नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकीकृत चाचणी स्थळावरून (आय. टी. आर.) नव्या पिढीच्या आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली.
अत्यंत कमी उंचीवर वेगवान मानवरहित हवाई लक्ष्याविरूद्ध ही उड्डाण-चाचणी घेण्यात आली. उड्डाण-चाचणीदरम्यान, शस्त्र प्रणालीद्वारे लक्ष्याचा यशस्वीरित्या वेध घेऊन ते नष्ट केले गेले. यामुळे स्वदेशी विकसित रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर, लॉन्चर, मल्टी-फंक्शन रडार आणि कमांड, कंट्रोल आणि कम्युनिकेशन प्रणालीसह क्षेपणास्त्राचा समावेश असलेल्या संपूर्ण शस्त्र प्रणालीच्या कार्यास मान्यता मिळाली आहे.
आय.टी.आर. चांदीपूरने तैनात केलेल्या अनेक रडार, टेलीमेट्री आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग प्रणालीद्वारे मिळवलेल्या माहिती आधारे देखील प्रणालीची कामगिरी प्रमाणित केली गेली आहे. डीआरडीओ, भारतीय हवाई दल, भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आकाश-एनजी प्रणाली ही एक अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ती वेगवान हवाई धोक्यांना रोखू शकते.