मंत्री नितेश राणे यांनी घेतला सागरी सुरक्षेचा 'ऑन फिल्ड' आढावा

    17-Jun-2025   
Total Views |


मुंबई : सागरी सुरक्षा हा एक महत्त्वाचा विषय असून, त्यास राज्य शासनाचे नेहमीच प्राधान्य आहे. सागरी सुरक्षा आणखी भक्कम करण्याच्या दिशेने आम्ही आणखी एक पाऊल टाकले असून, सागरी सुरक्षेसाठी नवीन गस्ती नौका तैनात करण्यात आल्या असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. सागरी सुरक्षेचा 'ऑन फिल्ड' आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते

भाऊचा धक्का येथे मंत्री नितेश राणे यांनी नव्याने तैनात होत असलेल्या गस्ती नौकेची पहाणी केली. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच गस्ती नौका पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. राणे म्हणाले, सागरी सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात ड्रोन टेहळणी सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. या यंत्रणेला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन हाय स्पीड गस्ती नौका तैनात करण्यात येत आहेत. या नौकांमुळे अवैध मासेमारी रोखण्यासह किनारपट्टीवरील सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या नौकांमुळे मच्छिामारांचीही सुरक्षा होणार आहे. अशा प्रकारच्या एकूण १५ बोटी तैनात करण्यात येणार असून आता पाच बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईमध्ये डिसेंबर २०२६ पर्यंत वॉटर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन आहे. वॉटर मेट्रो हा एक उपयुक्त आणि चांगला प्रकल्प असून यामुळे मुंबईकरांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अत्याधुनिक गस्ती नौका

अत्याधुनिक गस्ती नौकेमध्ये १५ लोकांच्या बसण्याची क्षमता असल्याने त्यामध्ये सागरी पोलीसही असणार आहेत. तसेच या नौकेस सुझुकी कंपनीची २५० एचपीची दोन इंजिन असून याचा वेग ३० नॉटीकल मैल आहे. अधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज या नौकेमध्ये रडार, ट्रान्सपॉन्डर, त्वरित प्रतिक्रिया प्रणाली यांचा समावेश आहे. द्रिष्टी, क्रुझ आणि फेरिस कंपनीची ही नौका संपूर्ण फायबरची आहे. १३ मीटर पेक्षा जास्त लांबी असणाऱ्या या बोटीची इंधन क्षमता ९०० लीटर आहे.


सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.