राज्य सरकारचा गुगलसोबत सामंजस्य करार! 'या' क्षेत्रांना होणार फायदा

    08-Feb-2024
Total Views |

Fadanvis


पुणे : महाराष्ट्र सरकार आणि गुगलमध्ये गुरुवारी एक सामंजस्य करार झाला आहे. यामध्ये गुगलच्या मदतीने सात विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) उपयोग करुन वेगवेगळ्या प्रकारचे अप्लीकेशन्स तयार करण्यात येणार असून यातून नागरिकांचे जीवन चांगलं होण्यासाठी मदत मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
 
माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गुगल ही एक अत्यंत महत्वाची तंत्रज्ञान कंपनी असून जगात तिचा प्रचंड विस्तार आहे. या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुगल नेहमीच एक पाऊल पुढे राहिले आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेत मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. लोकोपयोगी कृत्रिम बुद्धीमत्ता असा विचार आता त्यांनी मांडला असून त्याचा उपयोग महाराष्ट्रात कसा करता येईल याबाबतचा हा करार आहे."
 
"याद्वारे शेती, शाश्वतता, स्टार्ट अप, आरोग्य सेवा, कौशल्य अशा विविध क्षेत्रांमध्ये एकत्रित काम करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे लोकांचं जीवन वेगाने बदलू शकतं आणि या सगळ्याचा उपयोग आम्ही करणार आहोत. काही अॅप्स त्यांनी दाखवले आहेत. याद्वारे शेतकऱ्याच्या जमिनीत काय पेरलं आहे किंवा त्याची वाढ कशी झाली आहे इथपर्यंत प्रत्येक गोष्टीचं मॉनिटरींग किंवा डेटा आपल्याला मिळू शकतो. शेतकऱ्याने काय वापरलं पाहिजे, पिकावर कुठली कीड येऊ शकते, ती न येण्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना या अॅपद्वारे कळू शकतात. असे अनेक अॅप त्यांनी तयार केले आहे," अशी माहितीही फडणवीसांनी दिली.
 
ते पुढे म्हणाले की, "गुगुलसोबत महाराष्ट्र सरकारने केलेला करार हा निश्चितच लोकांना चांगलं जीवन देऊ शकतो. यामध्ये रोजगाराच्या असिमित संधी आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आल्यावर रोजगाराचं काय होईल असे लोकं पुर्वी म्हणायचे. पण कृत्रिम बुद्धिमत्तेने ज्या नवीन रोजगाराच्या संधी तयार केल्या आहेत त्यासाठी आता आपलं राज्य भविष्यात तयार होत आहे," असेही ते म्हणाले आहेत.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.