सावरकरांची चतुरस्त्र कविता

    27-May-2024   
Total Views |

v d savarkar 
 
हिंद सुंदरा, ती वसुंधरा
धन्य प्रसवा ती
संभव दे, उद्भव दे
दे जी अस्फ़ुर्ती
सुजल जला, सुफल फला
रुचिर रस स्रवती
 
सावरकर दीर्घ लिहितात. अवजड लिहितात. पण सुलभ लिहितात. ही त्यांच्या लाडक्या हिंदभूमीला समर्पित कविता. त्यांची लेखणी त्यांच्या स्वप्नांशी, इच्छांशी आणि भावनांशी नेहमीच प्रामाणिक राहिली. स्वातंत्र्यवीरांच्या राजकीय कारकिर्दीइतकीच त्यांची लेखणीही स्फोटक आहे असे मला नेहमीच वाटते. त्यांच्या कित्येक कविता आत्मप्रेरित तर कित्येक आत्मप्रेरणेसाठी लिहिल्या गेलेल्या आहेत.
 
अग्नी जाळी मजसी ना, खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यू पळत सुटतो
 
सावरकरांच्या कवितांचे अर्थ लावावे लागत नाहीत. त्या भाष्य करणाऱ्या आहेत. त्यांची कविता भावनांची, विचारांची उत्कट अभिव्यक्ती असते. त्यांनी अनेक कविता वृत्तात, छंदात लिहिल्या. तरीही मुक्तछंदाचे वैशिष्टय त्यांनीच खुलवले. त्यांचं वैनायक वृत्त एका अर्थी यमक, शब्दांची मर्यादा भेदत मुक्तछंदाच्या जवळ जातं. हे शब्द त्यांच्या मनाच्या आवेगाला चरण/पंक्तींचा बांध घालत नाहीत.. शब्दांचे ओघ कातळांवरून कोसळणाऱ्या जलधारेसारखे शीतल तुषार उडवत उच्छृंखल नदीसारखे वाहून नेतात पार.
 
एकदा काय झाले, तुरुंगात सावरकरांची खोली बदली झाली. रात्री चंद्राची कोर दिसेल अशी खोली मिळाली. आपण चांदोबाचे गाणे रोज रात्री झोपताना ऐकतो ना बालपणी. त्यांच्यासारख्या हळव्या मनाच्या पुरुषाला ते न आठवले तरच विशेष. ते लिहितात,
 
तुरुंगात मी सदा तास, सुखी हरवलो स्वर्गी जसा
सायंकाळी बंद्यांते, कोठड्यांतून कोंडूनी ते
कारचे या अधिकारी, जाती आपुल्या परत घरी
 
असा कांबळ टाकून पहुडलो असताना मला शशिलेख दिसली असे ते म्हणतात. त्या असह्य दुखण्यातूनही बालपणीची रात्र आठवावी तशी ही कविता.
 
सावरकरांच्या गाजलेल्या कविता अनेक आहेत, तरीही 'शत जन्म शोधताना' ही कविता माझी विशेष लाडकी. केवढा उन्माद, उद्विग्नता, हतबलता अगदी ठासून भरल्यासारखी वाटते. सन्यस्तखङग या नाटकातली ही कविता. बुद्ध कालीन नाटक आहे, बुद्धी प्राप्त झाल्यानंतर आपल्या मूलस्थानी कपिलवस्तू येथे येऊन धम्मदीक्षा देतो. साधारण त्याच काळात शक राज्यावर आक्रमण होतं, तेथील बहुतांश जनतेने सन्यास घेतलेला. तेव्हा, राजपुत्र वल्लभ आपल्या पत्नीची, सुलोचनेची परवानगी न घेता लढाईसाठी निघून जातो. हे वृत्त जेव्हा त्याच्या स्त्रीला समजतं तेव्हा तिच्या सखीला उद्देशून जे बोलते त्या ओळी काव्य रूपात आहेत. सावरकरांनी वैनायक वृत्तात बरेच लेखन केले मात्र हे काव्य यमक अलंकारात लिहिले आहे.
 
शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या |
शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या ||
 
यात 'आर्ति' शब्दावर श्लेष आहे. आर्तता आणि आरती असे दोन्ही अर्थ घेऊन कवितेचा अर्थ लावला जाऊ शकतो. आर्त आणि आरती या शब्दांचा परस्परसंबंध असण्याचीही शक्यता नाकारता येत नाहीत. दोन्ही शब्दांची व्युत्पत्ती सापडल्यास ही अडलेली ओळ मोकळी होईल. पण तसाही त्याने काहीही फरक पडत नाही. ओळीतील आर्तता आपल्याला अर्थ न आकळताही भिडते.
पण तरी मला वाटतं सावरकर समजून घ्यायचे तर त्यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित लिहिलेल्या कविता वाचाव्या. स्वतःशी साधलेला संवाद यातून दिसतो. त्यांचे अंतरंग त्यांच्याही नकळत उघड होते. संध्याकाळी रानात चुकलेले कोकरू जेव्हा त्यांना दिसते, तेव्हा त्यांच्या मनात येणाऱ्या प्रत्येक भावनेला त्यांनी कवितेत मांडलंय. त्यानंतर पुढचा २४ तासांचा प्रवास ते सांगतात. कोकराची स्वतःशी तुलना करताना आपली आई गेल्याची आठवण तीव्रतेने होऊन ते त्या मूक कोकराशी काय संवाद साधतात हे वाचणे म्हणजे पर्वणी. त्याला पाहिल्यानंतर त्यांच्या मनात येणारे विचार, घेतलेले निर्णय, त्याच्यासोबतच घरापर्यंतचा प्रवास ते मांडतात.
 
तो दूर दिसतसे कोण । टपतसे क्रूर बघ यवन
गोजिरी कापण्या मान । जाण रे ||
 
भविष्यातील कृष्ण जग न पाहिलेला, केवळ आईच्या सावलीत राहिलेला काही महिन्यांचा भोळा जीव अंधार दाटू लागला तरी तिथेच घुटमळतो, तेव्हा त्याच्या जाणिवा अजून प्रौढ नाहीत हे सांगत त्याला ते आपल्या घरी आणतात. त्याच्या मऊ कुरळ्या केसांचं कौतुक करून झाल्यावर त्याच्यासाठी दूध घेताना या विनायकातील मातृत्व जागृत होतं. हा सशस्त्र क्रांतीचे नारे देणारा, तुरुंगातून आपल्या पत्नीला साश्रू नयनांनी माघारे पाठवणारा पुरुष चक्क आई मनाचा होतो!
 
बघ येथे तुझियासाठी । आणिली दुधाची वाटी
परि थेंब असा ना चाटी । कां बरें ||
तव माता क्षणभर चुकली । म्हणुनि का तनू तव सुकली
माझीही माता नेली । यमकरें ॥
 
तो दूध पीइना झाल्यावर आपल्या मनातील आई गेल्याची सल ते त्या जिवापाशी उघड करतात. आणि मग त्यांच्या शब्दांना जे धुमारे फुटतात त्यात विश्वाचे तत्वज्ञान सामावले आहेसा भास होतो. माया कशी आपल्याला जोखडासारखी बांधून ठेवते हे सांगत ते पुढे म्हणतात,
 
मिथ्या हा सर्व पसारा । हा व्याप नश्वरचि सारा
ममताही करिते मारा । वरति रे ।।
स्वातंत्र्य जयांचे गेलें । परक्यांचे बंदी झाले
त्रिभुवनी सुख न त्यां कसलें । की खरे ।।
 
केवळ आई नाही तर पारतंत्र्याची चाहूल त्या पिल्लाची अशी दशा करते ते पाहून केलेली पुढची पंक्ती तत्कालीन राजकीय स्थितीसही चपखल लागू होते. दुसऱ्या दिवशी ते पिल्लाला आईपाशी घेऊन जातात, तेव्हा त्या मायकोकराचं मिलन कसं सांगतात पहा,
 
हंबरडे ऐकू आले । आनंदसिंधु उसळले
स्तनि शरासारखें घुसलें । किति त्वरें ॥
 
आईचं प्रेम मिळवण्याचा त्याला माहिती असलेला मार्ग म्हणजे तिच्या आचळांतून स्रवणारं, क्षुधेची तृप्ती करणारं ते दूध. त्याच्यासाठी बाणाच्या वेगात ते आईला भिडतं. प्रेम म्हणजे काय? पूर्णत्वासाठी केलेला अट्टाहास. आपल्या स्वार्थासाठी निरभ्र मनाने आपल्यावर प्रेम करणाऱ्या जीवाचा शोषून घेतलेला जीवनरस. प्रेम स्वभावसुलभ आहे. ते घेणार्याइतकाच देणाराही आनंदाने अगदी थिजून जातो. आपल्या शरीरावर आपलं बाळ अवलंबून आहे हे पाहून न जाणो किती सुखी होते ती आई.
 
सावरकर वडील कसे होते? त्यांचं लग्न झाल्यानंतर, प्रथम मिलनानंतर प्राप्त झालेलं पितृत्वाचं सुख. ते लिहितात,
 
परंतु अमुचें अभिनव यौवन, त्यात पितृत्वाचा |
प्रथम समागम, गमुनी लज्जा - विनय मन साचा ||
 
पितृत्वाचा पहिला पुरावा सांगणारा प्रभाकराचा जन्म. सावरकर तुरुंगात असताना जेव्हा ४ वर्षाचं ते बाळ जातं, तेव्हा त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ लिहिलेली ही कविता तशी गाजली. मला अधोरेखित करावीशी वाटते ती या कवितेच्या उत्तरार्धातील ओळ-
 
परि जै वारे क्रुद्ध वर्षती मेघ-शिला-धारा
सुरक्षित न हे गमे गृह सख्या तुझिया आधारा ।
 
निसर्गातील आपदांचा उल्लेख करताना चतुराईने ते तत्कालीन सामाजिक स्थिती निरागस बालकांसाठी किती चुकीची आहे यावर बोट ठेवतात. सुरक्षेच्या दृष्टीने, आधाराच्या दृष्टीने प्रभाकराचे या जगात नसणेच कसे योग्य असे मानून ते स्वतःची समजूत घालताहेतसे वाटते. प्रभाकर आणि त्यांच्या आईच्या नसण्याचे त्यांचे दुःख वेळोवेळी विविध कवितांतून दिसून आले आहे. मात्र ही कविता खास प्रभाकरच्या स्मृतीतच लिहिलेली आहे.
 
पुढे एक एक काम ते हातासरशी सोडवू लागले. स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय सहभाग घेणे पुढील काळात त्यांना शक्य नव्हते. तेव्हा ते आपले दुसरे गुरु आगरकरांच्या मार्गाने गेले. लोकशिक्षण आणि समाज अंतर्बाह्य बदलून भारत एक करण्याच्या मग लागले. रत्नागिरीच्या मंदिरात जेव्हा सर्व जाती धर्माचे लोक दर्शन घेते झाले त्या ओली वाचून सावरकरांना दिलेली श्रद्धांजली पुरी करते. ते म्हणतात,
 
हे सुतक युगांचे सुटले
विधिलिखित विटाळाही फिटले
जन्मांचे भांडण मिटले
शत्रूंचे जाळे तुटले
आम्ही शतकांचे दास , आज सहकारी
आभार जाहले भारी

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.