ग्रेसांचं आईप्रेम

    10-May-2024   
Total Views |
 
gress
 
कवी ग्रेस यांचा आज जन्मदिन. त्यांच्या जन्मदात्री आईबाबत बरेच समाज गैरसमज लोक त्यांच्या रचनांतून करून घेत असतात. पण आई म्हणजे त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. आईवर त्यांनी अनेक कविता लिहिल्या. केवळ आई हा विषय घेऊन तिला किती वेगवेगळ्या पद्धतीने खुलवून सांगितलंय. त्यांना कौतुक त्यांच्या जन्माचंच. ते तिलाच विचारतात,
 
आडवाच झोपलो असतो,
गर्भाशयात तुझ्या तर?
येऊ दिले असते का,
तुझ्या वाट्याला माउलीचे भाग्यपण
 
ग्रेस आईवेडे होते. त्यांना लाभलेल्या विलक्षण काव्यप्रतिभेचे देणे कुणाकडून असे मिळाल्यावर ते ठाम उत्तर देत नसले तरी आईच्या बऱ्याच आठवणी सांगतात. इतर कवी जसा प्रेयसीच्या विरहाच्या कविता करतो तसे ग्रेस आईची सोबत मोजकी मिळाली म्हणून हळहळतात. ते लिहितात,
 
माझ्या लेखणीची ओळ
तिळातिळाने तुटते
शब्द अनाथ दिसती
रेघ हळूच ओढावी
टिम्ब ठेवूनही अंती
गीत अपुरे वाटते
 
गीत कशाला त्यांना आईच्या आपल्या जवळ नसण्याने आयुष्यही अपुरे वाटते. त्यांना आई आठवत राहते. न पाहिलेली. न पाहिलेली म्हणजे न कळण्याचं वय होत, तेव्हा आई कशी असेल, आपण बाळ होतो, तेव्हा आठवणी नसतानाच्या आईची प्रतिमा ते आठवत राहतात.
 
विस्मृतीच्या स्वप्नांध वळणावर
एखाद्या प्राचीन शिवालयात प्रचंड अंधार कोरीत
तुझ्याच पदरातून निनादात यावे
विदग्ध चंद्राचे स्तनांकित आकाश
 
आईची दुःखही त्यांना दिसत असावीत? कि दिसत असलेल्या दृश्य घटनांच्या आधारे कल्पना विस्ताराने ते आईला समजून घेत होते? आईचा जन्म कशासाठी असतो? स्त्रीचा नाही हा, आईचा. आणि स्त्रीचा जन्म कशासाठी? बाळाच्या कुटुंबात येण्याचे प्रयोजन काय? या ओळींचा अर्थ बघा तुमचा तुम्ही समजून घ्या.
 
ते चंद्रगंध विटले चोळी दुधात भिजली
पाठीत वाकताना आई गळ्यात हसली
 
पुढे ते तिच्या शिजेपर्यंत येतात. आईच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल मुलांना काय वाटत असत? आई वडिलांचं कुठेशी काही भुलून येणं आणि मग घरात आल्यावर समोर येते ती शेज. तिच्याही आठवणी नकोश्या व्हाव्यात कि ती उलट करून झोपावे?
 
देशी कुण्या विदेशी भुलली कळे न सांज
आई निजे दुपारी उलटी करून शेज
 
आणि मग ही शेवटची. अत्यंत गाजलेली ग्रेसांची कविता. अत्यंत विदीर्ण मनस्थितीत लिहिली असावी अशी दुःख वेल्हाळ.
 
अंगणात गमले मजला
संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा
कंदील एकटा होता
ती आई होती म्हणुनी..

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.