मृत्यूचे रहस्य (भाग-६)

    05-Jun-2024
Total Views |
mystery of death

कल्पना संघात
यावरून हे स्पष्ट आहे की, आपले शारीरिक जीवन म्हणजे एक सुखद कल्पना संघात आहे, तर मरण म्हणजे तसल्याच प्रकारचा एक दुःखद म्हणून भयावह कल्पना संघात आहे. शरीराच्या सर्व क्रिया बंद होण्यालाच आम्ही मृत्यू मानतो. यावरून असा एक प्रश्न उत्पन्न होतो की, मरण आपल्या शरीराचे की कल्पनेचे? योग्य विचार केल्यास असे दिसून येईल की, मरण कल्पनेचेच आहे. मग, ही कल्पना इतकी प्रबल का? त्याचे कारण आमच्यावर होणारे सततचेच संस्कार! संस्कारांचे इतके महत्त्व आहे. सर्व जग संस्कारांचेच अपत्य आहे. सुयोग्य संस्काराद्वारे सुयोग्य अवस्थाप्राप्ती आणि ज्ञानप्राप्ती होऊ शकते. नवीननवीन रसायने आणि औषधे हा असल्याच संस्करण संलग्नता किमयेचा परिपाक होय. जडवस्तू संस्कारित केली जाऊ शकते तर मानव म्हणविणारे आपण स्वत:वर सुयोग्य संस्कार करवून नराचे नारायण होऊ शकणार नाही काय?
 
इच्छा द्वेष सुखं दुखं संघात: चेतना धृति :

श्रीमद्भगवद्गीतेतील वरील श्लोक म्हणजे आजच्या युगातील विज्ञान महर्षी आईनस्टाइन यांचे सापेक्षतावादाचे (ढहशेीू ेष ठशश्ररींर्ळींळीूं) सूत्रमय वर्णन होय. चैतन्यामुळे संघात होतात आणि असल्या चेतना संघाताद्वारे मग नवचैतन्ययुक्त अस्तित्वांची धारणा उत्पन्न होते. असली धारणा सतत संस्कारांच्याद्वारे किंवा मानसिक व्यापारामुळे भासमान झाली म्हणजे स्वशरीराची भावना उत्पन्न होत असते. हा आभास सतत राहणारा असल्यामुळे आपले सततचे बदलते शरीर आपल्याला आपलेच वाटते. एखादी जळती उदबत्ती गोलाकार पद्धतीने अंधारात फिरवली तर जळत्या टोकाचे एक सलग वर्तुळ आपल्याला दिसते. ज्या क्षणी आपण त्या उदबत्तीच्या जळत्या टोकाकडे पाहतो, त्या क्षणी त्या जळत्या उदबत्तीचे टोक त्या भासणार्‍या ज्वलंत वर्तुळावरील सर्वच स्थानी नसते. ते असते केवळ एकाच बिंदूवर. परंतु, आपल्याला ते जळते टोक सर्वच वर्तुळावर का दिसते? याचे कारण आमचा भ्रम! जळत्या उदबत्तीच्या वर्तुळावरील प्रत्येक बिंदूवरील आमची पूर्वस्मृती आम्ही लगेच विसरत नाही.

मागील संस्कार कायम राहतात आणि त्यामुळे आमचे मन मागील आणि चालू जळत्या टोकाचे एक अखंड वर्तुळ तयार करते. त्या जळत्या उदबत्तीचे छायाचित्रण घेतल्यास तिचे जळते टोक त्या चित्रात एकाच स्थानी दिसेल. जळत्या वर्तुळाचे दर्शन भासमान असले, तरी ती एक भासणारी सत्यावस्था आहे. चित्रपट पाहताना आमच्या मनाची अशीच अवस्था असते. मागील चित्रांची स्मृती आणि चालू चित्रांची स्मृती आमच्या मनावर स्मृती राहिल्याने सिनेमाद्वारे एक अखंड चित्रण आम्ही पाहत असतो. वास्तविक, प्रोजेक्टरद्वारे एकेक चित्र सरकत असते, पण पाहणार्‍याला त्या सर्व चित्रांची एक अखंड मालिका दिसून तो एक चलत्चित्रपट आपण जीवनाच्या घटनांप्रमाणे पाहत असतो. तद्वत आपल्या शरीराचे आहे. प्रत्येक क्षणाला शरीरातील अणुपरमाणू बदलांमुळे, श्वासोच्छ्वासामुळे, अन्नग्रहणामुळे, जलग्रहणामुळे, प्रकाशग्रहणामुळे व अशा अनेक जीवनोपयोगी क्रियांद्वारे आपले शरीर सतत बदलत असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक क्षणाला बाहेरील ओतप्रोत आमच्या शरीरात प्रवेश करून आतील जुन्या ओतप्रोतांना बाहेर ढकलत असतात. असे ओतांचे (शश्रशलीीेंपळल) आदानप्रदान सतत चालू असते. परंतु, आमचे शरीर बदलत आहे, असे आम्हाला कधीच वाटत नाही. असे का वाटावे? याचे कारण असे की, त्या बदलत्या शरीरातील स्वरूप व अवस्थांना स्थिर रूपाने धारण करणारे एक स्वतंत्र अस्तित्व आमच्या जडशरीरात विद्यमान आहे. हे स्वतंत्र अस्तित्व म्हणजे आपला संस्कारमय जीवात्मा होय.
 
आपल्या धारणा शक्तीच्याद्वारे जीवात्मा वरील सर्व बदलते क्षण व अस्तित्व धारण करून त्याद्वारे एक अखंड अशी स्मृतिमालिका तयार करतो. या अखंड मालिकेलाच आपण ‘जीवन’ म्हणतो. बौद्ध मतांनुसार, ‘सर्वं क्षणिकं सर्वं चंचलं’ आहे. परंतु, या क्षणिक चंचलतेद्वारे जीवात्म्यावर सतत संस्कार होत असतात आणि ते इतके खोलवर असतात की, तेच आपल्या भावी जीवनाचा पाया बनून व्यक्तीला पुन्हा जन्म घ्यायला लावतात. पुनर्जन्माची अशी तयारी याच जन्माद्वारे होत असते. संस्कारांचे एवढे महत्त्व आहे. प्रकृती म्हणजे संस्कारांचा मनावरील पगडा होय. मन शांत झाल्यास संस्कारच होणार नाहीत आणि संस्कार मंदावल्यास वा मुळीच उत्पन्न न झाल्यास असल्या मानवाला पुनर्जन्म नाही; तो मुक्त आहे. म्हणून, मुक्तीची इच्छा धरून मुक्ती मिळणार नाही. मुक्ती म्हणजे शून्य! यावरून हे सिद्ध होते की, जुने व नवे संस्कार एकत्र जुळवून त्यांची एक अखंड मालिका तयार करणारे एक स्वतंत्र अस्तित्व आपले पूर्व व सद्यःजीवनात विद्यमान असले पाहिजे. या स्वतंत्र अस्तित्वाला आपण ‘जीवात्मा’ असे म्हणतो. भगवद्गीतेत या जीवात्म्याबद्दल भगवंत सांगतात, ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः। मनः षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति॥ अ.१५ श्लोक ७॥
 
मी सर्व जीवसृष्टीत अंशरूपाने राहतो आणि हे माझे जीवात्मक अस्तित्व मन, बुद्धी व पंचज्ञानेंद्रियांद्वारे जड शरीररूप प्रकृतीद्वारे शरीरात आकर्षिले जाते. चंद्र वा मंगळावर अग्निबाण सोडले जातात, ते एकदम सरळच तेथे गमन करीत नाहीत, तर मध्यंतरी अवकाशात अनेक स्थानांवर त्यांच्याचद्वारे घडविले गेलेले जे स्फोट होतात, त्या स्फोटांच्या गतीमुळे ते क्रमश: चंद्र, मंगळावर ढकलले जातात. तद्वत जीवात्म्यावरील संस्कारांचे आहे. पूर्वजन्मातील संस्काराने गतिमान झालेला जीवात्मा जन्म घेतल्यावर इदं शरीराचे ज्ञान क्रमशः प्राप्त करून घेतो आणि इहजन्मात पुन्हा नवीन संस्कारग्रहण करीत जातो. सद्यःसंस्कारामुळे त्याला आणखी नवीन गती प्राप्त होते. अशा तर्‍हेने हे जीवाच्या कर्माचे चक्र म्हणजे जीवनचक्र सतत चालू असते.यावरून आपल्या जडशरीरात संस्कार ग्रहण करणारे आणखी एक सूक्ष्म अस्तित्व असले पाहिजे. आता आपल्याला दोन देह झाले, एक जडशरीर व दुसरा सूक्ष्मदेह. यावरुन हे सिद्ध होते की, आमच्या जडशरीराला मृत्यू आला तरी त्या आत असलेल्या सूक्ष्म सूक्ष्मतर अशा दिव्य अस्तित्वांना मृत्यू नसतो. या सूक्ष्म शरीराला लिंगदेह म्हणतात. या लिंगदेहात प्रकृतीची कारणमीमांसा सांभाळणारा आणखी एक सूक्ष्मतर देह असतो. त्याला ‘कारणदेह’ असे म्हणतात. या कारणदेहाच्या अंतर्गत ज्या मूल महान अवस्थेचे स्फुरण घेऊन जीवात्मा सतत स्पंदन करून कार्यरत असतो, त्या मूलदेहाला ‘महाकारण’देह असे म्हणतात. मन, बुद्धी चित्त, अहंकाराच्या अशा सूक्ष्म-सूक्ष्मतर अवस्था असतात. या सर्वांना सांभाळून जीवनयात्रा चालविणारा जीवात्मा असतो.(क्रमशः)

 
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)