निवडणुकीचा ‘डिजिटल’ महोत्सव

    18-May-2024
Total Views |
 Ballot Paper to EVM Voting


देशाच्या डिजिटल क्रांतीचा प्रत्यय राजकीय पक्ष आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेत यंदाही प्रकर्षाने दिसून आला. सोशल मीडियावरील प्रचारापासून ते अगदी ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या डिजिटल प्रचारानेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले. केंद्रीय निवडणूक आयोगानेही काळाची पावले ओळखत, ‘सी व्हिजिल’, सक्षम, केवायसी, ‘व्होटर हेल्पलाईन’सारखे अनेक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सदेखील मतदारांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. त्यानिमित्ताने निवडणुकीच्या या ‘डिजिटल’ महोत्सवाचे असेच काही पैलू उलगडणारा हा लेख...

लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग, मतदानाची टक्केवारी वाढावी व उत्साह वाढावा, याकरिता निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीला देशाच्या सर्वात मोठ्या महोत्सवाचे स्वरूप दिले आहे. मतदान प्रक्रियेत अधिक सुविधा यावी, पारदर्शकता वाढावी म्हणून बॅलेट पेपरपासून ईव्हीएमपर्यंतचा हा प्रवासदेखील आपण बघत आलो आहोत, ज्यामध्ये आधुनिकतेची व तंत्रज्ञानाही जोड देण्यात आली. आयोगाचे ‘सी व्हिजिल’, सक्षम, केवायसी, ‘व्होटर हेल्पलाईन’सारखे अनेक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सदेखील मतदारांना अनेक सोयीसुविधा पुरवत आहेत. तंत्रज्ञानामुळे होणारे हे बदल प्रचारातदेखील परिवर्तनीय बदल घडवत आहेत. अगदी नवमतदार नोंदणीची प्रक्रिया, नावात/पत्त्यात बदल या सारख्या सुविधादेखील ऑनलाईन उपलब्ध आहेत.
 
नागरिकांचे सक्षमीकरण व देशात पारदर्शकता आणण्याकरिता केंद्र सरकारने २०१५ साली ’डिजिटल इंडिया’ व २०१४ साली स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरिता ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाच्या योजना आणल्या. या योजनांमुळे अधिकाधिक लोकांना इंटरनेटची सुविधा, फाईव्ह-जी ची गती व ‘मेक इन इंडिया’मुळे माफक दरात स्मार्टफोनची उपलब्धता, या सर्वांमुळे इंटरनेट व पर्यायाने सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. भारतात आजच्या घडीला ८२ कोटी इंटरनेट वापरकर्ते असून, यातील अर्ध्याहून अधिक वापरकर्ते हे ग्रामीण भागातील आहेत. म्हणजेच, तंत्रज्ञानाची जिथे खरी आवश्यकता होती, ती तिथंपर्यंत पोहोचली, असं म्हणायला हरकत नाही.
 
निवडणूक आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज भारतात साधारण ९७ कोटी नोंदणीकृत मतदार आहेत आणि उपलब्ध माहितीनुसार, ८२ कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. म्हणजेच देशाच्या लोकसंख्येच्या ७० टक्के नागरिक हे इंटरनेटचे सक्रिय वापरकर्ते आहेत, जे स्मार्टफोन, संगणक, टॅब व आयपॅडसारख्या विविध उपकरणांवर उपलब्ध आहेत. इंटरनेट व स्मार्टफोनच्या सहज उपलब्धतेमुळे सोशल मीडिया वापरकर्तेदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. सोशल मीडिया वापरकर्त्यांची भारतातील संख्या ही ७५ कोटी आहे, जी मतदारसंख्येच्या ७७ टक्के आहे. भारताची लोकसंख्या व उपलब्ध पायाभूत सुविधांमुळे भारत हा सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्ये जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. या बाबतीत अमेरिकेसारखा प्रगत देशदेखील तिसर्‍या क्रमांकावर आहे.
 
गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३७ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकांमध्ये विजेता पक्ष ठरण्यासाठीदेखील साधारण ३७ टक्के किंवा आसपास मतदानाची टक्केवारी हवी आहे, असे गृहीत धरल्यास ३६ कोटी मतदान हवे आहे आणि हे मिळवण्यासाठी ७५ कोटी लोकसंख्या सोशल मीडियावर उपलब्ध आहे. भारताच्या ७५ कोटी सोशल मीडिया वापरकर्त्यांपैकी १८ वयोगटाखालील २० टक्के तरुण असतील व उर्वरित २० टक्के लोक मतदार म्हणून नोंदणीकृत नसतील, असे जरी गृहीत धरले, तरीही ४५ कोटी मतदार सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. या ४५ कोटी मतदार असलेल्या लोकसंख्येला राजकीय पक्षांनी जर शास्त्रोक्त पद्धतीने संपर्क साधला, आश्वासक संदेश पोहोचवला तरीही खूप मोठे यश मिळवणे शक्य आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्ष, उमेदवार यांचा प्रचार हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत.
 
 
निवडणुकीदरम्यान वर्तमानपत्रे, होर्डिंग्ज, टीव्ही किंवा रेडिओ यांसारख्या जाहिरात माध्यमांपेक्षा सोशल मीडिया अधिक प्रभावी अस्त्र बनले आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार, भारतात सर्वसाधारण व्यक्ती दररोज १४५ मिनिटं वेगवेगळ्या सोशल मीडियावर घालवते. यामध्ये प्रामुख्याने इन्स्टाग्राम, फेसबुक, यू-ट्युब, ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅपसारखे विविध व्यासपीठे आहेत. या सर्व माध्यमांवर पक्षाचे, नेत्यांचे स्वतःचे खाते आहेत, जे या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींकडून चालवले जाते. गेल्या तीन महिन्यांमध्ये प्रमुख पक्षांनी केलेल्या खर्चाचा आकडा बर्‍यापैकी मोठा आहे. गुगल, फेसबुक, इन्स्टाग्रामवर भाजपने रु. १०० कोटी, काँग्रेसने रु. ४९ कोटी, वायएसआर काँग्रेस रु. सहा कोटी, बिजू जनता दल रु. ३.६ कोटी, टीडीपी रु. २.६ कोटी खर्च केले आहेत. महाराष्ट्रातील दोन्ही राष्ट्रवादी व दोन्ही शिवसेना पक्षांचा खर्च मात्र नगण्य आहे.
 
 
ट्रेंडिंग गाणी व व्हिडिओज
 
मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून आकर्षक गाणी व व्हिडिओनिर्मितीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. भाजपच्या गाण्यांमध्ये प्रामुख्याने पंतप्रधान मोदींचा वापर, राम मंदिर, आंतरराष्ट्रीय नेत्यांशी संबंध यांसारख्या गोष्टी असून यामध्ये ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’ किंवा ‘मोदी की गॅरेंटी’सारख्या टॅग लाईन्स प्रामुख्याने वापरल्या जातात. काँग्रेसच्या गाण्यांमध्ये किंवा व्हिडिओमध्ये राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा, इंदिरा गांधी, नेहरूंचा वापर केला असून ‘राहुल गांधी हू मै, नेता नही देश का बेटा बनके आऊंगा’ किंवा ‘हात बदलेगा हालात’ या टॅग लाईन्स वापरल्या आहेत. हे सर्व व्हिडिओ, गाणी यू-ट्युबवरून प्रसारित केली जातात, ज्यामध्ये काँग्रेसकडे ४७ लाख वापरकर्ते, तर भाजपाकडे ५९ लाख वापरकर्ते आहेत.
 
 
इन्स्टाग्राम ट्रेंडर्स
 
इन्स्टाग्रामवर ग्लॅमर आणि शॉर्टरील्स डिमांडमध्ये आहेत. लोकसभा उमेदवार सिनेअभिनेत्री कंगना राणावत हिचे आकर्षक व्हिडिओ व हैदराबादच्या भाजपच्या उमेदवार, डॉक्टर माधवी लता यांची आक्रमक भाषणे इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंग आहेत.

 
सोशल इन्फ्लुएन्सर्सची वाढती मागणी
 
सोशल मीडियाद्वारे स्वतःची कला, कौशल्ये, बोलण्याची वेगळी लकब यांचा वापर करून पर्यटन, संस्कृती, कृषी, खाद्यपदार्थ अशा विविध विषयांवर मनोरंजक पद्धतीने काम करणार्‍या व्यक्ती ज्यांना मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फॉलोवर्स आहेत व ज्यांच्या शब्दांना वजन आहे, अशा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशा इन्फ्लुएन्सर्सना मुलाखत देऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता उमेदवार इच्छुक दिसत आहेत.
 
निवडणूक आयोग
 
डिजिटलाईज झालेल्या या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगदेखील अग्रेसर आहे. मतदारांच्या सोयीसाठी अनेक नवनवे मोबाईल अ‍ॅप्स लाँच केले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. निवडणूक आयोगाचे सर्व सोशल मीडिया हँडल्सदेखील अद्ययावत व सक्रिय आहेत आणि केंद्राप्रमाणेच प्रत्येक राज्याचे सोशल मीडिया हँडल्सदेखील अद्ययावत व सक्रिय असल्याचे दिसून येते. आयोगाची ‘१९५०’ सारखी हेल्पलाईन मतदारांच्या मदतीची ठरत आहे, तंत्रज्ञाचा हा वापर निवडणुकीच्या टक्केवारीत नक्कीच सक्रिय मदत करणारा ठरेल.
 
सोशल मीडियावरची रणधुमाळी
 
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मतदार असल्याने मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना संदेश देण्याकरिता प्रचंड चढाओढ सुरू आहे. राजकीय जाहिरातीमध्ये संदेश आणि संदेश देणारा (मेसेज व मेसेंजर) या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याने राज्यातील, देशातील प्रमुख नेत्यांवर प्रचाराची मोठी ‘डिजिटल’ जबाबदारी आहे. ज्या नेत्यांचे सोशल मीडियावर जेवढे अधिक फॉलोवर्स तेवढी जास्त परिणामकारकता व व्हर्च्युअल संपर्क असल्याने ही मंडळीदेखील अधिक परिणामकारकपणे प्रचारात आघाडीवर आहे. केवळ देशातच नव्हे जगभरात ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सगळ्याच सोशल मीडिया हॅण्डल्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. राज्याच्या बाबतीत सगळ्याच सोशल मीडियावर, प्लॅटफॉर्मवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथम क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे, देशात म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या बरोबरीचे इतर विरोधक किंवा समर्थक तसेच देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील विरोधक किंवा समर्थक नेत्यांपेक्षा ते अर्ध्याहून अधिक फरकाने फॉलोवर्स संख्येत पुढे आहेत.
 
राष्ट्रीय नेते आणि सोशल मीडियावरील फॉलोवर्सची संख्या
राष्ट्रीय नेते ट्विटर फेसबुक इन्स्टाग्राम व्हॉट्सअ‍ॅप

महाराष्ट्राचे प्रमुख राजकीय नेते
नेते फेसबुक ट्विटर इन्स्टाग्राम व्हॉट्सअ‍ॅप चॅनल
 
मुंबई-ठाण्यात काय आहे परिस्थिती?
 
सगळ्या देशाचे लक्ष असलेल्या मुंबई आणि ठाण्याच्या निवडणुका पाचव्या टप्प्यात येत्या २० मे रोजी होत आहेत. देशाची आर्थिक राजधानी, बॉलिवूड, मोठ्या प्रमाणात इन्फ्लुएन्सर्स असलेलं महानगर किंवा राज्याची राजधानी अशा अनेक गोष्टींची बिरुदं असलेली मुंबई निवडणुकांमध्येही वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे. देशातील सर्वात कमी प्रमाणात मतदान होणार्‍या शहरांमध्ये मुंबई प्रामुख्याने आहे. मुंबईतील अनेक प्रमुख नेते सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या वक्तव्याची नोंद प्रामुख्याने माध्यमांद्वारे घेतली जाते, त्यामुळे मुंबईतील नेत्यांसाठी सोशल मीडिया अधिक महत्त्वाचा आहे.
 
डिजिटल आव्हाने
 
जेवढ्या मोठ्या संख्येने कोट्यवधी भारतीय लोक सोशल मीडियाचे वापरकर्ते आहेत, त्याप्रमाणात अपेक्षित समजूतदारपणा फारच कमी प्रमाणात दिसून येतो. विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे असल्याचा गैरफायदा बर्‍याचदा घेताना दिसून येतो. आपल्याला एखाद्या व्यक्तीचे विचार न पटल्यास थेट शिवराळ भाषेत बोलणे अतिशय सर्रासपणे सुरु असते. मग यामध्ये समोर स्त्री आहे किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा कोणाचा सामाजिक सन्मान, खासगी आयुष्याची जाण ठेवायला हवी का, यांसारख्या गोष्टी पूर्णपणे दुर्लक्षित आहेत. मानवी स्वभाव दोषांव्यतिरिक्त, तंत्रज्ञानाच्या साह्याने डिजिटल मीडियावर फसवाफसवीची अनेक उदाहरणे आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डीप फेकच्या वापराने गैरफायदा घेणे, तंत्रज्ञाच्या जोरावर एखाद्याचे खाते हॅक करणे असे गंभीर प्रश्न आज तंत्रज्ञामुळे उभे आहेत. दिवसेंदिवस ही आव्हाने वाढत असून, त्यावर नियंत्रण ठेवणे खूप जिकिरीचे होत आहे.

 
प्रसाद कुलकर्णी
(लेखक सोशल मीडिया तज्ज्ञ आहेत.)