अभिनंदन सु-शीलजी!

    23-Oct-2024   
Total Views | 126
 
 
Shushilkumar Shinde
 
“मला माझ्या पक्षाने ‘भगवा दहशतवाद’ होत असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच पक्षाच्या सांगण्यावरून मी तो शब्द वापरला. मी तेव्हा ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द वापरला, पण हा शब्द का वापरला हे मलाही माहीत नाही.” सर्वप्रथम सुशीलकुमार शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्रातील ते पहिल्या श्रेणीचे राजनेते आहेत. आज महाराष्ट्रात राजनेते ज्याप्रकारे शब्दांचे बॉम्बगोळे फेकत असतात, त्यात सुशीलकुमार शिंदे यांचे नाव येत नाही, ते यापासून अलिप्त आहेत. नावातील ‘सु-शील’ त्यांनी जपले आहे.
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या एका वक्तव्याची बातमी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या दि. २१ ऑक्टोबर रोजीच्या पहिल्या पानावर वाचनात आली. सुशीलकुमार शिंदे यांनी ‘युपीए-२’ सरकारच्या काळात ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग केला होता. आता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे की, “मी तेव्हा हा शब्द वापरायला नको होता.”
 
युट्यूबवर सुशीलकुमार शिंदे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांना ‘भगवा दहशतवाद’ या शब्दाच्या वापराबाबत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, “मला माझ्या पक्षाने ‘भगवा दहशतवाद’ होत असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच पक्षाच्या सांगण्यावरून मी तो शब्द वापरला. मी तेव्हा ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द वापरला, पण हा शब्द का वापरला हे मलाही माहीत नाही.”
 
सर्वप्रथम सुशीलकुमार शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्रातील ते पहिल्या श्रेणीचे राजनेते आहेत. आज महाराष्ट्रात राजनेते ज्याप्रकारे शब्दांचे बॉम्बगोळे फेकत असतात, त्यात सुशीलकुमार शिंदे यांचे नाव येत नाही, ते यापासून अलिप्त आहेत. नावातील ‘सु-शील’ त्यांनी जपले आहे. पहिल्या श्रेणीचा राजकारणी कितीही गाढवपणा केला, तरीही ‘मी गाढवपणा केला,’ असे तो म्हणत नाही. ‘माझे वक्तव्य चुकले,’ असे त्याच्या तोंडातून अपवादानेदेखील येणार नाही. याउलट, ‘मी जे काही बोललो तेच कसे बरोबर आहे,’ याचा युक्तिवाद तो करीत राहतो. राहुल गांधी यांचा या बाबतीत विक्रम आहे. बेताल बडबड श्रेणीतील नेत्यांतील ते अग्रदूत आहेत.
 
सुशीलकुमार शिंदे यांनी “भगवा दहशतवाद’ असे मी बोलायला नको होते,” असे म्हटले. हे त्यांचे वाक्य वाचून फार बरे वाटले. ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द अतिशय घातक आहे आणि या शब्दाचे जनक आहेत, ‘जाणता राजा’ शरदराव पवार! त्यांच्याविषयी माजी खासदार बलबीर पुंज यांचा एक छोटा लेख इंटरनेटवर आजही उपलब्ध आहे. त्याचा अनुवाद असा, ‘हिंदू दहशतवाद’ एक दंतकथा - बाबरी मशिदीच्या ध्वंसानंतर ’सेक्युलर’ लोकांना ’हिंदू दहशतवाद’चा चरखा फिरवण्याची संधी मिळाली. ही नाविन्यपूर्ण कल्पना आणि संज्ञा जन्माला घालणारा माणूस म्हणजे ’अदम्य’ शरद पवार, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि देशभरातील ’सेक्युलरिस्टांचे’ पोस्टर बॉय. दि. १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या अनेक बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली आणि या स्फोटांनी रक्त, विनाश आणि दहशतीची चिन्हेच मागे सोडली. त्या दिवशी दुपारी १.३० वाजता मुंबई शेअर बाजारात पहिला बॉम्बस्फोट झाला. या स्फोटांनी शहरातील सर्वाधिक गर्दीची ठिकाणे हादरली आणि हे स्फोट पुढे ३.४० वाजेपर्यंत म्हणजे दोन तासांपेक्षा जास्त काळ चालले. शिवसेना भवनालाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. बॉम्बस्फोटांनी प्रभावित झालेल्या इतर ठिकाणांमध्ये माहिम कॉजवे येथील कोळ्यांची वस्ती, झवेरी बाजार, प्लाझा सिनेमा, सेंच्युरी बाजार, कथ्था बाजार, हॉटेल सी रॉक, एअर इंडिया इमारत, हॉटेल जुहू सेंटॉर, प्रादेशिक पारपत्र कार्यालय (रिजनल पासपोर्ट ऑफिस) आणि सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचा समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये ३०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि १ हजार, ४०० हून अधिक जखमी झाले. या एकूण १२ बॉम्बस्फोटांनी देशाची आर्थिक राजधानी उद्ध्वस्त केली. ‘इंडिया टुडे’ या मासिकाच्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर लगेचच शरद पवार यांनी दूरदर्शन स्टुडिओकडे धाव घेतली आणि ‘एकूण १३ स्फोट झाले आहेत,’ असे जाहीर केले. 13वा स्फोट मस्जिद बंदर येथे झाला आहे, असा दावा त्यांनी केला. या बॉम्बस्फोटांना बळी पडलेले निष्पाप हिंदू आणि स्फोट घडवून आणणारे खरे गुन्हेगार मुस्लीम या दोहोंमध्ये बॉम्बस्फोटाचे पाप समसमान वाटले जावे, यासाठी हे धादांत खोटे पसरवले गेले. त्यानंतर १३व्या स्फोटाचीही दंतकथा तयार करण्यात आली, ज्यामध्ये हिंदूंना गुन्हेगार आणि मुस्लिमांना पीडित ठरवले गेले. शरद पवारांनी मुस्लीम आणि हिंदूंची प्रतिमा एकाच ब्रशने मलीन करण्यासाठी या १३व्या काल्पनिक स्फोटाचा शोध लावला. हे ’सेक्युलरांच्या’ प्लेबुकमधील फक्त एक पान आहे. अशाप्रकारे ’भगव्या दहशतवादा’च्या दंतकथेचा जन्म झाला; जी त्यानंतरच्या ‘युपीए-१’ आणि ‘युपीए-२’ सरकारमधील दोन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम आणि सुशीलकुमार शिंदे यांनी संपूर्ण संकल्पनेत विकसित केली. २०१६ मध्ये मुंबई बॉम्बस्फोटांनंतर २३ वर्षांनी पुण्याहून १५ किमी अंतरावर पिंपरी येथील ज्ञानोबा-तुकाराम नगरीच्या हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक्स मैदानावर ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान एका कार्यक्रमात बोलताना, शरद पवार यांनी कबूल केले की, त्यांनी १३व्या बॉम्बस्फोटाची दंतकथा जन्माला घातली. कारण, वास्तविक सर्व बॉम्बस्फोटांनी हिंदू भागांचा विद्ध्वंस केला होता. श्रीकृष्ण आयोगासमोर साक्ष देतानाही पवारांनी बॉम्बस्फोटांसाठी ‘एलटीटीई’ला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्नही केला होता. हिंदू-मुस्लीम संघर्ष टाळण्यासाठी हे खोटे सांगितले गेले, असा त्यांचा दावा होता. ’लेफ्ट-लिबरल’ ‘नॅरेटिव्ह’च्या पायावर उभी राहिलेली भारतीय ’सेक्युलॅरिझम’ची इमारत दुर्दैवाने अशा धादांत खोटेपणावर उभारलेली आहे.
 
शरदराव पवार यांचे राजकारण कोणत्या स्तराचे आहे, याचा बोध वरील परिच्छेदावरून वाचकांना करायला हरकत नाही. अशा शरदराव पवारांशी हिंदुहृदयसम्राटांचे सुपुत्र उद्धवजी ठाकरे यांनी मिठी मारलेली आहे. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळावी, यासाठी उद्धवजींनी हा घरोबा निर्माण केला आहे. मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा असणे, यात काही गैर नाही आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी संख्याबळ जमविण्याचे राजकारण करणे, यातही काही गैर नाही. ज्या संसदीय पद्धतीची लोकशाही आपण स्वीकारली आहे, त्या पद्धतीचा हा अपेक्षित परिणाम आहे.
 
परंतु, युती कोणाशी करावी, याचा विवेक केला पाहिजे. मुख्यमंत्रिपदासाठी जर उद्या असदुद्दीन ओवेसीशी हातमिळविणी केली, तर चालेल का? हिंदुहिताचे राजकारण आणि शरदराव पवार यांचे हाडवैर आहे आणि श्रीमान पवारांनी ते कधीही लपवलेले नाही. ते आपल्या मार्गाने निघालेले आहेत. त्या मार्गने उद्धवजींना जाण्याचे काही कारण नाही, हा झाला विवेक. पण, अविवेकीच वागायचे ठरवल्यानंतर विवेकाला काही अर्थ राहत नाही.
 
सुशीलकुमार शिंदे यांच्या धाडसाबद्दलही कौतुक करायला पाहिजे. ते काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेसने ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द काही सोडलेला नाही, असा त्यांनी ठरावही केलेला नाही. ‘द मिथ ऑफ हिंदू टेरर’ या शीर्षकाचे आर. व्ही. एस. मणी यांचे एक पुस्तक आहे. मणी यांनी या पुस्तकात ए. आर. अंतुले, चिदंबरम, दिग्विजय सिंह इत्यादी बड्या नेत्यांची नावे घेतलेली आहेत. तसेच, २००८ सालच्या दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेले हेमंत करकरे यांचेही नाव घेतलेले आहे. ‘हिंदू दहशतवाद’ हा काँग्रेसनेे रचलेला एक भयानक कट होता. या कटातील मुख्य पात्र शरदराव पवार होते.
 
सुशीलकुमार शिंदे यांचे अभिनंदन आणखी एका कारणासाठी केले पाहिजे, ते म्हणजे त्यांनी ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द नाकारताना या शब्दाच्या जनकांनाही अपरोक्षपणे नाकारले आहे. असे करण्यासाठी जसे धाडस लागते, तसेच खोटेपणाचा तिटकाराही असावा लागतो. या दोन्हींचा मिलाप सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यातून व्यक्त झाला आहे, असे मला वाटते.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121