प्रादेशिक पक्ष : लहान तोंडी मोठा घास!

    05-Jun-2024
Total Views |
 Regional Party


देशात आघाडी सरकारचे पर्व पुन्हा आले आहे, असे चित्र दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रथमच स्वत:चे बहुमत मिळाले नसल्याने एनडीए आघाडीतील छोट्या पक्षांना महत्त्व आले आहे. पण, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक प्रस्थापित पक्षांना जनतेने नाकारले असून त्यांच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
 
ओडिशासारख्या राज्यावर गेली 25 वर्षे आपली पोलादी पकड बसविलेल्या बिजू जनता दलाची या निवडणुकीत पुरती धूळदाण उडाली. लोकसभेत या पक्षाला केवळ दोन जागी विजय मिळविता आला. विधानसभेतही भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्याने या पक्षाची इतकेच नव्हे, तर गेली 25 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नवीन पटनाईक हेच विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले! त्यांची खालावलेली प्रकृती पाहता, या पक्षाच्या अस्तित्त्वाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तामिळनाडूतील चित्रपटांप्रमाणे त्या राज्याचे राजकीय जीवनही एकांतिक आहे. त्या राज्याचे राजकारण प्रामुख्याने द्रमुक आणि अण्माद्रमुक या दोन द्रविडी पक्षांभोवती फिरते. तरीही त्या राज्यात व्हीसीके, एमडीएमके वगैरे दोन डझनांहून अधिक छोटे प्रादेशिक पक्ष आहेत. ते सर्व या दोन प्रमुख पक्षांपैकी एकाशी आघाडी करून लोकसभेची एखादी जागा पदरात पाडून घेतात. त्यावेळच्या लाटेनुसार एका पक्षाच्या आघाडीला तेथील मतदार निवडून देतो. त्यात या छोट्या पक्षांनाही लॉटरी लागते. तेथील मतदार एकदा एका आघाडीला, तर दुसर्‍यांदा दुसर्‍या आघाडीला विजयी बनवितो.
 
 ज्याला विजयी बनवितो, त्यालाच बहुतांशी सर्व जागी विजय मिळतो. आताही लोकसभा निवडणुकीत द्रमुकला राज्यातील बहुतांश जागी विजय मिळाला असून, अण्णाद्रमुकला एकाही जागेवर विजय मिळविता आलेला नाही. मुळात जयललिता यांच्या मृत्यूनंतर अण्णाद्रमुक पक्षाचे अस्तित्त्वच अनिश्चित बनले आहे. कारण, जयललिता यांनी आपला वारस नियुक्त न केल्यामुळे पक्षाच्या नेत्यांमध्ये नेतेपदासाठी तीव्र चुरस निर्माण झाली. त्यातून पक्षात फूटही पडली आणि खंबीर नेत्याच्या अभावी हा पक्ष सतत निवडणूक हरत गेला. आता तर त्याला एकाही जागी विजय मिळालेला नाही. नजीकच्या भविष्यकाळातही या पक्षाची स्थिती सुधारण्याची शक्यता नाही. त्यामुळे या पक्षापुढे अस्तित्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. बहुजन समाज पक्ष, म्हणजेच बसपा या पक्षाचेही अस्तित्त्वही तसे अधांतरीच. गेली 10-15 वर्षे हा पक्ष उत्तर प्रदेशात सत्तेवर नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्याने समाजवादी पक्षाबरोबर आघाडी केली होती. त्याचा सर्वाधिक लाभ बसपाला झाला आणि त्या पक्षाचे दहा खासदार निवडून आले होते. पण, राज्यात सत्तेवर नसल्याने या पक्षाला आपले अस्तित्त्व राखणे अवघड बनत चालले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख राष्ट्रव्यापी पक्षांपासून फटकून राहण्याचे पक्षप्रमुख मायावती यांचे धोरण पक्षाच्या जिवावर उठले. कारण, समाजवादी पक्षाप्रमाणेच हा पक्षही प्रामुख्याने उत्तर प्रदेशापुरताच मर्यादित आहे. पण, तेथे विधानसभेत त्याचे अस्तित्त्व नगण्य आहे. त्यामुळे यापुढील काळात या पक्षाचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. देशातील बहुतांशी सर्व कम्युनिस्ट पक्ष नामशेष होत चालले आहेत. प. बंगालमध्ये हा पक्ष तीन दशकांहून अधिक काळ सत्तेत होता. पण, तेथील सत्ता जाताच हा पक्षही आक्रसत गेला. बंगालप्रमाणेच केरळ या राज्यात हा पक्ष आणि त्याचे अनेक छोटेखानी अवतार सत्तेत असले, तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाची पुरती दैना उडाली. गेल्या वेळेप्रमाणेच यंदाही एकाही कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार बंगालमधून जिंकू शकला नाही. तीच गोष्ट केरळची. तेथे डावी आघाडी सत्तेत असली, तरी यंदा लोकसभेत केवळ एक उमेदवार विजयी झाला आहे. देशाच्या अन्य राज्यांमधूनही डावे पक्ष नामशेष होत आहेत. निवडणूक आयोगाने त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. या स्थितीत त्यांना लोकसभा निवडणुकीपासून दूरच ठेवलेले चांगले, असे म्हटले तर वावगे ठरु नये.
 
देशातील सर्वात नवा पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाचीही स्थिती यथातथाच. अरविंद केजरीवाल या एकखांबी तंबूवर हा पक्ष अवलंबून आहे. केजरीवाल यांचेच राजकीय भवितव्य सध्या पणाला लागले आहे. त्यामुळे या पक्षाचे भवितव्य काय, हा प्रश्नच आहे. दिल्ली हा पक्षाचा बालेकिल्ला असून तेथील विधानसभा निवडणुकीत त्याने सलग दोनदा पाशवी बहुमत प्राप्त केले. पण, लोकसभा निवडणुकीत या पक्षाला फारसे यश कधीच मिळाले नव्हते. पूर्वी पंजाबमधून एकमेव खासदार जिंकला होता. मात्र, दिल्ली विधानसभेत पाशवी बहुमत असतानाही लोकसभा निवडणुकीत या पक्षाचा एकही उमेदवार कधी विजयी ठरू शकलेला नाही. आता तर पंजाबसारख्या राज्यात या पक्षाकडे स्पष्ट बहुमत आहे. तरीही तेथून केवळ तीन खासदार या पक्षाला निवडून आणता आले. देशाच्या अन्य राज्यांमध्ये या पक्षाची अनामत रक्कम जप्त होत असते. या सर्व पक्षांप्रमाणेच देशभरात डझनावारी स्थानिक आणि प्रादेशिक स्तरावरील पक्ष आहेत. ते चक्क लोकसभेची निवडणूकही लढवितात.
 
सध्यासारखी स्थिती उत्पन्न झाली की सत्ताधारी पक्षाकडून सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात वाटेल त्या मागण्या आपल्या पदरात पाडून घेतात. कालपासून तेलुगू देसम आणि नीतिशकुमार यांच्या जेडीयू यांच्याबाबतही अशा अफवा उठत आहेत. पूर्वानुभव पाहता त्यात अगदीच तथ्य नसेल, असे म्हणता येणार नाही. पण, राष्ट्रीय पक्ष नसलेल्या पक्षांना लोकसभेची निवडणूक लढविण्याचा अधिकार असावा का, यावर देशात मंथन होण्याची गरज आहे. द्रमुकसारख्या पक्षाचा गुजरातमधील मतदाराशी कोणता समान दुवा आहे? पण, यासारख्या पक्षांमुळे लोकसभा अस्थिर होत असते आणि पूर्ण बहुमताअभावी सत्तारूढ पक्षाला या छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागते. त्या पाठिंब्याची पुरेपूर वसुली या पक्षांकडून केली जाते, जी एकप्रकारे देशाच्या दृष्टीने विघातक आहे. मतदारांनीही लोकसभा निवडणुकीत मतदान करताना या मुद्द्याचा विचार करण्याची गरज आहे.
 
राहुल बोरगांवकर