गुणांवेगळी वृत्ती

    03-Jul-2024
Total Views |
samarth swami shlok


भारतीय तत्त्वज्ञान मानते की, अनेक योनींतून फिरून आल्यावर जीवाला मनुष्यजन्म प्राप्त होतो. त्या जन्मात जीवाला आत्मज्ञान, आपल्या मालकीचे असल्याची जाणीव निर्माण होते. आत्मज्ञान प्राप्तीची संधी या जन्मात हुकली तर आत्मज्ञान, भगवद्प्रेम मिळवण्यासाठी अनेक जन्म वाट पाहावी लागेल, असे संत सांगतात. स्वामींनीही असाच अभिप्राय या श्लोकाच्या ‘जयाचे तया चूकले प्राप्त नाही।’ या ओळीत व्यक्त केला आहे.

समर्थ मागील तीन श्लोकांतून सांगत आले आहेत की, अज्ञानी जीवाच्या अंगी अहंकार, मीपणा, गर्वताठा व देहबुद्धी असल्याने भारतीय संस्कृतीत सांगितलेले जुने ठेवणे, म्हणजे आत्मतत्त्वाचे ब्रह्माचे पुरातन ज्ञान त्या जीवाला कळत नाही. त्या पुरातन ज्ञानाचा ऊहापोह करताना समर्थ मागील श्लोकात म्हणाले की, वस्तुत: हे चैतन्यरूपी ईशतत्व विश्वात सर्वत्र कोंदून भरलेले आहे. विश्वाच्या कणाकणांत ते दाटून भरलेले आहे, तरी दुर्दैवी अज्ञानी जीवाला देहबुद्धी दे. हाहाकार इत्यादी कारणांनी त्याची प्रचीती येत नाही. हे ज्ञान समजायला, तशी ज्ञानोत्सुक बुद्धी निर्माण व्हायला गाठी पुण्य असावे लागते. ते नसल्याने अज्ञानी जीव अज्ञान, अंधकारात जीवन घालवतो आणि दुःखी होतो. अति अहंकाराने व ‘मी देहच’ या भ्रामक देहबुद्धीने समजुतीने विश्वातील विद्यमान असलेल्या पण डोळ्यांनी न दिसणार्‍या चैतन्यशक्तीला तो भास मानून तुच्छ लेखतो. त्याच्या मते माझ्यापेक्षा श्रेष्ठ, हुशार, शक्तिमान दुसरा कोणी नाही. हे त्याचे मत एक भ्रम आहे, हेही त्याला कळत नाही. येथे भक्त प्रल्हादाच्या कथेतील हिरण्यकश्यपूची आठवण येते. अत्यंत गर्विष्ठ दुष्ट हिरण्यकश्यपूचा उल्लेख स्वामींनी मागे श्लोक क्रमांक 96 मध्ये नामस्मरणाच्या संदर्भात कोण आहे, तसेच श्लोक क. 121 मध्ये भगवंताच्या अवतारांच्या संदर्भात केला आहे. प्रल्हादाच्या या पुराणकथेत मोठा अर्थ दडलेला आहे.

दैत्यकुळात जन्मलेला असूनही प्रल्हादाला जन्मत:च विष्णुभक्तीचे आकर्षण होते. तो सतत रामनाम घेत असे. ते सहन न होऊन त्याचा पिता हिरण्यकश्यपू याने त्या लहान वयातील प्रल्हादाचे खूप हाल केले. गर्व मदाने धुंद झाल्याने तो प्रल्हादाला म्हणाला, “तुझा तो भगवंत कणाकणात भरला आहे असे. तू म्हणतोस म्हणजे तो या खांबातही असला पाहिजे.” असे म्हणून त्या खांबाला जोरदार लाथ मारली. त्यावेळी खांबातून भगवंत अक्राळ विक्राळ नृसिंह अवतारात प्रगट आहे आणि त्यांनी हिरण्यकश्यपूचा अंत केला. विश्वात भरलेले ईशतत्व अभाग्याला दिसत नसले, तरी गर्विष्ठ अहंकारी माणसाला, ईशशक्ती प्रकट होऊन त्याचा नाश करते. हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी असलेला पराकोटीचा अहंकार, स्वसामर्थ्यांचा गर्व आणि तमोगुण यामुळे प्रत्यक्ष प्रगट झालेल्या भगवंताला, तो ओळखू शकला नाही आणि त्याने आपल्या हाताने स्वतःचा नाश ओढवून घेतला. हा मोलाचा संदेश या पुराणकथेतून मिळतो. अशारीतीने अज्ञानी, अहंकारी जीव त्रिगुणांच्या फेर्‍यात अडकल्याने आत्मज्ञानाला मुकतो. ईश्वर साक्षात्काराला अपात्र ठरतो. आत्मस्वरूप नित्यप्राप्त असूनही अज्ञानी जीवाला ते ओळखता येत नाही. निजगुणांत गुरफटलेला जीव दुःख भोगत असतो, याच अर्थाचा स्वामींचा पुढील श्लोक आहे...

जयाचें तया चूकलें प्राप्त नाहीं।
गुणें गोविलें जाहलें दुःख देहीं।
गुणावेगळी वृत्ति ते ही वळेना।
जुनें ठेवणें मीपणें आकळेना ॥140॥
व्यवहारात एखादी गोष्ट करायची राहून गेली, आपल्या हातून चुकली किंवा निसटली तर ती संधी पुन्हा मिळेलच, याची खात्री देता येत नाही. तसेच ज्ञान मिळवण्याची संधी मानवी जन्मात शक्य असूनही ती हातून निसटली तर पुन्हा कधी मिळेल तेे सांगता येत नाही. वेळ आणि पाण्यात निर्माण झालेली लाट या दोन क्रिया कुणासाठी न थांबता सतत पुढेच जातात. या अर्थाची एक म्हण आंग्लभाषेत आहे (Time and tide wait for no man). तेव्हा संधी मिळाली की, वेळ न दवडता ती हस्तगत करावी. काळ सतत पुढे जात असतो, तो कुणासाठी थांबत नाही, हा व्यवहारातील नियम आत्मज्ञान प्राप्तीसाठीही लागू आहे. भारतीय तत्त्वज्ञान मानते की, अनेक योनींतून फिरून आल्यावर जीवाला मनुष्यजन्म प्राप्त होतो. त्या जन्मात जीवाला आत्मज्ञान, आपल्या मालकीचे असल्याची जाणीव निर्माण होते. आत्मज्ञान प्राप्तीची संधी या जन्मात हुकली तर आत्मज्ञान, भगवद्प्रेम मिळवण्यासाठी अनेक जन्म वाट पाहावी लागेल, असे संत सांगतात. स्वामींनीही असाच अभिप्राय या श्लोकाच्या ’जयाचे तया चूकले प्राप्त नाही।’ या ओळीत व्यक्त केला आहे. मनुष्य प्राण्याला बुद्धी, विचारशक्ती, विवेकशक्ती प्राप्त असूनही माणूस या पुरातन ज्ञानाला दुरावतो, याचे कारण सांगताना स्वामी स्पष्ट करतात की, माणूस त्रिगुणांत अडकला असल्याने तो दुःख भोगतो. माणसाचे मन सत्त्व, रज, तम या गुणांनी व्यापून टाकल्याने त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात. प्रकृतीत सर्वत्र हे त्रिगुण आढळून येतात.

या विश्वातील प्रत्येक जीव इतरांपेक्षा वेगळा असल्याचे प्रत्ययास येते. तरी, या जीवांच्या ठिकाणी काही सामान्यतत्त्वे असली पाहिजेत, असा विचार करून कपिल महामुनींनी सांख्यांच्या तत्त्वज्ञानात सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांची कल्पना मांडली. मानवाच्या सर्व शारीरिक अथवा मानसिक कृतींचे वर्णन या तीन गुणांत करता येते, व्यक्तिपरत्वे ज्या गुणांचे प्राबल्य असेल, त्यानुसार त्या व्यक्तीचे वर्तन असते. ‘दासबोधा’तील दशक 2 समास 5, 6, 7 यांत त्रिगुणाचे सविस्तर वर्णन आहे. या सत्त्च, रज, तम त्रिगुणांनी प्रकृती बनते. आत्म्याचे गुण प्रकृतीच्या देहाच्या ठिकाणी लावल्याने आणि जीव प्रकृती गुणात बांधली गेल्याने आत्मशक्तीचे मूळ स्वातंत्र्य त्याला समजत नाही. माणसाची वृत्ती या त्रिगुणांत पूर्णपणे अडकली गेल्याने देहाहंकार उत्पन्न होऊन देहापलीकडील आत्मरुप अनुभवता येत नाही. आत्मतत्त्वाच्या पुरातन ज्ञानास (जुने ठेवणे) जीव मुकतो. आपल्या वृत्तीवर त्रिगुणाचा प्रभाव असल्याने गुणावेगळी वृत्ती अनुभवास येत नाही (गुणावेगळी वृत्ति ते ही वेळेना।).

सत्त्वगुण चांगला असला तरी तो चांगुलपणाचा सूक्ष्म अहंकार उत्पन्न करतो. अहंकार, सूक्ष्म का असेना, अध्यात्माला, आत्मज्ञानप्राप्तीला तो बाधक ठरतो. यासंदर्भात रामकृष्ण परमहंस सुंदर कथा सांगत. एक सज्जन माणूस जंगलातून जात असताना त्याला तीन अट्टल चोरांनी अडवले व त्याच्याजवळील सर्व चीज-वस्तू लुबाडून घेतली. या माणसाचे काय करायचे, यावर चोरांमध्ये चर्चा झाली. पहिला चोर म्हणाला, ‘आपण याचे सर्वस्व लुबाडले आहे. आपल्याला याचा काही उपयोग नाही. आपण याला ठार मारून टाकू.’ दुसरा चोर म्हणाला, ‘याला असाच जंगलात सोडून देऊ. तो भटकेल आणि वाघ, सिंह याला खाऊन टाकतील.’ तिसरा चोर म्हणाला, ’आपण सर्व लुबाडल्याने तो निरुपद्रवी झाला आहे. त्याला त्याची बायका, पोरे असतील. आपण याला जंगलातून बाहेर काढून गावाच्या वाटेवर सोडून देऊ.’ यापैकी पहिला चोर तमोगुण, दुसरा रजोगुण आणि तिसरा सत्त्वगुण. सत्त्वगुणी असला तरी तो चोरच. त्याने गावाचा रस्ता दाखवला तरी अगोदर लुटायला मदत केली. तेव्हा आपण या तिन्ही चोरांपासून सावध राहिलो, तरच ईश्वरप्राप्तीच्या गावाला पोहोचता येईल. आत्मज्ञान प्राप्त करून घेता येईल.

सुरेश जाखडी
7738778322