ब्रिटनच्या निवडणुकीत 'या' हिंदुद्वेषी नेत्याचा दारुण पराभव; भारतवंशीय सोनिया कुमार यांनी केला पराभव

    05-Jul-2024
Total Views |
 Marco longhi
 
लंडन : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिमांचा पाठिंबा मागणारे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे उमेदवार मार्को लाँगी यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मजूर पक्षातील भारतीय वंशाच्या उमेदवार सोनिया कुमार यांनी त्यांचा पराभव केला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान लाँगी यांनी हिंदू, भाजप, पंतप्रधान मोदी आणि काश्मीर यांच्याबद्दल गरळ ओकून मते मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
 
लाँगी यांनी २०१९ मध्ये ब्रिटनमधील डडले नॉर्थची जागा जिंकली होती आणि २०२४ मध्ये पुन्हा निवडणुकीसाठी उभे होते. लेबर पार्टीने त्यांच्या विरोधात सोनिया कुमार यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत सोनिया कुमार यांना १२,२१५ मते मिळाली तर लाँगी यांना केवळ १०,३१५ मते मिळाली. अशाप्रकारे लाँगी यांचा १९०० मतांनी पराभव झाला.
 
५७ वर्षीय लाँगी यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात काश्मीर मुद्द्यावरून मते मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मार्को लाँगी यांनी १७ जुलै २०२४ रोजी एक पत्र जारी केले होते, या पत्रात त्यांनी हिंदुद्वेष आणि भारतविरोधी प्रचार केला होता. काश्मीरच्या 'स्वातंत्र्या'चा मुद्दा ब्रिटीश संसदेत मांडता यावा म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात राहणाऱ्या मुस्लिमांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.
 
या पत्रात डुडली येथे ब्रिटीश पाकिस्तानी आणि काश्मिरी मुस्लिम मतदारांना संबोधित करताना त्यांनी बकरी ईदला शुभेच्छा दिल्या. या पत्रात लिहिले आहे की, "नरेंद्र मोदींनी नुकतेच स्पष्ट केले आहे की ते काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देणार आहेत, याचा अर्थ काश्मिरींचे सर्व अधिकार पूर्णपणे रद्द केले जातील." २०१९ मध्ये निवडून आल्यावर त्यांनी ब्रिटीश संसदेत काश्मीरच्या मुद्द्यावर सतत बोलले होते, असेही त्यांनी सांगितले.
 
या पत्रात त्यांनी मजूर पक्षाच्या उमेदवार सोनिया कुमार यांचे नाव ठळक अक्षरात वेगळ्या पद्धतीने दाखवले होते. सोनिया यांना मुस्लिमांनी मतदान करू नये म्हणून त्यांची हिंदू ओळख दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पत्रात त्यांनी लिहिले की, “मी हा निर्णय तुमच्यावर सोडतो. जर तुम्ही मला मत दिले तर मी तुम्हाला वचन देतो की मी काश्मीरसाठी माझा आवाज संसदेत उठवेल आणि संसदेत काश्मिरींच्या बाजूने उभे राहण्यात आघाडीवर राहीन.
 
लाँगी यांच्या या प्रचारावार टीका करण्यात आली होती. त्यांच्यावर फुटीचे राजकारण केल्याचा आरोप होता. मजूर पक्षाचे दुसरे उमेदवार राजेश अग्रवाल यांनीही या मुद्द्यावरून लाँगी यांच्यावर टीका केली होती. मात्र, लाँगीने याला मानवाधिकाराचा मुद्दा सांगून खोडून काढण्याचा प्रयत्न केला. डुडली सीट, जिथून लाँगी हरले, तेथे सुमारे ५०% ख्रिश्चन, ६% मुस्लिम आणि २% शीख आहेत. याशिवाय येथील हिंदूंची लोकसंख्या सुमारे १% आहे. अशा परिस्थितीत काश्मीरच्या बहाण्याने मुस्लिमांना वेठीस धरण्याची लाँगीची युक्ती कामी आली नाही.