"शिवसेनेच्या जन्मापासूनच ठाकरेंनी..."; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
28-Aug-2024
Total Views |
सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूत्व या दोन विषयांना उदरनिर्वाहाचं साधन बनवलं, असा घणाघात खासदार नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. बुधवारी महाविकास आघाडीकडून राजकोट किल्ल्यावर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप आणि मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यानंतर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली.
नारायण राणे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही घटना अतिशय दुर्दैवी घटना होती. आठ महिन्यांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. ऐन पावळ्यात हवामान खराब असल्याने हा पुतळा कोसळला आहे. हा पुतळा ज्यांनी बांधला त्यांची चौकशी व्हावी आणि नक्की कशामुळे हा पुतळा कोसळला याचं कारण बाहेर आणून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी जनतेची इच्छा आहे. पण निवडणूका समोर असल्याने काही विरोधक याचं भांडवल करत आहेत. या जिल्ह्यात त्यांना भाजपवर टीका करण्यासाठी कोणतंही कारण मिळत नसल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं निमित्त करून ते टीका करत आहेत. आज आलेल्या पुढाऱ्यांपैकी एखादा राष्ट्रपुरुषाचा पुतळा, एखादी शाळा, बालवाडी किंवा धार्मिक स्थळ उभारण्यात एकाचंही योगदान नाही. आमच्या सरकारवर आरोप करण्यापलिकडे त्यांच्याकडे दुसरं कामच नाही," असा टोला त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरे आम्हाला शिवद्रोही म्हणतात. त्यांच्याकडून चांगल्या भाषेची अपेक्षाच नाही. शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूत्व या दोन विषयांना त्यांनी उदरनिर्वाहाचं साधन बनवलं. पण एकतरी पुतळा उभारला का? त्यांनी स्वत:च्या वडिलांचा पुतळाही सरकारच्या खर्चाने उभारला. त्यामुळे त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही," असेही ते म्हणाले.