अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार शरद पवारांच्या भेटीला!

    30-Dec-2024
Total Views | 94

chetan tupe
 
पुणे : (MLA Chetan Tupe) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवारांच्या पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थानी जाऊन आमदार चेतन तुपे यांना शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांच्या कार्यालयामध्ये हे भेटीचे सत्र पार पडले आहे. आमदार चेतन तुपे आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचे समजते आहे. या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
 
"महाराष्ट्राची इच्छा आहे. त्या प्रमाणे ते करतील"
 
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता दोन्ही पवारांनी एकत्र यावं का या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, दोन्ही पवार एकमेकांना भेटत असून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्राची इच्छा आहे. त्या प्रमाणे ते करतील, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
 
"प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडू नये"
 
पुढे बोलताना ते म्हणाले, "मी रयत शिक्षण संस्थेचा पश्चिम विभागाचा अध्यक्ष आहे. या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा, महाविद्यालयामध्ये येत्या वर्षभराच्या कालावधीत कशा प्रकारे संस्थेचे कामकाज केले पाहिजे. त्यावर चर्चा झाली. शरद पवार हे सर्वांचे असून शरद पवार हे आमच्या घरातील व्यक्ती आहेत. राजकारण हा विषय कायम नसतो आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडू नये, तसेच शरद पवार, माझे वडील स्व. विठ्ठल तुपे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करीत आलो आहे. मी यांच्याकडून एक शिकलो आहे. ते म्हणजे महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. राजकारण हा एक महिन्यापुरता विषय असतो. त्यामुळे एक महिन्यापुरतं राजकारण करायच असतं, त्यानंतर विकासाच्या दृष्टीने पावले टाकायची असतात," अशी भूमिका आमदार चेतन तुपे यांनी मांडली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121