पिपांत मेले ओल्या उंदिर

    20-Mar-2024   
Total Views |

b s marhekar 
 
पिपांत मेले ओल्या उंदिर ही मर्ढेकरांची कविता कुणाला कशी आवडू शकते हा माझा प्रामाणिक प्रश्न. बीभत्सतेत सौन्दर्य असतं, किंवा मृत्यूच्या वर्णनात वेदना असते, मान्य. पण तिचं साग्रसंगीत वर्णन? कविता कळायला केवळ वयाचा प्रौढपणा पुरेसा नाही तर अनुभव विश्वही समृद्ध असायला हवं. कुणी काही सांगत असेल तर समजून घ्यायला वाचकही प्रगल्भ असायला हवा.
ही कविता पहा ते म्हणतात,
 
माना पडल्या, आसक्तीविण.
 
जगण्याची धडपड करता करता रंजलेले गांजलेले लोक. शहरातील मजूरवर्ग. झोपडपट्टीच्या पिंपात जगण्यासाठीचा लढा प्रत्येक दिवशी देणारे लोक. गावा खेड्यात मान उंच करून पाहायला कोरड्या जमीनशिवाय दूरवर काही दिसत नाही, मग हे खाऊच्या शोधात शहर जवळ करतात. खुराड्यागत घरात राहतात पण माना ताठ ठेवतात. पण या दुर्दम्य आशावाद घेऊन जगणाऱ्या माणसाच्याही काही मर्यादा आहेत, सभोवतीच्या कराल भिंती ते पार करू शकत नाहीत. शेवटी ते शरण जातात. काळाला.
ते पुढे म्हणतात,
 
गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन् धुऊन घेउन.
 
कित्येक समूह तर असे आहेत, ज्यांच्या जिवंतपणाची मोजदाद नाही. मुंबईच्या गर्भातील काही गल्ल्या अशा की माणूस तर आहे पण त्याच्या मनुष्यत्वाची ओळखच नाही. सारे चेहरे नसलेले देह. वापरण्याजोगे. उपयुक्त. चेहरा नाही म्हंटल्यावर भावना नाही हे गृहीत धरलेलं. पण त्यांनाही कुठल्या दूरच्या गावच्या, मायेच्या पदराच्या, थकलेल्या, शिलेल्या हातांच्या, कधी कोमल निरागस नजरांच्या उचक्या लागतात. यातून ते चेहरे रोज मरत असतात, रोज जगतात, पुन्हा मृत्यू. एकच ठाशीव जाणीव.
म्हणू ते पुढे असेही सांगतत,
 
जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.
 
आपलं आयुष्य आपल्याही नकळत जगायचं असत का? जन्माला यायच्या आधीच शिरावरची जबाब्दारी घेऊन येतात ते जीव. सारा जन्म कुणाला तरी वाहिलेला. रक्ताच्या नात्यांचा वेठबिगार. हात परिस्थितीने बांधलेले. कोण हे? कोणते समूह? कोणते समाज? किती नावं आहेत त्यांची? जीवनाची अपरिमित आसक्ती, आणि तेवढीच मृत्यूची भीती. पण जीवन मृत्यू यापैकी काही काही हातात नाही. आपण सुद्धा? आपण सुद्धा अशा एखाद्या समूहाचा भाग असतो का? कुणाच्या हातात आपल्या आयुष्याच्या दोऱ्या आपण देऊन ठेवतो? या आपल्या मर्यादा आपण आपला हातात घेऊ शकतो का? आपण लुकलुकत हे चकचकीत जग मग पाहत बसतो. आपण, ते आणि तेही. सगळेच. एका घडीचे प्रवासी. हे लुकलुकणारे जग स्वप्न होऊन आपल्या डोळ्यात विसावते. जिवंत राहते आपण मात्र कोरडे होत जातो. ही अवस्था नेहमी टिकत नाही. पण ज्यांच्यासाठी ही अवस्था त्यांचे आयुष्य ग्रासून राहिली असेल त्यांचे काय? त्यांचे डोळे ही निखळ स्वप्न पाहू शकतात? 
मग ते म्हणतात,
 
उदासतेला जहरी डोळे
काचेचे पण; मधाळ पोळे;
 
असं जगत असताना मानवाची शृंगाराची आदिम प्रेरणाही संपत नाही. याच प्रेरणेने तर मानववंश जिवंत ठेवलाय. प्रेम संपून गेलेलं असतानाही वासनेची भूक भागावी म्हणून शृंगारात आनंद शोधणारे लोक. असे लोक तुम्हाला रडताना दिसणार नाहीत. दिवसेंदिवस तोच तोच जगण्याचा लढा देऊन त्यांचे अश्रू थिजून गेलेत. वाहतायेत, दिसतायेत. पण त्यात अर्थ राहिलेला नाही. त्यात ओलावा राहिलेला नाही. केवळ कोरडेपणा. भावनांचा, आसवांचा, काचेचे झालेत अश्रू.
 
कविता आजही समजली ती एवढीच. उद्या कदाचित तिचा नवा अर्थ गवसेल? हा मला सापडलेला अर्थ. 

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.