"आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी राजकारण..."; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया

    27-May-2025
Total Views |
 
Yogesh Kadam
 
मुंबई : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी कुठल्याही पक्षाशी संबंधित असला तरी राजकारण विरहित त्याच्यावर कारवाई होईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. मंगळवार, २७ मे रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, "वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पहिल्या दिवसापासूनच सरकारने कडक भूमिका घेतली आहे. यातील आरोपी कुठल्याही पक्षाशी संबंधित असला तरी राजकारण विरहित त्याच्यावर कारवाई होईल. त्यामुळे जो कुणी दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. आरोपींना लपवून ठेवण्यात ज्यांनी मदत केली त्यांना अटक करण्यात आली आहे. यावरून पोलिस विभाग कुठलेही राजकारण न करता योग्य कारवाई करते हेच लक्षात येते," असे ते म्हणाले.
 
 
राजकारण करण्याऐवजी मुंबईकरांना मदत करा!
 
"ज्यावेळी मेट्रोचे कंत्राट दिले त्यावेळी उबाठा गट आमच्यासोबत सत्तेतच होते. पावसामुळे एका ठिकाणी अडचण झाली. पण याचा अर्थ संपूर्ण मेट्रो प्रकल्पात भ्रष्टाचार झाला वगैरे असे आरोप बिनबुडाचे आहेत. यावेळी मुंबईकरांना आपल्या मदतीची गरज आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून राजकारण करण्याऐवजी त्यांना मदत केली पाहिजे. त्यांच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही. मेट्रोमुळे मुंबईकर अत्यंत खुश आणि समाधानी असून मुंबईकरांना मेट्रोच्या रुपात आमच्या सरकारने चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे," असेही योगेश कदम म्हणाले.