ठाकरे-पवारांविरोधात काँग्रेस उमेदवार देणार 'त्या' चार जागा!

    30-Mar-2024
Total Views |
congress on Lok Sabha Elections

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरुन महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु आहे. यात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही जागांवरून मतभेद आहेत. त्यात सांगली आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ, दक्षिण मध्य मुंबई या तीन जागेवर ठाकरे गटाने उमेदवारांची घोषणा केली आहे. ज्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. त्यात आघाडीतील मित्रपक्षाने काँग्रेससाठी सांगली, भिवंडी, उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा जागा सोडण्यास तयारी दाखवली नाही. म्हणूनच काँग्रेस हायकंमांडने महाविकास आघाडीतील घटकपक्षांविरुद्ध मैत्रीपुर्ण लढत करण्यासाठी हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे मैत्रीपुर्ण लढत म्हणजे नेमंक काय? या मैत्रीपुर्ण लढतीचे मविआला काय नुकसान होऊ शकते? काँग्रेस मैत्रीपुर्ण लढत करणाऱ्या जागांसाठी मविआत आग्रही का होती? मविआतील ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे नेते यावर तोडगा काढून कुठला सुवर्णमध्य काढणार का? किंवा ठाकरे गट जाहिर केलेल्या सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मुंबईची जागा काँग्रेससाठी सोडणार का?

दि.२६ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना- भाजप युती तोडून शरद पवारांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीची स्थापना केली. पुढे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी महाविकास आघाडीतील प्रत्येक नेता एकमेकाला पुढे घेऊन जाण्याची भाषा करत होता. पण वेळ बदलली, राजकीय समीकरणे बदलली आणि मविआतील घटक पक्षांची राजकीय भुमिका ही, ज्यामुळे मविआ फुटणार अशा चर्चा सुरु झाल्या. अशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. आणि मविआत जागावाटपाच्या चर्चांना सुरुवात झाली. मात्र सततच्या बैठका घेऊन ही मविआचा जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला दिसला नाही. अशातच दि. २७ मार्च रोजी संजय राऊतांनी एक ट्विट केलं आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी ठाकरेंनी आघाडी धर्म पाळायला हवा होता, अशी विधानं करायला सुरुवात केली. त्यात काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी तर आपल्या पक्षश्रेष्ठींची कानउघडणी करत. सात दिवसाचा अल्टीमेटम देऊन टाकला. आणि मुंबईत काँग्रेसवर श्रद्धांजली वाहण्याची तयारी ठाकरे गटाकडून सुरु असल्याचा आरोप निरुपम यांनी केला.

ज्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी माध्यमांसमोर नाराजी बोलून दाखवली. मुळात महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले असताना, सांगली, भिंवडी आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर ठाकरे आणि पवार अडून बसले आहेत. त्यामुळे आतापर्यंत अनेक बैठका होऊनही ठोस तोडगा निघालेला नाही. परिणामी या जागांवर मैत्रिपूर्ण लढत करूया, अशी भूमिका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी यांच्यासह झालेल्या बैठकीत काही नेत्यांनी मांडली. पण काँग्रेस मैत्रीपुर्ण लढत करणार म्हणजे काय? तर ठाकरे गटाने आधीच उमेदवार जाहिर केल्यामुळे आणि बैठकीतून तोडगा निघत नसल्यामुळे काँग्रेस आपल्याला हव्या असणाऱ्या त्या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार उभे करणार. पण मैत्रीपुर्ण लढतीचे मतदारसंघ कुठले? या मतदारसंघात मविआतून कोण-कोण उमेदवार असतील. यामुळे मविआला होणाऱ्या मतदारांवर काय परिणाम होऊ शकतो हे ही जाणून घेऊ?
मैत्रीपुर्ण लढत होणार पहिला मतदारसंघ असेल, सांगली लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात ठाकरे गटाने दि. १२ मार्च रोजी पक्षात आलेल्या चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून या मतदारसंघासाठी विशाल पाटलांचे नाव चर्चेत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ स्वाभिमानीला ऐनवेळी मिळालेला पण तगडा उमेदवार नसल्याने या मतदारसंघात स्वाभिमानीने काँग्रेसच्या विशाल पाटलांना उभे केले. त्यावेळी भाजपचे संजय काका पाटीव विरुद्घ स्वाभिमानीकडून विशाल पाटील अशी लढत झाली. ज्यात १ लाख ४३ हजार मताधिक्य मिळत संजय काका पाटलांनी विजयाकडे कुच केली होती. पण २०१४ आधी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यामुळे पुन्हा सांगली हा बालेकिल्ला मिळवण्यासाठी काँग्रेसच्या जागेवर दावा केला होता. ज्यात आता भाजपचे संजयकाका पाटील, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसकडून विशाल पाटील अशी लढत होऊ शकते.
 
त्यानंतर मैत्रीपुर्ण लढत होणार दुसरा मतदारसंघ म्हणजे, भिवंडी. मुळात भिवंडी लोकसभा मतदारसंघात मागील तीन निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये लढत झाली होती. २००९ ला काँग्रेसच्या सुरेश टावरे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्त्व केले होते. तर २०१९ ला सुरेश टावरे विरुद्ध भाजपचे कपिल पाटील अशी लढत झाली होती. पण टावरे यांचा पराभव झाला.तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त मते मिळवत दुसऱ्यांदा पाटील खासदार झाले. ज्यानंतर त्यांना केंद्रात राज्यमंत्रीपदही मिळाले. पण हा मतदारसंघ आधी काँग्रेसच्या हाती असल्याने काँग्रेसने या जागेवर दावा केला होता. पण दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बाळ्या मामा म्हात्रे यांच्या नावाची चर्चा असल्याने काँग्रेस या मतदारसंघातही मैत्रीपुर्ण लढतीचा विचार करत आहे. ज्यात काँग्रेसकडून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. मुळात मनसेकडून बाळ्यामामा म्हात्रे यांनी या मतदारसंघातून २०१४ ला निवडणुक लढवली होती. त्यामुळे ते देखील सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

मैत्रीपुर्ण लढत होणारा तिसरा मतदारसंघ म्हणजे, दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ. या मतदारसंघात ठाकरेंनी अनिल देसाईंना उमेदवारी दिली आहे. पंरतु या मतदारसंघातून काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे. कारण याचं मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांचे वडिल एकनाथ गायकवाड हे २००९ निवडून आले होते. परंतु नंतर मोदी लाटेत हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. पण आता ठाकरे गटाने अनिल देसाईंचे नाव घोषित केल्यावर मविआत काँग्रेस ठाकरेंना या मतदारसंघात विरोध करत आहे. त्यामुळे या मतदारसंघात मैत्रीपुर्ण लढतीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई अशी लढत होऊ शकते.
 
त्यानंतर मैत्रीपुर्ण लढतीतील शेवटचा मतदारसंघ म्हणजे, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात ठाकरे गटाने अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहिर केलीय. पण या मतदारसंघावर काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी दावा केला आहे. तसेच काँग्रेस हायकंमांडवर आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर ही त्यांनी टीका केली आहे. त्यामुळे निरुपम यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस संजय निरुपम यांना ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात मैत्रीपुर्ण लढतीसाठी उभे करू शकते. यासगळ्यात दि. ३१ मार्च रोजी नवी दिल्ली येथे मविआतील घटकपक्षांची बैठक होणार आहे. तेथे या जागांबाबत काँग्रेस हायकमांडकडून ठाकरे आणि पवारांशी चर्चा केली जाईल. तरीही तोडगा न निघाल्यास स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जाईल, अशी माहिती आहे. पण या मैत्रीपुर्ण लढतीत विरोधी उमेदवारांचा फायदा होणार हे निश्चित. तसेच महाविकास आघाडी म्हणून विचार करताना मतदारांपुढे नेमंक कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मत द्यावे, असा ही प्रश्न मतदारांना पडेल. ज्यात मतांच्या विभाजनामुळे महायुतीला फायदा होईल. तरी ही मैत्रीपुर्ण लढत भविष्यात मविआला किती फायद्याची ठरते? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.