तेजोमय ‘क्षितिज’

    20-Aug-2024
Total Views | 118
kshitij bhoite


नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनू भाकरपासून सर्व भारतीय नेमबाज खेळाडूंच्या तंदुरुस्तीची काळजी घेत त्यांना मार्गदर्शन करणार्‍या क्षितिज भोईटे याच्याविषयी...

क्षितिज हे भोईटे कुटुंबातील शेंडेफळ. क्षितिज याचे बाबा एका नामांकित विमानसेवा पुरवणार्‍या कंपनीत केबिन क्रू तर आई होमियोपॅथीच्या वैद्य. पण, आई आणि वडील या दोघांनाही प्रचंड खेळाची आवड. वडिलांनी तर कबड्डीमध्ये शिवछत्रपती पुरस्कारही मिळवला, तर क्षितिज यांच्या आईदेखील माहेरी असताना धावणे, खो-खो आणि कबड्डी खेळात सहभागी होत होत्या. क्षितिज लहानपणापासूनच त्याच्या मोठ्या भावाबरोबर अ‍ॅथलेटिकच्या सरावासाठी जात असे. हळूहळू क्षितिजला या खेळाची आवड निर्माण झाली. मग, दादाबरोबर मैदानात जाणारा क्षितिज काही ध्येय घेऊन मैदानात उतरला. वयाच्या अवघ्या सहाव्या-सातव्या वर्षीच क्षितिज राज्यस्तरीय स्पर्धा खेळला आणि त्याने पदकही पटकावले. तसेच वयाच्या 14व्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत, तिथेही चमकदार कामगिरी करत पदकाला गवसणी घातली. क्षितिजला सतत यश मिळत असल्याने प्रशिक्षक, पालक, सहकारी खेळाडू यांच्याकडून प्रोत्साहन मिळू लागले. त्यामुळे क्षितिजला देशासाठी खेळण्याची आणि जिंकण्याची स्वप्ने पडू लागली होती.
 
मात्र, आयुष्य इतके सरळ नसतेच की बघत असलेली सर्व स्वप्ने सहज पूर्ण होतील. क्षितिजच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. आपल्या चमकदार कामगिरीने देशाला गौरव मिळवून देण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या क्षितिजला दुखापतीने गाठले. खरेतर खेळाडूचा खरा मित्र कोण असेल तर दुखापतच. न बोलवता, कोणत्याही मान-अपमानाची तमा न बाळगता खेळाडूच्या आयुष्यात दुखापत येते. तशीच ती दुखापत 2018 साली क्षितिजच्या आयुष्यातदेखील आली. या दुखापतीमुळे क्षितिज दीर्घकाळापर्यंत मैदानापासून दूर राहिला. या काळात क्षितिजने खेळाडूंना दुखापत का होते? त्यातून सावरण्यासाठी खेळाडूने काय केले पाहिजे, याचा सखोल अभ्यास केला आणि त्याचा वापर दैनंदिन आयुष्यात केल्यानंतर तोे पुन्हा एकदा मैदानात उतरला.

मात्र, यावेळी मागच्या वेळेसारखी कामगिरी करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार होती, ती घेण्याची क्षितिजची तयारी होतीही, सोबतीला सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक, कुटुंब आणि सहकारी खेळाडूंचे समर्थनदेखील होते. क्षितिजने पुन्हा मैदानावर विराट कामगिरी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आणि पुन्हा एकदा यश संपादनदेखील केले. गेली 15 वर्षे सातत्याने यश संपादन करणार्‍या क्षितिजने 2020 मध्ये काही विशेष कामगिरी करण्याचे मनाशी निश्चित केले. मात्र, नियतीच्या मनात क्षितिजविषयी काही वेगळेच मनसुबे होते. ‘कोविड’ साथरोगाने जगाला ग्रासले. दुखापतीमुळे आधीच खंड पडलेल्या सरावात अजूनच खंड पडला. अशाचवेळी जीवनातदेखील काही अर्थार्जनाची जाणीव त्याला झाली होती.

त्यावेळी एका परिचिताकडून खेळाडूंची तंंदुुरुस्ती कायम ठेवण्यासाठी प्रशिक्षक असतो, त्यासाठीची एक परीक्षाही असते, अशी माहिती क्षितिजला मिळाली. स्वत:च्या दुखापतीच्या काळात त्याने केलेल्या अभ्यासाची यासाठी मदत झाली. त्यामुळे क्षितिजने अमेरिकेतील ही परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नात तो उत्तीर्णदेखील झाला. जगभरात अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन देशात या परीक्षेच्या प्रमुख संस्था असून, क्षितिजने ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या संस्थेची परीक्षा उत्तीर्ण केली आणि इंग्लंडची परीक्षा देण्याचा विचार तो करत आहे. या परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भारतीय क्रीडा प्राधिकरणाने काढलेल्या तंदुरुस्ती प्रशिक्षक पदासाठी संधी होती. एकूणच आपला अनुभव बघता, किमान कनिष्ट प्रशिक्षक म्हणून तरी संधी मिळेल, अशी आशा क्षितिजला होती. मात्र, प्रत्यक्ष मुलाखतीनंतर त्याची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली.

त्यानंतर क्षितिजला त्रिवेंद्रम येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणात दोन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. तिथे त्याने विविध प्रकारातील खेळाडूंना तंदुरुस्ती आणि शारीरिक क्षमता राखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले. मात्र, त्यानंतर एका खासगी कंपनीत क्षितिजने हीच जबाबदारी स्वीकारली. क्षितिजची कंपनी भारतीय खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे कार्य करते. पॅरिस ऑलिम्पिकच्या आधी भारतीय खेळाडूंनी जिंकलेली 15 पैकी नऊ पदके ही याच कंपनीने सेवा दिलेल्या खेळाडूंची होती, असे क्षितिज सांगतो. याच कंपनीकडून क्षितिजला मुष्टीयोद्ध्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पुण्याला पाठवण्याचे निश्चित झाले. मात्र, अचानक त्यांना दिल्लीमधील नेमबाजी संकुलात, भारतीय नेमबाजांना प्रशिक्षण देण्यासाठी पाठवण्यात आले. गेली तीन-चार वर्षे क्षितिज मनू भाकेर, सरबज्योत सिंग यांसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंना तंदुरुस्ती राखण्यासाठी मार्गदर्शन करत असून, पॅरिस ऑलिम्पिकमध्येही तो भारतीय नेमबाजांबरोबर प्रशिक्षक म्हणून गेला होता.

“मला देशाच्या प्रगतीत योगदान देण्याची इच्छा होती. त्यासाठी मला भारतीय संघाची जर्सी खेळाडू म्हणून अंगावर घालायची होती. मात्र, खेळाडू म्हणून नाही शक्य झाले तरी प्रशिक्षक म्हणून ही जर्सी घालायला मिळाली,” याचा आनंद असल्याचे तो सांगतो. “भारतीय खेळाडू परदेशी खेळाडूंइतकेच प्रतिभावान आहेत. मात्र, प्रत्येक क्षेत्रात लागणारा आदर्श आज त्यांच्याकडे नाही. तो निर्माण झाला की, भारताची पदकांची संख्या आपसूकच वाढेल,” असा विश्वासदेखील क्षितिज व्यक्त करतो. “आपल्या देशात खेळाकडे ज्या दिवशी अभ्यासाइतकेच सन्मानाने पाहिले जाईल, तेव्हा भारताची यशोगाथा ही निश्चितच सोनेरी असेल,” अशा भावना व्यक्त करताना, यासाठी भविष्यात अधिक खेळाडू घडवण्याचा विश्वास क्षितिज व्यक्त करतो. क्षितिज भोईटे याला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!

कौस्तुभ वीरकर 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121