_202405192144376600_H@@IGHT_392_W@@IDTH_696.jpg)
समाजमाध्यमांवरून काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील फोलपणा उघड केला, म्हणून काँग्रेसचे शासन असणार्या कर्नाटक राज्यातील पोलिसांनी एका तरुणाला गोव्यातील राहत्या घरातून अटक केली आहे. भिकू म्हात्रे नावाने ‘एक्स’ या समाजमध्यमावर हा तरुण खाते चालवित होता. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना, काँग्रेसला हिंदूंकडून संपत्ती काढून घेऊन, मुस्लिमांना वाटायची आहे, अशी पोस्ट त्याने आपल्या समाजमाध्यमावरून केली होती. याबाबत कर्नाटकमधील काँग्रेस कार्यकर्त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे कर्नाटकच्या सायबर क्राईम विभागाने भिकू म्हात्रे नामक एक्स खाते धारकावर भारतीय दंड संहिता ‘कलम १५३ (ए)’ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ‘कलम ६६ (सी)’ नुसार गुन्हे दाखल केले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या मुलाने समाजमाध्यमांवरूनच न्यायाची मागणी केली. या प्रकरणामु़ळे काँग्रेसचा दुतोंडीपणा उघडा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस हिंदू महिलांचे मंगळसूत्रदेखील काढून घेण्याचा विचार करत असल्याची टीका केली होती. तसेच, या देशातील संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क असल्याचे विधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले होते. याच आधारावर भिकू म्हात्रे यांनी ही पोस्ट केली होती. त्यानंतर ती त्यांनी काढूनदेखील टाकली होती. यानंतरदेखील कर्नाटक पोलिसांनी त्यांना अटक केली. तसेच, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये ‘संविधानाचे रक्षण’ या विभागात मनमानी अटकसत्र न करण्याचे वचन दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात मात्र भिन्न परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, याच विभागात काँग्रेसने भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा अधिकार यांच्या संरक्षणाबाबत वचने दिली आहेत. त्यामुळे, भिकू म्हात्रे यांना केलेली अटक ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा काँग्रेसनेच केलेला अपमान आहे, असेच म्हणावे लागेल. कर्नाटकमधील शासनव्यवस्था ही काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील तरतूदींचा पायलट प्रोजे़क्ट आहे. पण, साध्या एका टीकेवरून, सर्वसामान्य भारतीयाला काँग्रेसशासित राज्यात तुरुंगवास भोगावा लागत असेल, तर आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत, ही शुद्ध लोणकढी थापच म्हणावी लागेल.
अवघड जागेचे दुखणे
क़ाँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये शनिवार, दि. १८ मे रोजी एक प्रचारयात्रा काढली होती. या प्रचारयात्रेदरम्यान राहुल गांधींच्या उपस्थितीऐवजी निवडणूक प्रचारासाठी जामिनावर बाहेर आलेले, दिल्ली दारू घोटाळ्यातील मुख्य आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या अनुपस्थितीची चर्चाच अधिक रंगली होती. आम आदमी पक्ष क़ाँग्रेसबरोबर ‘इंडी’ नामक आघाडीत सहभागी झाला असल्याने, दिल्लीत असणार्या या प्रचारयात्रेत, दिल्लीमधील एक प्रमुख नेता, म्हणून त्यांचे तिथे असणे आवश्यक होते. पण, अरविंद केजरीवाल यांची असणारी अनुपस्थिती त्यांच्या कार्यकर्त्यांचा अधिक त्यांच्या असलेल्या मतदारांचा संभ्रम वाढवित आहे. निवडणुकीच्या प्रचारात ‘इंडी’ आघाडी जरी स्थापन झाली असली, तरी फार क्वचितन वेळाच ‘इंडी’ आघाडीतील घटक पक्षांनी सुरुवातीच्या तीन-चार टप्प्यांच्या मतदानात संघटित प्रचार केला. नाहीतर, आघाडीचा प्रचार स्वतंत्रपणेच सुरु होता. उत्तर प्रदेशात गेले काही दिवस समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी अमेठी आणि रायबरेली इथे प्रचार केला आहे.त्यातच, आम आदमी पक्षाच्या विभव कुमार याला राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल हिला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे, या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी आणि जो दोषी आहे, त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी दिल्ली काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच, पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधिरंजन चौधरी यांनीदेखील या प्रकरणावर भाष्य करताना, महिलांबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून, महिलांबाबत असे प्रकार काँग्रेस सहन करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षामुळे ‘इंडी’ आघाडीच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत हे खरे. आम आदमी पक्षाच्या ‘इंडी’ आघाडीत असण्याने, या आघाडीतील सर्वच नेत्यांना भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचार या प्रश्नांना तोंड देताना नाकी नऊ आले आहेत. त्यामुळे, अरविंद केजरीवाल हे ‘इंडी’ आघाडीसाठी अवघड जागेचे दुखणे होऊन बसले आहेत. धड सहनही होत नाही, आणि सांगताही येत नाही, अशी आघाडीतील नेत्यांची अवस्था झाल्याने ते हा विषय टाळतानाच दिसत आहेत.
-कौस्तुभ वीरकर