परदेशातील पाकिस्तानी लोकांनी त्यांच्या विरोधात निदर्शने केली. अमेरिकेतील एका कार्यक्रमात मुनीर यांचे स्वागत होत असताना लोकांनी "पाकिस्तानीओ के कातिल" आणि "इस्लामाबाद के कातिल" असे नारे दिले. मुनीर यांच्या विरोधात झालेल्या निदर्शनांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.
द अलायन्स ऑर्गनायझेशनच्या कार्यकारी संचालक म्हणून स्वतःची ओळख करून देणाऱ्या एक्स वापरकर्त्या नाझिया इम्तियाज हुसेन यांनी पाकिस्तानच्या गुन्हेगारी हुकूमशहा विरोधात निषेध करत असल्याचे म्हटले आहे. एक्सवर व्हिडिओ शेअर करताना हुसेन यांनी लिहिले की, "आम्ही पाकिस्तानच्या गुन्हेगारी हुकूमशहाचा निषेध करण्यासाठी येथे आहोत. फॅसिझमच्या समर्थनार्थ आलेल्या प्रत्येक चोराला लाज वाटते - तुम्ही फक्त लोकशाहीचा विश्वासघात केला नाही, तर लाखो लोकांच्या दुःखावर थुंकलात", असे त्यांनी म्हटले आहे.
मुनीर यांचे समर्थक भारतातही ?
पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांना ट्रम्प प्रशासनाने त्यांच्या मिलिटरी डे परेडसाठी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केल्याची अफवा पसरली होती. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेस पक्षानेही त्या अफवेवरून ‘ऑपरेशन सिंदूर’सह भारताच्या परराष्ट्र धोरणावर टिका केली होती. विशिष्ट इकोसिस्टचीमच त्यासाठी सक्रिय झाल्याचे चित्र होते. त्याचवेळी अमेरिकेत खासगी दौऱ्यावर गेलेल्या मुनीर यांना त्यांच्याच लोकांनी विरोध केला आहे. त्यामुळे राष्ट्रहिताऐवजी राजकारणास महत्त्व देणारे घटक मुनीर यांचे भारतातील समर्थक आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो.