'सह्याद्री टायगर रिझर्व्ह'चे आता स्वतंत्र सायबर सेल; चोरट्या शिकारीचा आता लागणार छडा

    10-May-2024
Total Views | 102
cyber cell


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत अवैध शिकारी व वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी सायबर सेलची (cyber cell) निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर वन्यजीव वनवृत्तांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावतीप्रमाणे सायबर सेल स्थापन झाला आहे. (cyber cell)

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत सायबर सेलची स्थापना झाल्याने अनेक वन्य गुन्ह्यांची उकल होण्यास मदत मिळणार आहे. वन्यजीव व वनगुन्हे यांना आळा घालण्यासाठी संशयित आरोपी यांच्यावरील आरोप सिद्ध होण्यासाठी सी .डी.आर. (call detail Record), एस.डी.आर (subscriber Detail Record), एल.टी.एल. (Live Tower Location), टी.डी.डी (Tower dump data), Caf, (Verification Document) यासंबंधी अधिकृतपणे मागविण्यात आलेली माहिती ही गोपनीय पध्दतीने संबंधित मागणी करण्याऱ्या विभागाला सायबर सेलकडून पुरविण्यात येणार आहे. याचा फायदा अवैध शिकारी व वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी तसेच तपास करण्यासाठी वन विभागाकडील क्षेत्रिय कर्मचारी-अधिकारी यांना होणार आहे. सायबर सेल विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) कोल्हापूर यांचे कार्यालय विचारेमाळ, सदर बाजार, कोल्हापूर येथील कार्यालयामध्ये सुरू झाले आहे. सायबर सेलचे उद्घाटन कोल्हापूर सह्याद्री व्याघ्र राखीवचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर. एम. रामानुजम यांच्या हस्ते दि. ७ मे रोजी झाले.


सायबर सेल स्थापनेसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षकत (बनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई यांचे आवश्यक मार्गदर्शन लाभले आहे. या सायबर सेलव्दारे क्षेत्रिय कर्मचारी यांना वने व वन्यजीव विषयक गुन्हे हाताळणे व आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करणे व राज्याबाहेरील आरोपींनाही पकडणे सोईचे होणार आहे. सायबर सेलच्या माध्यमातून वने व वन्यजीव गुन्ह्यामधील आरोपींना शिक्षा होण्यास मदत मिळणार असून क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना त्याचा अधिकचा फायदा होऊन त्यांचे मनोबल वाढणार आहे. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर.एम. रामानुजम यांनी सायबर सेल सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरसाठी काम करणा-या कर्मचारी व अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व अधिक तत्परतेने व परिणामकरित्या कार्य करुन वने व वन्यजीव विषयक अपराधांवर आळा घालण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपवनसंरक्षक (प्रादेशिक) जी. गुरुप्रसाद, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस.एस. पवार, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी एस.डी. गवते तसेच वनविभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121