पतंग, हलवा आणि आरोग्यवर्धक काळ ...

    11-Feb-2024
Total Views |
article on Healthier times after makarsankrant
 
दि. १५ जानेवारीच्या पूर्वसंध्येला झालेल्या भोगीपासून ते माघ शुक्ल सप्तमी दि. १६ फेब्रुवारीच्या शुक्रवारी येणार्‍या रथसप्तमीपर्यंत यंदा मकरसंक्रांत साजरी करत आहोत. हा काळ पतंग, हलवा आणि आरोग्यवर्धक काळ म्हणून ओळखला जातो. सूर्यनारायणाला समर्पित असलेला, हा काळ क्रीडाप्रेमींनाही हवाहवासा वाटतो. त्यानिमित्ताने...

'तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत, आपण पौष शुक्ल पंचमी सोमवार, दि. १५ जानेवारी, २०२४च्या पूर्वसंध्येला असणार्‍या भोगीपासून ते माघ शुक्ल सप्तमी शुक्रवार, दि. १६ फेब्रुवारीच्या येणार्‍या रथसप्तमीपर्यंत मकरसंक्रांत साजरी करत आहोत. मकरसंक्रांतीत सूर्याचे उत्तरायण सुरू झालं आहे. मकरसंक्रांतीनंतर माघात उत्तरायणापासून देवतांचा दिवस सुरू होत असल्याची आपली धारणा असल्याने, त्या अवधीत सर्व शुभ कार्ये सुरू होतात. सूर्यनारायणाला समर्पित असलेला हा काळ क्रीडाप्रेमींनाही हवाहवासा वाटणारा, ऊर्जावान, आरोग्यदायी, आल्हाददायक असा हिवाळ्याचा ऋतू तो आपण सगळेच गोडव्यात साजरा करत असतो. या आपल्या लेखात आपण देवाला नमस्कार करत, त्याचा गोड प्रसाद ग्रहण करू.

सूर्योपासनेचे महत्त्व

हिंदू धर्मात प्रामुख्याने गाणपथ्य, शाक्त, शैव, वैष्णव आणि सौर या ज्या पंच उपासना पद्धती, पाच पंथ, पाच संप्रदाय आहेत. या अनिर्वचनीय परमात्म्यातील ब्रह्मामध्ये सौर संप्रदायाचा अधिपती हा सूर्य समजला जातो. आपण ज्या देवाला प्रत्यक्षात पाहू शकतो, अशी एकमेव देवता म्हणजे सूर्यदेवता. रोज सूर्याला अर्घ्य देण्याची परंपरा प्राचीन काळापासून आपल्यात चालत आली आहे. यामुळे धर्म व आरोग्याचे लाभ आपल्याला होत असतात. आपल्या पुढे केवळ रामदास स्वामींसारख्या संत-महंतांचेच आदर्श आहेत, असे नव्हे तर लोकमान्य टिळकांच्या मातोश्रींचेही आदर्श आहेत. रत्नागिरीच्या समुद्रकिनारी लोकमान्य टिळकांच्या मातोश्री पार्वतीबाई नित्यनेमाने सूर्यनारायणाला अर्घ्य देत. त्याचा प्रसाद म्हणून सूर्यासारखा तेजस्वी पुत्र सूर्यनारायणाने त्यांच्या पोटी दिला, हे भारतीयांचे भाग्यच. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपानेही आपल्याला याच पठडीतील एक व्यक्तिमत्त्व मिळाले आहे. सूर्यनमस्कार हे जगभरातील लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी योग दिनाप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक उचललेलं पाऊल आहे.

साष्टांग नमस्कार

भारतीय संस्कृतीतील थोरामोठ्यांना आपल्याला म्हणूनच साष्टांग नमस्कार करावे, असे मनापासून सांगावेसे वाटते. सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही सूर्य उपासनाच आहे. त्यामुळे सर्वांगसुंदर असा व्यायाम होतो. तसेच आत्मिक, मानसिक व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते. हा व्यायाम प्रकार अल्पमोली आणि बहुगुणीआहे.

उरसा शिरसा द्रष्ट्या वचसा मनसा तथा।
पदाभ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामः अष्टांग उच्यते॥
दृष्टी, मन आणि वाणी संयमित करून एक छाती, एक मस्तक, दोन पाय, दोन हात, दोन गुडघे या आठ अंगांनी जो नमस्कार करायचा, त्याला ’साष्टांग नमस्कार’ म्हणतात.
 
आपल्या संघपरिवाराच्या कुटुंबातील ’क्रीडाभारती’ आपल्याला सूर्यनमस्कार घालायचे आवाहन करत असते. त्यांना प्रतिसाद देत, आपण आपले शरीर सुदृढ करण्याचा संकल्प रथसप्तमीच्या दि. १६ फेब्रुवारी २०२४ या दिवशी सोडणार आहोत. रथसप्तमीच्या दिवशी विविध ठिकाणी सकाळी सूर्योदयाला सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केल्या जातात.

हलवा...

रथसप्तमीच्या आधी सुरू झालेल्या, मकरसंक्रांतीला आपल्यात ‘हलव्या’चे महत्त्व असते. अनेक क्रीडापटूंच्या मानसिक व शारीरिक वृद्धीसाठी ’हलवा’ उपयोगात येत असतो. मत्स्याहार करणार्‍या क्रीडापटूंचा कल हा प्रामुख्याने खोल समुद्रातून दरीयाच्या राजाने बाजारात आणलेली कमी काटे, जास्त मांस असणारी आणि उग्र वास नसणारी मासोळी खाण्याकडे असतो. त्यात एक हलवा असतो, तर दुसरा हलवा हा मेवा-मिठायांमधील. हा दुसरा हलवा सण, उत्सव, आनंददायक समारंभ, मेजवान्या, विवाह व मुंज समारंभ, आदरातिथ्य आदी कार्यातला. तसेच गाजर वा दुधी हलवा, माहीम, बदामी, सुजी म्हणून ओळखला जाणारा हलवा. सत्यनारायणाच्या पूजेचा तीर्थप्रसाद म्हणून तयार केलेला, असा हा हलवा बनवल्यावर लगेच ताजाताजाच फस्त करायचा असतो. परंतु, मकरसंक्रांतीला तीळ गूळाचा काटेरी हलवा आपण पुढे काही दिवस टिकवून ठेवत असतो. सगळ्यांना तो हलवा देऊन, आपल्यातील गोडवा टिकवून, ठेवण्याचा आग्रह करत असतो. हिंदीत ’सुजी हलवा’ या शब्दाचा अर्थ (रव्याचा) शिरा मग तो साखरेचा असो अथवा गुळाचा या अर्थी घेतला जातो. हलवा हा शब्द आपल्या मराठीत आपण तीळ गूळाचा काटेरी हलवा या अर्थीही घेतो. असा हा शाकाहारी काटेरी हलवा शेवटी गोडाधोडाचा म्हणूनच ओळखला जातो.

आपल्या संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गोड खाऊन करतात. दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी मागील काही अर्थसंकल्पांप्रमाणेच हादेखील पेपरलेस ’अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प २०२४’ अर्थात वार्षिक वित्तीय विवरणपत्र देशाला सादर होण्यापूर्वी अर्थ खाते आणि इतर विभागातील कर्मचारी, अधिकारी दिवसरात्र झटत होते. त्यांच्यासाठी अर्थमंत्री त्यांना श्रमपरिहार म्हणून पारंपरिक ’हलवा सोहळा’ साजरा करतात. सलग सहाव्या वर्षी पूर्व पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यानंतरच्या संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार्‍या, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्याआधी, नॉर्थ ब्लॉकमध्ये ’हलवा सोहळा’ साजरा केला. त्यांनी स्वहस्ते पारंपरिक पद्धतीने कढईतील हलवा करून दिला, तर आपण सगळ्यांना ’तीळगूळ घ्या, गोड बोला‘ असे म्हणत, हलव्याचे आदानप्रदान करत असतो.

पतंग

मकरसंक्रांत आली की, आपल्याला हलव्यासमवेतच ’पतंग’ आठवतो आणि त्यावरील काही चित्रपट गीते आठवतात. ’लाखात अशी देखणी’ या चित्रपटातील गदिमा, बाबूजी आणि आशा भोसले यांनी गायलेले ‘पतंग उडवीत होते ग बाई मी पतंग उडवीत होते’ हे गाणे ऐकताना, आकाशात डोलणारा पतंग आपल्याला आठवतो. राजेश खन्ना, आशा पारेख या जोडीच्या १९७१च्या चित्रपटाचे नाव ’कटी पतंग’ असे जरी असले, तरी प्रत्यक्षात त्या चित्रपटात ‘पतंग’ उडवीत काटाकाटी करणे, असा प्रकार नव्हता.
१९५७च्या ’भाभी’ या हिंदी चित्रपटात ’चली चली रे पतंग मेरी चली रे...’ असे एक गीत गाणारा मनमौजी जगदीप दाखवला आहे. अशी अनेक हिंदी, मराठी गीते पतंगावर आधारित आहेत आणि ती आपल्या पसंतीस उतरलेली आहेत. पतंगाच्या काटाकाटीचा खेळही चांगला रंगतो. पतंग उडवण्यातील चढाओढीत सगळेजण तल्लीन होऊन, रममाण होत असतात. पतंगक्रीडेत आबालवृद्ध सहभागी होतात. पतंगावर आधारित बालभारतीच्या अभ्यासक्रमातले बालपणीचे बोल आठवले, तर आपल्याला प्रौढ वयातून बालवयात नक्कीच जायला होईल.

मोहवणारी खळ...

पाठ्यपुस्तकातील पतंगानंतर अनेकांनी, आपल्या शालेय जीवनात घरच्या घरी बनवलेली खळ अथवा विकतचा डिंक वापरून पातळ ताव व बांबूच्या कामट्या वापरून बनवत किंवा बाजारात उपलब्ध असलेले पतंग व त्याच्या ’एक्सेसरीज’ विक्रीला ठेवलेल्या आढळतात. मकरसंक्रांतीच्या काळात उडवल्या जाणार्‍या पतंगाचा वापर अनेकांनी केला असेल. रंगीबेरंगी पतंगाला आपण निळ्या आभाळी उडवत असतो. पतंग बनवण्यापासून तो उडविताना आपल्याला सहकार्याची गरज पडतच असते. पतंगाची दोरी/मांजा इतर पतंग काटू शकताना आपण बघतो. असा हा एकमेकांच्या साहाय्याने उडवला जाणारा, पतंग हा एक क्रीडा प्रकार म्हणूनही आज जगभर प्रसिद्ध आहे. ‘काईटसर्फिंग’ हा या पतंगांचा क्रीडा प्रकार. कोरियन, चिनी, जपानी व मलायी लोकांचा पतंग हा राष्ट्रीय खेळ आहे. चीनमध्ये तर नवव्या महिन्याचा नववा दिवस हा ‘पतंग दिन’ म्हणून पाळला जातो. हौशी आणि व्यावसायिक खेळ म्हणून तो खेळला जातो. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने देशातील अनेक शहरांमध्ये पतंगोत्सवाचे आयोजन केले जाते. गुजरात, पंजाब, राजस्थान अशा विविध राज्यांत पुणे, मुंबई, नाशिक अशा शहरांत पतंग महोत्सव प्रसिद्ध आहेत. मकर संक्रांतीपासून हा सण पूर्ण उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी येथे बहुदिवसीय पतंग महोत्सव आयोजित केला जातो आणि तो पाहण्यासाठी देशाच्या अनेक भागांतून आणि परदेशातूनही पर्यटक येत असतात.

पौष-माघातील ’काईटसर्फिंग’

मकर संक्रमणानंतर पतंग उडवण्याची प्रथा केवळ धार्मिकच नाही, तर वैज्ञानिकदेखील आहे. हिवाळ्यात येणार्‍या मकरसंक्रांतीच्या मोसमात थंडीमुळे शरीराला स्थूलपणा जाणवत असल्याने, ती थंडीत आपली त्वचा कोरडी पाडते आणि आपल्याला बरेच विकारही उद्भवतात. सामान्यतः या काळात थंडी असल्याने, रक्तवाहिन्या काही प्रमाणात आकुंचित होतात, रक्तदाब काही प्रमाणात वाढून हृदयावर ताण येतो अशा स्थितीत हृदयरोगाचे प्रमाण वाढते. असे हृदयविकारतज्ज्ञ सांगतात. संक्रांतीच्या तीळ-गूळ वगैरे गोडधोड आपल्या पथ्या-पथ्याचे नियम पाळूनच करायला हवे. म्हणूनच शरीराची हालचाल व्हावी, आपण जास्तीत जास्त क्रियाशील राहावे, यासाठी अनेक क्रीडा स्पर्धांचे ऊर्जावर्धक आयोजन होत असते, यात आपण ’खेलो इंडिया’सारख्या तसेच अनेक क्रीडा संघटना स्पर्धांचे आयोजन करताना आपण बघतो. तसेच ‘काईटसर्फिंग’, ’पतंगबाजी’ या पतंग क्रीडेचे देखील आयोजन अनुभवतो. तसे पाहिले तर पतंग उडवण्यामुळे हाता-पायांचे व्यायाम होतात, मन एकाग्र होते. या पतंगाला आकाशात बघून आपल्याला बराच सकारात्मक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. उंच आकाशात भरारी घेण्याची इच्छा मनात ठेवणे, संतुलित व्यक्तिमत्त्व, कितीही हवा आली तरी आपले संतुलन ढळू न देणे, आयुष्य जगताना पराभव स्वीकारण्याची तयारी ठेवणे, मोकळ्या आकाशात मोकळा श्वास घेणे, आनंद घेणे आणि आनंद देणे या व अशा गोष्टींचा यात समावेश होतो. फक्त इमारतींच्या गच्च्यांवरच नव्हे, तर मोकळ्या विस्तीर्ण मैदानावर, समुद्र किनार्‍यावर पतंग उडवले जाताना आपण आज बघतो.

शिकवण पतंगाची

पतंग उडवताना अनेक जण बेभान होत दुर्घटनेला कारणीभूत होताना आपण वृत्तपत्रात बघत असतो. नायलॉनच्या मांजांचे अपघात, रस्त्यावर बेभान धावणे, पतंग काढताना बसलेल्या विजेच्या धक्क्याने होणारे अपघात टाळण्यासाठी वारंवार सांगितले जाते, प्रबोधन केले जाते, तरी अशा दुर्घटना घडतच असतात. अशा पतंग उडवणार्‍यांची मानसिकता ही जणू ’पतंग’ या कीटकासारखीच असल्यासारखे मला वाटते. आपण शेकोटीचा आनंद या काळात घेत असतो. अग्नीचा शेक सर्वांसाठीच गरजेचा असतो. पण, त्याचे आपल्याला मोहित करणारे रूप ’पतंग’ कीटकाला इतके भुलवते की, अग्नीचा तो शेक ती धगदेखील त्याच्या धावेच्या आड येत नाही. चटके बसूनदेखील केवळ मोहापायी ’पतंग’ अग्नीमध्ये स्वतःला झोकून देतो आणि अंततः मृत्यूला कारणीभूत होतो. विषयांचा अतिरेक केल्यास, स्वतःचा अंत आपण ओढवून घेत असतो, हे या पतंग उडवणार्‍यांना जणू तो पतंग शिकवतो.
 
मनुष्याच्या खेळात त्याच्या वाट्याला सुख, दुःख, आनंद, निराशा, हारणे, जिंकणे, यश, अपयश अशा अनेक गोष्टी येताना आपण बघतो. त्याला मानव स्वतः कारणीभूत ठरू नये, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हा आदित्य आमच्या बुद्धीला अशीच सत्पे्ररणा देवो, असे मागणे मागत आता आपण या लेखाची समाप्ती करताना सूर्यनमस्कार करत आपण-

हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहीतं मुखम्।
तत्वं पूषम् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये॥
ही प्रार्थना करत सूर्यनारायणाकडे मागणे मागू की, एखाद्या झाकणानं पात्र झाकावं. तसं तुझ्या सूवर्णमंडलानं सत्य झाकलं गेलं आहे. म्हणून हे सूर्या, हे आवरण दूर करून, तूच मला सत्य दर्शन घडव!
 
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.