मुंबई : “दररोज ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उद्देशाने ‘एसटी’ महामंडळ ( ST Bus ) गेली ७६ वर्षे काम करीत असून, रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी चालकांचे सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचे मानसिक आरोग्य सुद़ृढ करणे, या बरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बसेस उपलब्ध करून देणे, या त्रिसूत्रीवर यापुढे भर देण्यात येत असून, प्रवाशांची सुरक्षितता हेच ‘एसटी’चे अंतिम ध्येय राहील,” असे प्रतिपादन ‘एसटी’चे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी केले.
भंडारा व नाशिक येथे झालेल्या ‘एसटी’च्या अपघाताबरोबरच नुकत्याच बेस्ट चालकाकडून घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष गोगावले यांनी ‘एसटी’ महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये प्रवाशांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने चालक प्रशिक्षण, चालकांची निवड चाचणी, चालकाचे मानसिक आरोग्य याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष वाहन उपलब्ध करून देण्याबद्दल सखोल चर्चा करण्यात आली. सध्या ‘एसटी’ महामंडळाच्या चालकांना अपघात होऊ नये, यासाठी दर सहा महिन्यांनी उजळणी प्रशिक्षण दिले जाते.
या प्रशिक्षणामध्ये चालकांच्या मानसिक आरोग्याबरोबरच त्यांचे बस चालवण्याचे कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो. त्यानंतर प्रत्यक्ष वाहन-चालन चाचणी घेऊन त्यांना पुनश्च सेवेमध्ये दाखल केले जाते. तसेच, कर्तव्यावर असताना संबंधित चालकाने नशापान न करणे याचे काटेकोर पालन केले पाहिजे. हीच पद्धत ‘एसटी’कडे कार्यरत असलेल्या खासगी चालकांनादेखील वापरण्याच्या सूचना अध्यक्ष गोगावले यांनी ‘एसटी’ प्रशासनाला दिल्या.
वेळेत बसेस न पुरवण्यार्या संस्थाना कारणे नोटिसा
“सध्या ‘एसटी’ महामंडळाकडे १४ हजार बसेस असून, उपलब्ध प्रवाशांसासाठी त्या अत्यंत अपुर्या पडत आहेत. त्यापैकी अनेक बसेस अत्यंत जुन्या झाल्या आहेत. तसेच, काही बसेस कालबाह्य होण्याच्या उंबरठयावर आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता निविदा पात्र संस्थांनी नवीन बसेस वेळेत पुरवठा करणे अत्यंत आवश्यक होते. तथापी, त्या संस्था बसेस पुरविण्याबद्दल सक्षम का नाहीत?, याची शहानिशा करून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून द्यावी,” असे निर्देश अध्यक्ष गोगावले यांनी ‘एसटी’ प्रशासनाला दिले.
महामंडळाचा लवकरच भाडेवाढीचा प्रस्ताव
कर्मचार्यांचे वाढते वेतन, इंधनाचा वाढता दर, टायर आणि बसचे सुट्या भागांची वाढती किंमत विचारात घेऊन २०२१ पासून प्रलंबित असलेली ‘एसटी’ची तिकीट भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर केला जाईल, अशी माहिती अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली. यावेळी ‘एसटी’ महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व ‘एसटी’चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.