‘मशाल’धारी ‘हातां’चा लुळेपणा

    03-Apr-2024
Total Views |
 Political situation of Congress

'घर फिरले की वासेही फिरतात’ असे म्हटले जाते. काँग्रेसची सध्याची अवस्था त्याहून वेगळी नाही. एकेकाळी देशावर हुकूमत गाजवणारा काँग्रेस आता प्रादेशिक पक्षांच्या इशार्‍यावर नाचताना दिसतो. वास्तविक ठाकरे आणि पवारांच्या पक्षात उभी फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीत काँग्रेसला मोठ्या भावाचा मान मिळायला हवा होता; पण तसे घडले नाही. १४ आमदार आणि पाच खासदार उरलेला ’उबाठा’ गट मविआच्या जागावाटपात मोठा भाऊ ठरला. ४३ आमदारांचे बळ असलेल्या काँग्रेसला केवळ १६ जागा मिळाल्या. त्यात सांगलीसारखी हक्काची जागा ठाकरेंनी हिसकावून घेतली, तर पवार भिवंडीवर अडून बसले आहेत. अशावेळी काँग्रेसचे नेते कठोर भूमिका घेतील, अशी अपेक्षा होती. परंतु, नाराजी व्यक्त करण्यापलीकडे त्यांच्या हातून ठोस कृत्य घडले नाही. आता तर ‘हायकमांड’नेच अंग काढून घेतल्यामुळे ‘हाता’ची घडी आणि तोंडावर बोट ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही. ६० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रासह देशावर राज्य करणारी काँग्रेस एकाएकी प्रादेशिक पक्षांच्या वळचणीला का जाऊन बसली, याच्या खोलात जाता सक्षम नेतृत्वाचा अभाव हे प्रमुख कारण समोर येते. युवराजांचे ’ख्याली’ वर्तन पाहता, भविष्याचा वेध घेऊन, मोठमोठाल्या सरदारांनी साथ सोडली. महाराष्ट्रात गेल्या तीन-चार महिन्यांत अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी, राजू पारवे, नामदेव उसेंडी यांच्यासारख्या दिग्गजांनी काँग्रेसला रामराम केला. त्यामुळे प्रदेश स्तरावर संघटनेत मोठा नेता उरलेला नाही. सगळी भिस्त नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांच्यावरच. पण, पटोले वगळता दुसरा एकही नेता चढ्या आवाजात पवार आणि ठाकरेंशी भांडताना दिसत नाही. पटोलेंचा आवाज मोठा असला, तरी वाटाघाटी करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे नाही. त्यामुळेच ताकद असूनही, अधिकच्या जागा पदरात पाडून घेण्यात अपयश आले. तशातही सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर काँग्रेसच्या नेत्यांनी ताणून पाहिले. परंतु, ‘हायकमांड’नेच सबुरीचा सल्ला दिल्याने राज्यातील नेत्यांनी पवार आणि ठाकरेंसमोर गुडघे टेकल्याचे दिसते. एकूणच काय तर आघाडीची ‘तुतारी’ फुंकूनही ‘मशाल’धारी ‘हात’च आता लुळे पडलेले दिसतात.


उधारीचे पोते, सव्वा हात रिते!

शिवसेनेतील उभ्या फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीशी भांडून, लोकसभेच्या २२ जागा पदरात पाडून घेतल्या खर्‍या; पण पाच-सहा चर्चेतील चेहरे वगळता अन्य ठिकाणी सक्षम उमेदवारांची त्यांच्याकडे वानवा दिसते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सहकार्याने शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. त्यापैकी १३ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली. अगदी नाशिक, कल्याणसारख्या बालेकिल्ल्यात देखील ठाकरेंना सक्षम उमेदवार सापडलेला नाही. त्यामुळे महायुतीसाठी ही लढत आणखी सोपी झाल्याचे चित्र जागोजागी पाहायला मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र कल्याणमधून लढण्याची शक्यता असल्याने, त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून तुल्यबळ उमेदवार दिला जाईल, अशी चर्चा होती. केदार दिघे, वरूण सरदेसाई, सुषमा अंधारे यांची नावे या मतदारसंघात चर्चेत देखील आली. प्रत्यक्षात वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. दिघे यांना पक्षाने गळ घातली होती. परंतु, निवडणुकीचा खर्च करणे जमणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे, त्यांच्या नावावर फुली मारण्यात आली. कानामागून येऊन तिखट झालेल्या वरूण सरदेसाई आणि सुषमा अंधारे यांना कार्यकर्ते ठरवून पाडतील, अशी भीती असल्यामुळे, त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला. दुसरीकडे, काल भाजपमधून बाहेर पडलेल्या, उन्मेष पाटील यांना जळगावमधून उमेदवारी दिली जाईल, अशीही चर्चा होती. परंतु, ’देवेंद्रा’च्या करिष्म्यामुळे रात्रीत बदललेली समीकरणे ध्यानात घेऊन, त्यांनी स्वतःहून तलवार म्यान केली. त्यामुळे आयत्यावेळी करण पवार यांना तयार करावे लागले. हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांनी ‘मशाल’ चिन्हावर लढण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे, नाईलाजास्तव ठाकरेंना उमेदवार रिंगणात उतरवावा लागला. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि माकपशी बोलणी फिस्कटल्यामुळे भारती कामडी यांच्या नावाची घोषणा करावी लागली. सांगलीतही तीच स्थिती! काँग्रेसचा रोष पत्कारून, चंद्रहार पाटील यांना तिकीट दिले असले, तरी कार्यकर्त्यांचे केडर नसल्यामुळे, लाखभर मतांचा टप्पा गाठताना देखील तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे ’उधारीचे पोते, सव्वा हात रिते’ अशी उबाठा गटाची स्थिती!


सुहास शेलार