शशिकांत किणीकर : भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात रमून गेलेले स्मरणयात्री!

    14-Dec-2024
Total Views | 45
shashikant kinikar
(मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले (उजवीकडे) यांच्या समावेत शशिकांत किणीकर.)


भारतीय चित्रपटसृष्टीतील इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक शशिकांत किणीकर यांचे नुकतेच वयाच्या ८३व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. १९७५ ते १९८५ या काळात दै. ‘तरुण भारत, पुणे’ आवृत्तीमध्ये किणीकर यांचे चित्रपटसृष्टीविषयी अभ्यासपूर्ण लेखन प्रसिद्ध होत असे. त्या काळातील दै. ‘तरूण भारत, पुणे’चे चित्रपट समीक्षक विजय सबनीस यांनी शशिकांत किणीकर यांचे व्यक्तिमत्त्व आणि चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीला दिलेला हा उजाळा...

भारतीय चित्रपटसृष्टीचे हे १११वे वर्ष. (पहिला भारतीय चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ दि. ३ मे १९१३ रोजी या दिवशी प्रदर्शित झाला. १९१३ ते २०२४ अशी ही १११ वर्षे.) या प्रदीर्घ काळात चित्रपट या कलाप्रकाराने भारतीयांच्या कित्येक पिढ्यांचे मनोरंजन केले. अभिनेते, अभिनेत्री, गीते आणि संगीतकार, संगीतकार, दिग्दर्शक आणि या सार्‍याभोवती लपेटलेले ‘ग्लॅमर’-अबालवृद्ध रसिक भारतीयांच्या भावविश्वात यांचे एक खास स्थान आहे. आत्ताच्या संगणकयुगात अनेक नवी रंजनमाध्यमे भोवताली निर्माण झालेली असली, तरी भारतीय चित्रपटसृष्टीचे स्थान अजून अढळ आहे.

चित्रपटनिर्मितीची संख्या वाढू लागली, तसा या विश्वाचा इतिहास निर्माण होऊ लागला. या इतिहासातील घडामोडी, त्यांचा क्रम, काळ, संदर्भ, त्यातील नाट्य-याचे संशोधन करणारे ‘चित्रपट अभ्यासक’ लिहू लागले. ‘नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ आणि त्यापाठोपाठ ‘नॅशनल फिल्म अर्काईव्ह’ (राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय) या दोन संस्था पुण्यात १९६१ साली आणि १९६४ साली अशा पाठोपाठ सुरू झाल्या. चित्रपटसृष्टीचा सर्व अंगाने अभ्यास या राष्ट्रीय संस्थांमध्ये सुरू झाला. त्यातून पुढे आली ‘चित्रपट अभ्यासक’ अशी लेखकांची पिढी. बापू वाटवे, खंडेराव केळकर, इसाक मुजावर, वसंत भालेकर, भास्करराव धारप, अरूण पुराणिक, चंद्रकांत जोशी, फिरोज रंगूनवाला, बी. डी. गर्ग, माणिक प्रेमचंद असे मराठी-इंग्रजीत-हिंदीत लेखन करणारी ही काही नावे. १९१३ ते १९७० साली मूकपट व बोलपट, कृष्णधवल ते रंगीत चित्रपट अशा स्थित्यंतरावर अभ्यासपूर्वक संदर्भांसह लिहिणार्‍या या पिढीतील एक ज्येष्ठ नाव म्हणजे शशिकांत किणीकर!

मूकपटांपासून ते बोलपटापर्यंतच्या निर्मितीतील मूळ छायाचित्रे, बुकलेट्स, पद्यावल्या, पोस्टर्स यांचा अद्ययावत असा अफाट संग्रह करणारे आणि या संग्रहाचा लाभ अनेक उपक्रमांमध्ये देण्यासाठी उत्साहाने पुढे येणारे, मराठी-इंग्रजी-हिंदी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे शशिकांत किणीकर. बाबूराव पेंटर, दादासाहेब तोरणे, नौशाद, जयराज, मधुबाला, बिमल रॉय, चंद्रकांत गोखले, नर्गीस, मीनाकुमारी, किशोरकुमार, मदनमोहन यांच्यावर पुस्तके लिहिणारे शशिकांत किणीकर...

दिवाळीपूर्वी दि. ३० ऑक्टोबर रोजी त्यांचे वयाच्या ८३व्या वर्षी, अमेरिकेत त्यांच्या मुलाच्या घरी, सर्व कुटुंबीयांसमावेत राहात असताना, अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त अगदीच अनपेक्षित होते. कारण, तीन दिवस आधी किणीकरांचा मला दिवाळीच्या शुभेच्छा देणारा फोन आला होता. अमेरिकेतील हवामान, त्यांची प्रकृती आणि दैनंदिन दिनचर्या व महत्त्वाचे म्हणजे, सध्या चालू असणारे त्यांचे नवे लेखन यावर छान आणि सविस्तर बोलणे झाले होते अन् पाठोपाठ आलेली त्यांच्या निधनाची दु:खद बातमी!

शशिकांत किणीकरांची माझी पहिली भेट आणि नंतर वाढत गेलेला संपर्क आठवला. ‘तरुण भारत’ दैनिकाच्या पुणे आवृत्तीमध्ये मी चित्रपट सदर आणि परीक्षणे लिहित असे. एक दिवस ते मला ऑफिसमध्ये फोनवर वेळ घेऊन येऊन भेटले. उंच मात्र भक्कम देहयष्टी, ठळकपणे जाणवणारे मोठे कपाळ, पांढरा फूल बुशशर्ट आणि पॅन्ट आणि बूट असा वेश. १९७९ साली ‘प्रभात फिल्म कंपनी’ या आता अस्तित्वात नसणार्‍या, परंतु मराठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील मूल्यवान असे चित्रपट निर्माण करणार्‍या संस्थेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण अशा घटनेच्या निमित्ताने ‘तरुण भारत’चा ‘प्रभात फिल्म’ विशेषांक काढायची कल्पना त्यांनी मांडली. या विशेषांकासाठी ‘प्रभात’ संबंधित मान्यवरांचे लेख, मुलाखती, माहिती, दुर्मीळ छायाचित्रे मिळवून देण्याची त्यांनी तयारी दर्शविली. त्यासाठी पुण्यातील ‘फिल्म इन्स्टिट्यूटर’चे ग्रंथालय, ‘प्रभात कंपनी’च्या विश्वस्तांपैकी दामले, फत्तेलाल, धायबर यांच्या पुढच्या पिढीतल्या व्यक्ती, ‘पूना गेस्ट हाऊस’चे चारूकाका सरपोतदार, बापू वाटवे अशांकडे ते मला घेऊन गेले. त्यांच्याबरोबर मी मुंबईत ‘राजकमल स्टुडिओ’त व्ही. शांताराम, ‘प्रभात’ कंपनीचे गीतकार शांताराम आठवले यांना भेटलो. मुंबईत छायाचित्रे, बुकलेट्स मिळू शकणारी ठिकाणे त्यांनी मला दाखवली.

या विशेषांक आणि त्यानिमित्त कार्यक्रमामुळे किणीकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा मला जवळून परिचय झाला. मूळचे कोल्हापूरचे असणारे, बी.कॉमनंतर पुण्याच्या ‘फिलिप्स इंडिया लि.’ या कंपनीत ‘अंतर्गत लेखापरीक्षक’ म्हणून नोकरी करणार्‍या किणीकरांना जुन्या मराठी/हिंदी चित्रपटसृष्टीतील घडामोडी, विविध चित्रपटांच्या निमित्ताने कलावंतांच्या गाठीभेटी, मुलाखती आणि या सार्‍यातून चित्रपटाचा संदर्भासह तपशीलवार इतिहास मांडण्याचे विलक्षण आकर्षण होते. ते सकाळी ८ वाजता नोकरीसाठी बाहेर पडल्यावर संध्याकाळी ते चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींच्या गाठीभेठी, फिल्म आर्काईव्हच्या ग्रंथालयात वाचन करणे यात मग्न असत. नेहमी पांढरा फुलशर्ट आणि गडद रंगाच्या पॅन्टमध्ये वावरणारे आणि चर्चा रंगू लागताच खिशातून सिगारेटचे पाकीट काढून खुणेने समोरच्याला सिगारेटबद्दल विचारून, स्वत:ची सिगारेट पेटवून तिचा आस्वाद घेत तासन्तास चित्रपटसृष्टीतल्या घटना मांडण्यात रमणारे शशिकांत किणीकर हे एक आगळेच रसायन होते.

‘चित्रांजली’ या नावाने ते एक फिल्म सोसायटी चालवत होते. सैगलच्या काळातील जुने चित्रपट ते ‘फिल्म इन्स्टिट्यूट’च्या ऑडिटोरियममध्ये दाखवत. सुमारे सहा वर्षे चालवलेली ही ‘चित्रांजली’ फिल्म सोसायटी हा त्यांचा एकखांबी तंबू होता. कोल्हापूर जिल्ह्यातील किणीवाठार या गावचे म्हणून त्यांचे आडनाव ‘किणीकर.’ वडील मुख्याध्यापक, तीन भाऊ आणि दोन बहिणी असे पाच भावंडांचे घर. बालपणी त्यांच्या शाळेतल्या मित्राच्या वडिलांचा गावोगावी ‘टूरिंग टॉकीज’मध्ये जाऊन चित्रपट दाखवायचा व्यवसाय होता. मित्राबरोबर सिनेमाच्या फिल्मची रिळे घेऊन गावोगावी चित्रपट दाखवत ते शनिवार-रविवारी हिंडायचे. त्यांना चित्रपटातले संवाद आणि गाणी तोंडपाठ असत. चित्रपट या कलामाध्यमाचा हा त्यांच्यावरील पहिला संस्कार!

१९५० आणि ६० सालचा तो काळ... बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर अशा ज्येष्ठ दिग्दर्शकांपासून त्यांना अनेक कलाकार जाता-येता दिसत, बोलतही. “घरी मित्र जमवून पेटी वाजवत. शशिकांत सिनेमाची गाणी खूप छान गात असे,” अशी त्याच्या बालपणची आठवण त्यांच्या बहिणीने मला सांगितली. कोल्हापूरातच बी. कॉम. झाल्यावर आणि दोन किरकोळ नोकर्‍यांनंतर ते पुण्यात ‘फिलिप्स कंपनी’तील नोकरीमुळे स्थायिक झाले. त्यांच्या घरापासून ‘फिल्म इन्स्टिट्यूट’ जवळच. त्यामुळे चित्रपटसृष्टीकडे असणारा त्यांचा ओढा वाढत गेला. त्यांचे ते ‘पॅशन’च झाले.

कोल्हापूरमधील चित्रपटविश्वाशी त्यांचा असणारा संपर्क विशेष स्वरूपाचा होता. ‘नॅशनल फिल्म अर्काईव्ह’चे क्युरेटर पी. के. नायर यांना घेऊन ते कोल्हापूरला जात. अनेक जुन्या चित्रपटांची मूळ छायाचित्रे, पोस्टर्स, बुकलेट्स आणि महत्त्वाचे म्हणजे, अनेक ज्येष्ठ कलाकारांच्या गाठीभेटी, मुलाखती घडवून आणून, त्याचा दस्तऐवज ‘अर्काईव्ह’कडे जमा करण्यात त्यांची मोलाची मदत असे. ‘फिल्म इन्स्टिट्यूट’मध्ये ‘आशय फिल्म क्लब’ ग्रूपने ‘कोल्हापूर स्कूल’ नावाचा एक कार्यक्रम केला होता. तेव्हा कोल्हापुरातील अनेक कलाकार, दिग्दर्शकांना किणीकर कोल्हापूरहून कार्यक्रमासाठी घेऊन आले होते.

१९८८ साली ‘सकाळ’ वृत्तपत्र आणि ‘आशय फिल्म क्लब’ आयोजित ‘भारतीय चित्रपटसृष्टीची ७५ वर्षे’ या नावाने गावोगावी फिरवण्यात आलेल्या छायाचित्रे आणि बुकलेट्सच्या प्रदर्शनातील बहुसंख्य गोष्टी किणीकरांच्या संग्रहातून घेतल्या होत्या. ‘मौज प्रकाशना’ने ‘चित्रमय पुलं’ या नावाने पु. ल. देशपांडे यांच्या चित्रपटातील कारकिर्दीवर काढलेल्या पुस्तकातील बहुतेक छायाचित्रे आणि बुकलेट्स किणीकरांनी पुरवलेली होती. ‘प्रभात कंपनी’चे एक संस्थापक विष्णूपंत दामले यांचे व्यक्तिमत्त्व आणि चित्रपटसृष्टीतील योगदान यावर दामले कुटुंबीयांनी बनवलेल्या ‘व्ही. जी. दामले: अनसंग हिरो’ या माहितीपटाच्या निर्मितीत किणीकरांच्या झालेल्या मदतीबद्दल दामले कुटुंबीय आवर्जुन सांगतात.

संगीतकार नौशाद हे किणीकरांचे विशेष अभ्यासाचे आणि आवडीचे संगीतकार. हिंदी सिनेमासिकातील नौशाद यांची क्रमवार प्रसिद्ध होणारी माहिती वाचून त्यांना मराठीमध्ये नौशाद यांची आत्मकथा लिहिण्याची कल्पना सुचली. नौशाद यांच्या अनेक मुलाखती घेऊन त्यांनी ‘दास्तान-ए-नौशाद’ ही आत्मकथा लिहिली. त्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात स्वत: नौशाद यांच्या उपस्थितीत, पं. जसराज यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाची नंतर अनेक भाषांतरे झाली. किणीकरांचे ‘फिल्मोग्राफी ऑफ मराठी फिल्म्स’ हे मराठी चित्रपट सूची संदर्भातले पुस्तक मराठी चित्रपट रसिकांसाठी आणि अभ्यासकांसाठी पायाभूत मानले जाते. त्याचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्या विविध भाषांमधील चित्रपटविषयक पुस्तकांची संख्या ५० एवढी आहे.

भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्ती आणि घटनांमधील बारकाव्यांचा सातत्याने शोध घेणार्‍या किणीकरांनी अशा अनेक गोष्टींचे दस्तावेजीकरण करत व्यापक लेखन मराठी आणि इंग्रजीतून केले. प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक फिरोज रंगूनवाला यांच्याबरोबर त्यांची नेहमी माहितीची देवाणघेवाण चाले. मराठी व इंग्रजी प्रकाशनांमध्ये लेखन करणार्‍या किणीकरांचे मराठीतील ‘मोहिनी’ मासिकात प्रसिद्ध होणारे चित्रपटविषयक लेखन विशेष लोकप्रिय होते. लेखनाखेरीज हळूहळू अनेक गावांमधील व्यासपीठांवरून, ग्रंथालयांच्या व्याख्यानमालांमधून किणीकर त्यांच्या व्याख्यानांमधून चित्रपटक्षेत्रातील दिग्गजांविषयी माहिती सांगू लागले. अमेरिकेत मुलाकडे असताना न्यू जर्सी येथील रेडिओ केंद्रावर त्यांना भारतीय चित्रपटांपैकी हिंदी व मराठी चित्रपटसंगीतावर बोलण्यासाठी निमंत्रित केले होते.

चित्रपटविषयक जुन्या लेखांचे, नियतकालिकांचे वाचन, ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास आणि या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या मुलाखती यामधून त्यांनी संशोधनाअखेर चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळाबद्दल त्यांची संशोधनपर मते आग्रहपूर्वक मांडली होती. त्यांच्या मते, “पहिला भारतीय चित्रपट कै. दादासाहेब फाळके यांचा १९१३ साली प्रदर्शित झालेला ‘राजा हरिश्चंद्र’ नसून १९१२ साली प्रदर्शित झालेला कै. दादासाहेब तोरणे यांचा ‘पुंडलिक’ हा होता.” तसेच, पहिला मराठी बोलपट हा, किणीकरांच्या मते, “अयोध्येचा राजा’ नसून ‘तुकाराम उर्फ जय हरी विठ्ठल’ हा होता.” किणीकरांच्या मते, “पहिला मराठी विनासंगीत चित्रपट ‘ठकीचे लग्न’ (१९३५) हा होता. प्रत्यक्षात हे श्रेय ‘नव जवान’ (१९३७) या चित्रपटाला दिले जाते.” आपली ही मते किणीकर आग्रहपूर्वक अनेक व्यासपीठांवर मांडत. त्यावर नेहमी वाद होत असे.

किणीकर यांच्या निधनानंतर पुण्यातील बावधन भागातील त्यांच्या घरी मी भेट दिली. भारतीय चित्रपटांचा विविध अंगांनी अभ्यास मांडणारे ग्रंथ, पुस्तके आणि विविध घटना प्रसंगांची छायाचित्रे, त्यांना मिळालेला विविध सन्मानचिन्हे यांनी अनेक कपाटे भरलेली आहेत. त्यांच्या व्यापक व्यासंगाची कल्पना या सार्‍यातून येते.

निधनाआधी तीन दिवस माझ्याशी फोनवर बोलताना किणीकरांनी ‘राज कपूरच्या जीवनावर लेखन चालू असल्याचे, त्यातून सर्वसामान्य जनास व नव्या पिढीस त्याची माहिती होईल,’ असे आवर्जन सांगितले होते. त्यांचा हा लेखनप्रपंच असा अखेरपर्यंत चालू होता.

नौशाद यांच्यावरील पुस्तकाच्या प्रस्तावनेअखेर किणीकरांनी लेखनामागची त्यांची भूमिका मांडणारा, संत तुकारामांचा अभंग उद्धृत केला आहे, तो पुढीलप्र्रमाणे -

फोडिले भांडार धन्याचा हा माल।
मी तव हमाल भारवाही॥
भारतीय चित्रपसृष्टीच्या पहिल्या ६० वर्षांच्या सुवर्णकाळात रमून गेलेल्या या स्मरणयात्रीस विनम्र अभिवादन!

विजय सबनीस
९८८१०९९०५८
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121