ज्ञानचक्षू हवेत

    31-Oct-2024
Total Views |

samarth ramdas swami
सद्वस्तू निराकार आहे हे खरे. परंतु, तिच्या आधारावर ब्रह्मदेव, विष्णू, महेश यांना आपली कार्ये करता येतात. चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या सद्वस्तूतून आवश्यक तेवढे चैतन्य घेऊन, देव पृथ्वीतलावर मानवी देह धारण करुन अवतार घेतात आणि आपले कार्य झाले की, पुन्हा सद्वस्तूत विलीन होतात. विवेकाच्या साहाय्याने दृश्यवस्तू, मीपणा अर्थात देहबुद्धी, अहंकार बाजूला सारुन सर्वत्र व्यापून उरलेल्या, परब्रह्मवस्तूचा आपण शोध घेऊ शकतो. अन्यथा नुसत्या वर्णनावरुन सद्वस्तू जाणता येत नाही. कारण, वेदही सद्वस्तूचे, परब्रह्माचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत. आपल्या सारख्या सामान्य माणसांना सद्वस्तूचे अलौकिकत्व समजणे शक्य नाही. आपल्या दृष्टीला सदैव आकारयुक्त भौतिक वस्तूंचे ज्ञान आपल्या डोळ्यांनी होत असते. त्यामुळे ‘परमेश्वर आहे ना, मग तो आम्हाला दाखवा’ असे म्हणणारे महाभाग काही कमी नाहीत. या सार्‍यांसाठी ब्रह्मवस्तू कशी पाहता येईल, हे आता स्वामी पुढील श्लोकातून सांगत आहेत.
 
जगीं पाहतां चर्मचक्षीं न लक्षे ।
जगीं पाहतां ज्ञानचक्षीं न रक्षे ।
जगीं पाहतां पाहणें जात आहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥१४९॥
 
जे अनंत आहे, म्हणजे ज्याला अंत नाही, शेवट नाही असे परब्रह्मतत्व शोधण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. परब्रह्मतत्व नुसते अनंत आहे असे नसून ते कायम टिकणारे, चिरंतन तत्व आहे. ते काल होते, आज आहे, उद्याही दीर्घकालापर्यंत राहणारे आहे. अशा ‘संत आनंत’ सद्वस्तूचा शोध घ्यायला स्वामी सांगत आहेत. मागच्या तीन श्लोकांतून स्वामी सातत्याने हा उपदेश करीत आहेत. कारण, स्वामींच्या मते आपण क्षणभंगूर अशाश्वत दृश्यवस्तूत, आनंदाचा शोेध घेत वणवण भटकत असतो. पण, तो काही सापडत नाही. जगातील दृश्यवस्तूंचा अशाश्वताचा मागोवा घेताना, माणसाला क्षणिक सुखाचा भास होत असला तरी, अखेरीस नैराश्य पदरी पडते. तथापि माणसाने सन्मार्गाने शुद्ध आचरण ठेवत विवेक वैराग्याच्या साह्याने अखंड समाधानाची अवस्था प्राप्त करुन, देणार्‍या परब्रह्माचा शोध घेता येईल, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. आपल्या सभोवती दिसणारे दृश्य जगत विघटनशील असल्याने, नाश पावणारे आहे. आज जे दिसते ते कायमस्वरुपी टिकणारे नाही. केव्हा ना केव्हा तरी विघटीत होऊन जाणार आहे. नष्ट होणार आहे. हे यापूर्वी सांगून झाले. नैसर्गिक आपत्तीबद्दल बोलताना स्वामींनी निरीक्षण नोंदवले आहे की, ‘अकस्मात आकारले काळ मोडी’ तरी काही लोक अहंभावाने, सद्वस्तू प्रत्यक्षात दाखवा असा अट्टाहास धरुन बसले आहेत. अशा अज्ञानी लोकांचे शंका निरसन झाले पाहिजे, म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले स्वामी सांगताहेत की, जगामध्ये सद्वस्तू म्हणजे ब्रह्मतत्व पाहायचे असेल, तर ते तुझ्या देहाला प्राप्त झालेल्या डोळ्यांनी दिसणारे नाही. त्यासाठी वेगळी ज्ञानदृष्टी असावी लागते. त्या ज्ञानदृष्टीद्वारा तुला ब्रह्मतत्व पाहता येईल, जाणून घेता येईल.
 
सर्वसाधारणपणे, आपल्या देहाच्या डोळ्यांना जे दिसते ते खरे मानण्याकडे माणसाची प्रवृत्ती असते. त्यामुळे दृष्टीला जे दिसत नाही, तो केवळ कल्पनेचा खेळ आहे असे मानले जाते. हे भौतिक विज्ञानात योग्य असेलही. परंतु, परमार्थज्ञानात शाश्वाताचे आकलन करताना, भौतिकविज्ञानाचे नियम चालत नाहीत. परमार्थज्ञानापेक्षा भौतिकज्ञान मिळवण्याची पद्धतच वेगळी आहे. भौतिकशास्त्रात आपला इंद्रियजन्य ज्ञानावर भरवसा असतो. पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे इत्यादी माध्यमातून आपण वस्तू जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या क्रिया इंद्रियाधिष्ठित असतात. त्यामुळे इंद्रियांद्वारा मिळणारे भौतिकज्ञानही खरे असतेच असे नाही. ऐकणार्‍याच्या मनस्थितीवर ऐकणे अवलंबून असते. रागावलेल्या माणसाला ऐकलेले शब्द नीट कळत नाहीत. डोळ्यांनी पाहणेही भ्रामक असू शकते. वेगवान गाडीत बसल्यावर खिडकीतून पाहताना, दूरवरची झाडे उलट्या दिशेने पळताना दिसतात. मृगजळाच्या उदाहरणात दृष्टीवर अजिबात विश्वास ठेवता येत नाही. तसेच, तर्काने मिळणारे ज्ञानही खरे असतेच असे नाही. तर्काची गृहिते बदलली की, वेगळी उत्तरे मिळतात. तर्कशास्त्रात तर्क करणारी बुद्धी मुळात इंद्रियज्ञानावर अवलंबून असल्याने, त्यातून निष्पन्न झालेले अनुमान योग्य असेलच असे सांगता येत नाही. थोडक्यात भौतिकज्ञानप्राप्तीच्या उपपत्ती, निष्कर्ष, नियम अध्यात्मज्ञानात उपयोगी पडत नाहीत. अध्यात्मज्ञानात अनुभूतीची एक वेगळी ज्ञानदृष्टी संपादन करावी लागते. म्हणून स्वामी या श्लोकात सांगत आहेत की, चर्मचक्षूंनी नव्हे, तर ज्ञानदृष्टीने सद्वस्तू पाहता येते.
 
काहीवेळा स्वामींच्या शब्दरचनेचा अर्थ उलगडताना, वाड्मय अभ्यासकांनाही निश्चितार्थ शोधायला कठीण जातो. या श्लोकाच्या दुसर्‍या ओळीत स्वामी म्हणतात, ‘जगीं पाहतां ज्ञानचक्षीं न रक्षे’ स्वामींना सांगायचे आहे की, सद्वस्तू, परब्रह्म हे देहाच्या डोळ्यांनी पाहता येईल अशी दृश्यवस्तू नाही. ती ज्ञानचक्षूंनी समजून घेता येईल. स्वामींना अभिप्रेत असा हा अर्थ समजला तरी, श्लोकाच्या ओळीतील ‘नरक्षे’ या शब्दातून स्वामींना नेमके काय सांगायचे आहे, याचा उलगडा होत नाही. समर्थ वाड्मयाचे अभ्यासक, श्री.ल.रा.पांगारकर, प्रा.के.वि.बेलसरे यांनी ‘नरक्षे’ याचा अर्थ पाहता येत नाही असा लावला आहे. श्री. ह. नी. परांजपे यांच्या मते, नरक्षे हा शब्द ‘निरिक्षे’ अशा अर्थी आला असावा. म्हणजे ज्ञानचक्षूंनी सद्वस्तूचे निरीक्षण करता येते, असे स्वामींना म्हणायचे असेल. असे ते म्हणतात. माझ्यामते, पांगारकर, बेलसरे प्रभृतींनी लावलेला अर्थ बरोबर आहे. पण, ‘नरक्षे’ हा शब्द ज्या ओळीत आला, तो त्याच्या पुढच्या ओळीशी जोडलेला असावा. त्यात स्वामी म्हणतात की, ‘जगी पाहता पाहणें जात आहे.’ जगातील दृश्यवस्तू पाहताना, पाहणारा द्रष्टा व पाहायचे ते दृश्य हे भिन्न असतात. तथापि सद्वस्तू ज्ञानचक्षूने पाहताना, द्रष्टा व दृश्य एकच होऊन जातात. पाहणारा ब्रह्मवस्तू झाल्याने, द्रष्ट्याला वेगळेपणाने सद्वस्तू पाहता येत नाही. स्वामी म्हणतात त्याप्रमाणे पाहणेच शिल्लक उरत नाही. ज्ञानचक्षूंनी परब्रह्म पाहायला गेले असता, ज्ञानचक्षूच परब्रह्म झाल्याने त्यांना वेगळे अस्तित्व उरत नाही. अध्यात्मिक परिभाषेत असे म्हणतात की, ‘मला ’ब्रह्मज्ञान’ झाले आहे’ असे जर कुणी म्हणाला, तर त्याला ‘ब्रह्मज्ञान’ झाले नाही असे निश्चित समजावे. कारण, ब्रह्मज्ञान होणारा ‘मी’ आणि ‘ब्रह्मज्ञान’ या दोन वेगळ्या कल्पना ब्रह्मज्ञानात संभवत नाहीत. ब्रह्मज्ञानाची ही अजब तर्‍हा आहे. म्हणून स्वामी म्हणतात, सद्वस्तू पाहताना पाहणे निघून जाते. (पाहणे जात आहे) अखंड समाधानाची अवस्था प्राप्त करुन घेण्यासाठी श्रद्धेने, निष्ठेने प्रयत्नपूर्वक सद्वस्तूचा शोध घेतला पाहिजे. असे स्वामींनी या अभ्यासगटाच्या प्रत्येक श्लोकाच्या शेवटच्या ओळीत सांगितले आहे.
सुरेश जाखडी
७७३८७७८३२२