देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे

‘रामचंद्र प्रतिष्ठान डॉ. आचार्य अविनाशी सेवा’ पुरस्काराने सन्मानित

    14-May-2024
Total Views |
 Ramchandra Pratishthan

दादरची ‘रामचंद्र प्रतिष्ठान’ ही संस्था कारागृहातील बंदिवानांसाठी काम करते. जळगावच्या ‘कोशवस्मृती सेवा संस्था समुहा’ने ‘रामचंद्र प्रतिष्ठान’सह आणखी दोन संस्थाना ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा’ पुरस्काराने सन्मानित केलेे. त्या निमित्ताने ‘रामचंद्र प्रतिष्ठान’च्या आगळ्या वेगळया कार्याचा इथे आढावा घेण्यात आला आहे
 
जळगावचे संभाजी महाराज नाट्यगृह रसिकांनी तुडुंब भरले होते. निमित्त होते, जळगावच्या ‘केशवस्मृती सेवा संस्था समूह’ व ‘जळगाव जनता सहकारी बँक लि.’तर्फे ९व्या ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा’ पुरस्काराचे वितरण! महाराष्ट्रातील सेवाभावी संस्था व व्यक्ती यांच्या कार्याची दखल घेऊन दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यासाठी स्वतःहून अर्ज करावा लागत नाही, तर तज्ज्ञ समितीमार्फत सर्व प्रकारची चौकशी आणि शहानिशा करूनच व्यक्ती आणि संस्था यांची निवड केली जाते, हे विशेष!या वर्षी महाराष्ट्रातील तीन संस्थांचा गौरव करण्यात आला. तीनही संस्था वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत. ग्रामीण तंत्रज्ञानाची कास धरून रोजगारनिर्मितीसाठी सृजनशील प्रयत्न करणारी अभिनव संस्था‘ विज्ञान आश्रम’ (पाबळ पुणे.) दुसर्‍या-ग्रामविकास आणि जलसंवर्धनासाठी भगीरथ प्रयत्न करणारी आणि जनसामान्यांना दिलासा देणारी संस्था ‘दिलासा संस्था’, (यवतमाळ, घाटंजी) आणि बंदिवानांचे जीवन फुलवून, त्यांच्यात सामाजिक संवेदना निर्माण करण्यासाठी समर्पित असलेली संस्था-‘रामचंद्र प्रतिष्ठान’ (दादर, मुंबई).
 
पुरस्काराचे हे नववे वर्ष! आजवर आठ वर्षांत संस्थेने पुढील प्रकारे कामाला गौरवांकित केले आहे. यातील काही घरातून पळून आलेल्या, अडचणीत असलेल्या मुलांना त्यांच्या घरी पोहोचविण्याचे काम ‘समतोल फाउंडेशन’ च्या माध्यमातून करणारे विजय जाधव,देहविक्रय करणार्‍या महिला व त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणारी संस्था स्नेहालय-अहमदनगर (२०१२-१३) गरीब, गरजूंना मदत करणारे जामनेरचे रामेश्वर नाईक! तसेच मतिमंद, बहुविकलांग मुलांसाठी काम करणारी उमेद परिवार, पुणे ही संस्था! (२०१३-१४) महिला सबलीकरणासाठी ध्येयासक्त‘अहिल्याबाई महिला मंडळ’, रायगड आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलामुलींच्या पुनर्वसनाचे काम करणारी यवतमाळ येथील दीनदयाळ बहुद्देशीय प्रसारक मंडळ संस्था.भिक्षेकर्‍यांसाठी मोफत वैद्यकीय उपचार करणारे डॉ. अभिजित सोनावणे, पुणे असे काही मानकरी होत.
 
पुरस्कार प्रदान करणार्‍या ’केशवस्मृती प्रतिष्ठान’ संस्थेची माहिती इथे देणे क्रमप्राप्त आहे. जळगावची ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ ही सेवासंस्था समूह ‘सं गच्छध्वं सं वदध्वं’ या ध्येयाने प्रेरित असून सामाजिक अशासकीय संस्था आहे. दादा आचार्य यांच्या प्रेरणेतून जन्माला आलेली संस्था. ते म्हणत असत, समाजावर आईसारखे निःस्वार्थ प्रेम करा, सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे चला. यानुसार समाजाच्या विविध घटकांमध्ये कार्य चालू आहे. तर पुरस्कार प्राप्त संस्थाना ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’चे कार्य जवळून पाहता आले. जळगाव जनता सहकारी बँक/क्षुधा शांती झुणका भाकर केंद्र/प.पू. गोळवलकर रक्तपेढी/विवेकानंद प्रतिष्ठान गुरुकुल/आश्रय -माझे घर (बुद्धिबाधितांसाठी आजन्म आधार/कर्णबधिरांसाठी शाळा/मातोश्री आनंदाश्रम हा वृद्धाश्रम अशा संस्थांची प्रत्यक्ष माहिती मिळाली.
 
क्षुधाशांती केंद्रात रोज अंदाजे १७ हजार तरी भाकर्‍या बनवून समाजातील तळागाळातील लोकांच्या पोटाची स्वस्तात सोय केली जाते. शिवाय वादळ, अपघात, कोरोना अशा नैसर्गिक आपद्ग्रस्तांना साहाय्य केले जाते. रक्तपेढीत तपासणीसोबत थॅलेसेमिया, सिकलसेल अशा आजारांसाठी प्रतिबंधात्मक उपाय, रक्तवाढीसाठी गोळ्या देणे अशीही कामे, तसेच संशोधनही चालते. गुरुकुल केवळ शाळा नव्हे तर, जीवनविषयक दृष्टिकोन देणारे संकुल आहे.आदर्श दिनचर्या, संतुलित सकस आहार, कृषी अभ्यासक्रम, छंदातून व्यक्तिमत्त्व विकास, मूल्याधारित उपासना, खेळातून विज्ञान, कौशल्याधारित विकास येथे केला जातो. वनराईत लपलेला ‘मातोश्री आनंदाश्रम’, वृद्धांची काळजी घेणारं निसर्गरम्य संकुल. तसेच कर्णबधिरांची शाळा आणि बुद्धिबाधितांची कायमची सोय करणारा प्रकल्प ‘आश्रय-माझे घर’-अंधकारातून प्रकाशाकडे जाणारी प्रकाशवाट!
 
यावर्षी सन्मानित केलेली, आगळेवेगळे काम करणारी दादर, मुंबई येथील ‘रामचंद्र प्रतिष्ठान’. या संस्थेचे अशोक शिंदे आणि नयना शिंदे यांच्यासमवेत कार्य करण्याची संधी मला मिळाली आणि अनुभवाने मी समृद्ध होत गेले. काही वर्षांपूर्वी ‘रामचंद्र प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेतली गेली. त्याच्या बक्षीस समारंभाच्या निमित्ताने प्रतिष्ठानचे अशोक शिंदे आणि नयना शिंदे यांच्याशी परिचय झाला नि वृद्धिंगत होत गेला. यातूनच त्यांच्या कारागृहातील कामाशी ओळख झाली. लेखिका गिरिजा कीर यांचे पुस्तक वाचल्यापासून मनात सुप्तरुपात असलेली इच्छा, फलद्रूप होण्याची वेळ आली.‘रामचंद्र प्रतिष्ठान’तर्फे महाराष्ट्रातील कारागृहात असलेल्या बंदिवानांसाठी देशभक्ती जागृत व्हावी, यासाठी निबंध स्पर्धा घेतल्या जातात. क्रांतिकारकांच्या जीवनावरील पुस्तके ‘सावरकर प्रतिष्ठान’च्या पुढाकाराने महाराष्ट्रातील कारागृहातून दिली गेली. त्यानंतर क्रांतिकारकांच्या विचारांवरील विषयावर निबंध स्पर्धा घेतल्या गेल्या.
 
यात सारे देशभक्त त्यात समाविष्ट करण्यात आले. त्यानुसार अभ्यासासाठी पुस्तके पुरविली गेली. संस्थेच्या आणि कारागृहाच्या सोयीने निबंध स्पर्धेची तारीख-वेळ ठरविण्यात येते. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते स्वतः उपस्थित राहून, त्यांना लेखन साहित्य पुरवून स्पर्धा घेतली जाते. यासाठी पुरुष-महिला कक्षानुसार कार्यकर्ते विभागले जातात. मोठ्या निष्ठेने स्पर्धक निबंध ठराविक वेळेत लिहितात. आजवर येरवडा, मुंबई, ठाणे, तळोजा, नाशिक रोड, कोल्हापूर, संभाजीनगर, अमरावती, नागपूर, रत्नागिरी, धुळे, जळगाव, लातूर, नांदेड, सातारा, सोलापूर, अलिबाग, भायखळा अशा मध्यवर्ती आणि जिल्हास्तरीय कारागृहांत बर्‍याच ठिकाणी स्पर्धा झाल्या. त्याचे निबंध तपासून गुणतालिका बनवून देण्याची जबाबदारी पार पाडता आली, ही आनंदाची बाब!
 
प्रत्येक स्पर्धकाने पुढीलवेळी लेखन करताना निबंध अधिक दर्जेदार होण्यासाठी कोणत्या सुधारणा कराव्यात, याबाबत लेखी सूचनाही दिल्या जातात. बक्षीस समारंभ हाही एक आनंददायी सोहळा! या सोहळ्यात ‘एकदा अचानकपणे काही बोलावे’, अशी सूचना आली. मुखोद्गत असलेल्या कविता, संस्कृत श्लोक, कर्णबधिर मुलांना अध्यापन करतानाचे सकारात्मक अनुभव असे काही बोलले. ऐकताना प्रत्येकाच्या डोळ्यातला लुकलुकता आनंद मी टिपत गेले. मध्यस्थ अधिकार्‍यांकरवी आम्हाला निरोप आला, ‘बाईंना परत बोलवावे, आम्हाला अजून त्यांना ऐकायचे आहे.’ ही माझ्यासाठी गुणात्मक पोचपावती होती. पुढे एका साप्ताहिकात ‘दिव्यभरारी’ हे कर्तृत्ववान दिव्यांगांवरील सदर लिहायला मिळाले.त्यातील प्रत्येक दिव्यांगांची यशोगाथा वाचली की, ‘रामचंद्र प्रतिष्ठान’चे सर्वेसर्वा अशोक शिंदे यांचा आवर्जून फोन येई, ‘आपण या सदराचे पुस्तक करू या’ आणि रामचंद्र प्रतिष्ठानकडून ‘दिव्यभरारी’ पुस्तक साकारले गेले. त्यातून पुढे नंतर आमचा शिंदे परिवाराशी स्नेहबंध अधिक वृद्धिंगत होत गेला.
 
कारागृहाच्या भेटीत अनेक उत्कट प्रसंग अनुभवायला मिळाले. स्पर्धेसाठी ‘माझी जन्मठेप’ वाचल्यावर आत्महत्येचा विचार पक्का झालेल्या एका बंदिवानाने तो विचार कायमचा सोडून दिला. हे या उपक्रमाचं मोठं यश आहे. एक उच्चपदस्थ अधिकारी महिला, दुर्दैवाने कारागृहात! निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी, त्या बाई परवानगीने बोलायला लागल्या, इथे कारागृहात आल्यापासून घरचे मला विसरूनच गेले, मात्र आज तुमच्या रूपाने मला स्वातंत्र्यवीर सावरकरच भेटायला आले आहेत. खूप आनंद झाला आहे, तो शब्दांत व्यक्त करता येत नाही! पण...एक सांगते, लवकरच मी इथून बाहेर पडेन. त्यानंतर अशा कार्याला समर्पित होईन. असा विचार मनात येणं, हेच दिलदार मनाचं इंगित आहे. हे प्रतिष्ठानचं यश आहे. नंतर त्या बाई, तारीख-वार यांचे दाखले देत ओजस्वीपणाने धडाधडा स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या आयुष्यावर बोलल्या. ज्यातून त्यांचा अभ्यास, त्यांची निष्ठा, आत्मीयता डोकावत होती.
 
तळोजा कारागृहात निबंधस्पर्धा झाली. पारितोषिक वितरण झाले. रोख रक्कम विजेत्यांना मिळाली. त्याक्षणी मागचापुढचा विचार न करता त्या यशस्वी बंदिवानांनी ती रक्कम ‘पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना’ दिली. खरेतर, बंदिवानांना रोख पैशांची गरज असते. तरीही उफाळून आलेले हे देशप्रेम ही निबंधस्पर्धेची, पश्चात्तापदग्धतेची फलश्रुती आहे, असे म्हटले तर? मध्यंतरी, एक उच्चशिक्षित दाम्पत्य फसले गेले.दोघांची रवानगी कारागृहात झाली. अर्धवट वयातले त्यांचे अपत्य! समाजाकडून दुखावले गेले. अशावेळी त्याचे समुपदेशन करण्याचे काम रामचंद्र प्रतिष्ठानने केले. माझ्याकडूनही समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे उद्ध्वस्त होणारे एक उमलते आयुष्य बचावले. कारागृहातून सुटका झालेल्या बंदिवानांना समाज सहजगत्या सामावून घेत नाही. अशांसाठी व्यवस्थादेखील प्रतिष्ठानने केली आहे.

दोन वर्षांपूर्वी लोकसत्ता दैनिकाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमांतर्गत ‘रामचंद्र प्रतिष्ठानच्या’कार्याची दखल घेतली गेली. अशा आमच्या या प्रतिष्ठानच्या लाखमोलाच्या कार्याला जळगावच्या ‘केशवस्मृती सेवा प्रतिष्ठान’ने स्वतःशी जोडून घेतले. यामुळे कामाची व्याप्ती आणि परीघ वाढविणे, नक्कीच शक्य होईल. केशवस्मृती सेवा संस्थेचे प्रमुख भरतदादा अमळकर तसेच सतीश मदाने, दिलीप चोपडा, संजय नागमोती अशा पदाधिकार्‍यांमुळे त्यांच्या कामाचा डोलारा मजबूतपणे उभा आहे. केशवस्मृती सेवा संस्था आणि रामचंद्र प्रतिष्ठान आणि आजवर गौरविलेल्या संस्था, व्यक्ती यांचे कार्य अधिक प्रेरणादायी, समाजाभिमुख होईल, असे सारेजण दयाळू मेघासम कार्यरूपाने, ध्येयासक्तीने बरसत असतात, म्हणूनच समाजाची धारणा उत्तमरीत्या होत असते. सलाम आणि अभिवादन सर्वांच्याच सेवाभावी कार्याला!
 
 
शोभा नाखरे