निवडणूक ही आपापसातील स्पर्धा, ते युद्ध नव्हे : सरसंघचालक

    11-Jun-2024
Total Views |
 
mohan bhagwat
 
मुंबई : नुकत्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि त्यांचे निकालही समोर आले. पुन्हा एनडीए सरकार आले. वास्तविकतः अनेक पक्ष असले की स्पर्धा आलीच. त्यामुळे समाजात असत्य पसरवले जाता कामा नये. प्रत्येक व्यक्तीचे चित्तमानस वेगळे असतेच. अशाने 100 टक्के मत मिळणे कदापि शक्य नाही. निवडणूक ही आपापसातील एक स्पर्धा आहे, ते युद्ध नव्हे. यंदा प्रचारादरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजात अपप्रचार करण्यात आला. त्यात संघालाही ओढले. अशाने देश कसा चालेल. प्रत्येक मर्यादेचं पालन झालंच पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. रा.स्व.संघ नागपूर महानगरचा ’कार्यकर्ता विकास वर्ग- द्वितीय’चा समारोप सोमवार, दि. 10 जून रोजी रेशिमबाग येथे संपन्न झाला. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
 
’भारतासमोरील आव्हानांचा विचार करण्याची गरज’ याचे महत्त्व सांगत सरसंघचालक म्हणाले की, ”एनडीएच्या काळात गेल्या 10 वर्षांत बर्‍याच चांगल्या गोष्टी झाल्या. भारताची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती चांगली झाली. जगात भारताची प्रतिष्ठा वाढली, विश्वातील प्रगत राष्ट्रांनीसुद्धा भारताला सन्मान देण्यास सुरुवात केली. याचा अर्थ आपण आव्हानांपासून मुक्त झालो असे नाही. निवडणुकीच्या काळात जो अतिरेक झाला त्यातून बाहेर येऊन इतर आव्हानांचा विचार करण्याची आता आवश्यकता आहे.” समाज संघटित होणे का महत्त्वाचे आहे याबाबत बोलताना ते म्हणाले, लोकशाहीत समाज राजाला बनवतो आणि समाजच आपली स्थिती प्रस्थापित करत असतो. समाजाने स्वतःला उभं करणं हे सर्वप्रथम आवश्यक आहे.
 
समाज परिवर्तनानेच व्यवस्थेचे परिवर्तन होते. त्यामुळे समाज निर्माणाचं कार्य हाती घ्यायचे आहे. सामाजात एकात्मता, संस्कारांची गरज आहे. आपला समाज विविधतेने परिपूर्ण आहे. संपूर्ण अस्तित्वाच्या विचाराने जीवनकार्य चालवायचे आहे. पैगंबरांचा इस्लाम नेमका काय आहे, ईसा मसीहची इसायत नेमकी काय आहे, याचा विचार करावा लागेल. परमेश्वराने सर्वांना बनवले, त्या सर्वांप्रति आपली भावना काय असली पाहिजे, याचा विचार करावा लागेल. मतं वेगळी असू शकतात, पद्धती वेगळ्या असू शकतात, मात्र आपल्याला देशाला एक मानून, त्याच्याशी आपला भक्तीपूर्ण संबंध स्थापित करून त्याप्रमाणे चालावं लागेल.
 
संपूर्ण समाजाने संघाच्या शाखेत यावं असा आग्रह धरत सरसंघचालकांनी भारतीयांना आवाहन केले. ते म्हणाले, सामाजिक समरसतेचा भाव प्रत्येकाने आपल्या व्यवहारात आणला पाहिजे. पर्यावरण संरक्षणप्रति विचार केला पाहिजे, अनावश्यक खर्च टाळून स्वदेशीचा विचार केला पाहिजे, प्रत्येक नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, घरातले वातावरण सांस्कृतिक बनवण्याचा प्रयास केला पाहिजे. त्याकरीता संपूर्ण समाजाने संघाच्या शाखेत यावं हा संघाचा आग्रह आहे. आपल्या देशाला आपल्या खर्‍या सेवेची आवश्यकता आहे. विश्वालासुद्धा याची आवश्यकता आहे. संपूर्ण विश्वाची सेवा करण्याइतपत भारताला सक्षम करण्यासाठी आधी समाजाला तयार व्हावं लागेल.
 
या वर्गात देशभरातून 936 शिक्षार्थीवर्गात सहभागी झाले. शुक्रवार, दि. 17 मे रोजी डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर संकुलातील महर्षी व्यास सभागृह, रेशीमबाग येथे वर्गाला सुरुवात झाली. समारोपादरम्यान झालेल्या शारीरिक सत्रात नियुद्ध, दंड, समता, घोष, दंड योग, योगासन प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. मणिपूर वर्षभरापासून शांततेची वाट पाहत आहे. गेली दहा वर्षे मणिपूर शांत होते. मात्र त्याठिकाणी जो वाद काहीजणांकडून पेटवण्यात आला, त्यात जळणार्‍या मणिपूरच्या प्रश्नाचा आपल्याला प्राधान्याने विचार करावा लागेल.