कल्याण ग्रामीणमधील पाणी प्रश्नावर मनसे आमदार आक्रमक

लोकसभेत निवडणूकीपूर्वी जशी जादू दाखविली तिच जादू आत्ता देखील दाखवा

    08-Jul-2024
Total Views |

raju patil
 
 
कल्याण : कल्याण ग्रामीणमधील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. लोकसभा निवडणूकीच्या दोन महिन्या आधी जशी जादू दाखवून पाणी पुरवठा करण्यात आला. तीच जादू आत्ता दाखवा. पाण्याच्या बाबती एमआयडीसी चालूगिरी करीत आहे. अधिवेशन संपल्यावर आम्हालापण काही काम नाही. पाणी प्रश्न सुटला नाही तर एमआयडीसीवर विशाल मोर्चा काढू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनी कडोंमपा आयुक्तांसोबत सोमवारी बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपरोक्त इशारा दिला.
कल्याण ग्रामीणमधील अनेक भागात पाणी टंचाई आहे. एकीकडे मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी आहे. तर दुसरीकडे काही भागात पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. चार दिवसापूर्वी एमआयडीसी निवासी भागातील नागरीकांनी पाणी प्रश्नावर डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात मुलांसोबत ठिय्या मांडला होता. त्यानंतर रिजेन्सी अनंतम या बड्या गृहसंकलतील नागरीकांना पाणी मिळत नसल्याने नागरीकांनी बिल्डरच्या कार्यालयात गोंधळ घातला. त्यावेळी त्यांचे बाऊन्सरसोबत वाद ही झाले. पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे. या प्रश्नाबाबत मनसे आमदार पाटील यांनी अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित केला आहे. सोमवारी मनसे आमदार राजू पाटील यांनी कडोंमपा आयुक्त इंदूराणी जाखड यांच्यासोबत तातडीची बैठक घेतली. लवकरात लवकर ही समस्या सूटली पाहिजे अशी सूचना आयुक्ताना दिले आहेत. आमदार पाटील यांनी सांगितले, माझ्या भागात नेतिवली, पिसवली, दावडी, डोंबिवली जीमखाना या भागात पाणी टंचाई सातत्याने आहे. काही लोक उपोषणाला बसले. काहींनी माेर्चे काढले. अनंतममध्ये पाणी टंचाई आहे. आमचे एकच सांगणे होते. फक्त लोकसभा निवडणूका लागायच्या आधी दाेन महिने जी जादू केली होती. तीच जादू करा. त्या पद्धतीने पाणी आले तरी चालेल. टप्प्या टप्प्याने हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. अनायसे पाणी प्रकल्पाच्या स्वच्छतेसाठी दोन दिवस प्रकल्प बंद ठेवला जाणार आहे. त्यांना आठ दिवसांचा अवधी दिला आहे. आठ दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर एमआयडीसीवर मोर्चा काढणार आहे. याच्यात कडोंमपाकडून काही प्रमाणात हलगर्जीपणा होत असेल. परंतू सगळ्यात जास्त चालूगिरी एमआयडीसी करते. सातत्याने आम्हाला खोटे आकडे द्यायचे. तुम्हाला ८० एमएलडी पाणी येईल. तशी परिस्थिती सध्या काही दिसत नाही. त्यामुळे जनतेचा रोष मुख्यत: एमआयडीसीवर आहे.