जामीनावर सुटलेले हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री? लवकरच होणार शपथविधी

    03-Jul-2024
Total Views |
hemant soren
रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा सक्रीय झाले आहेत. हेमंत सोरेन यांनी रांचीमध्ये इंडी आघाडीच्या आमदारांची बैठक घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री बनणार आहेत. बैठकीत त्यांची आघाडी पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
 
या घोषणेनंतर ते लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल सीपी राधाकृष्णन सध्या राज्याबाहेर पुद्दुचेरीत आहेत. मात्र, आज संध्याकाळी ते रांचीला येतील. हेमंत सोरेन यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री चंपाई सोरेन, झारखंड काँग्रेसचे प्रभारी गुलाम अहमद मीर आणि प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर हेही उपस्थित आहेत.
  
रांची येथे होणाऱ्या या बैठकीला इंडी आघाडीच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्यास सांगितले होते. चंपाई सोरेन यांनीही सभेचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत हेमंत सोरेन यांची नेतेपदी निवड होण्याची शपथ वर्तवली जात आहे. यानंतर चंपाई सोरेन आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. चंपाई सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर हेमंत सोरेन नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. हेमंत सोरेन यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्यही शपथ घेणार आहेत.