यश-अपयश ही सामूहिक जबाबदारी, आम्ही पराभवाने खचून जाणारे नाहीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    06-Jun-2024
Total Views |

Eknath Shinde 
 
नवी दिल्ली : आपण एक टीम म्हणून काम करतो. त्यामुळे यश अपयश ही सामूहिक जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. "महाराष्ट्रात भाजपला जो पराभव सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी मी स्विकारतो आहे. मला सरकारमधून मोकळं करावं. मला फक्त पक्षाचं काम करायचं आहे," अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पक्ष नेतृत्वाकडे केली. यावर आता मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.
 
लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) बुधवारी दिल्लीत बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "देवेंद्रजींशी माझं बोलणं झालं. आपण एक टीम म्हणून काम करतो त्यामुळे यश अपयश ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही पराभवाने खचून जाणारे कार्यकर्ते नाहीत," असे त्यांना सांगितल्याचे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "या निवडणूकीत विरोधी पक्षांकडून आरक्षण जाणार, संविधान बदलणार असे नरेटिव्ह तयार करण्यात आले. भीती निर्माण करुन त्यांना मतं मिळाली असून त्यांचा संभ्रम नक्की दूर होईल. ज्यांनी हा संभ्रम पसरवला आहे त्यांचे खरे चेहरे लोकांसमोर येतील. आपण एक टीमवर्क म्हणून काम केलं आहे आणि यापुढेही करणार आहोत, असे फडणवीसांना सांगितले असल्याचेही शिंदेंनी सांगितले.