"दुसऱ्याचं संरक्षण घेऊन 'अगं बाई अरेच्चा' करणं हेच राऊतांचं काम!"

    02-Apr-2024
Total Views |

Sanjay Raut 
 
मुंबई : दुसऱ्याचं संरक्षण घेऊन 'अगं बाई अरेच्चा' करणं हेच संजय राऊतांचं काम आहे, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला आता शेलारांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
आशिष शेलार म्हणाले की, "जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये नाव असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय हीन आणि टवाळकीच्या भाषेत टीका करणे ही उबाठा सेनेची संस्कृती आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्र हा सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो. त्यामुळे असभ्य आणि असंस्कृत बोलणाऱ्यांना महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कधीही स्थान दिलेले नाही."
 
हे वाचलंत का? -  "उबाठा गटाच्या घराला..."; शिरसाटांचा राऊतांना टोला
 
"संजय राऊतांना दिवसाढवळ्या आणि उद्धवजींनी दिवसरात्र केवळ एकाच जननेत्याची भीती वाटते, ते म्हणजे मोदीजी. याचं कारण म्हणजे त्यांना महाराष्ट्राचं जनसमर्थन आहे. अशा असभ्य आणि हीन भाषेत बोलणाऱ्या राऊतांचा आम्ही धिक्कार करतो. त्यांच्या भाषेत बोलायचंच झालं तर त्यांच्यापेक्षाही भयंकर मी बोलू शकतो. कारण मी कोकणी, मालवणी आणि मराठी आहे. माझ्या मालवणी भाषेतले शब्द संजय राऊतांना पटणारे नाहीत," असे ते म्हणाले.
 
"मराठी सिनेमातल्या कुणाची उपाधी द्यायची झाली तर संजय राऊतांना महाराष्ट्राच्या राजकीय पटावरचे गणपत पाटील म्हणता येईल. याचं कारण म्हणजे त्यांची कुठलीही गोष्ट स्वत:ची नाही. ते ना निवडणूक स्वत:हून लढले, ना कधी लोकांमध्ये जाऊन मतं मागितली. नेहमी दुसऱ्याचं संरक्षण घेऊन अगं बाई अरेच्चा करायचं आणि असभ्य बोलायचं, एवढंच ते करतात. त्यामुळे ज्या भाषेत तुमचे राजकीय प्रवक्ते बोलत आहेत ती तुम्हाला मान्य आहे का, असा माझा उद्धवजींना सवाल आहे," असेही ते म्हणाले.