भारत हे जगाच्या विकासाचे इंजिन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सुशासन आणि सर्वसमावेशक विकासाची 11 वर्षे
10-Jun-2025
Total Views |
नवी दिल्ली: “भारत ही जगातील सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था असून जागतिक विकासाचे इंजिन म्हणून भारताकडे जग आशेने पाहात आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारने सुशासन आणि सर्वसमावेशक विकासाचे राजकारण सुरू केल्यानेच 140 कोटी भारतीय विकासाच्या यात्रेत सहभागी झाले आहेत,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले आहे.
भाजपप्रणित रालोआ अर्थात मोदी सरकारच्या तिसर्या कार्यकाळाचे एक वर्ष आणि एकूण 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधानांनी ’एक्स’वर रालोआ सरकारच्या सुशासनावर भाष्य केले. ते म्हणाले, “आजचा भारत केवळ सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था नाही, तर हवामान बदल आणि डिजिटल नवोन्मेष यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर एक प्रभावशाली राष्ट्र आहे.
आशा, आत्मविश्वास आणि नव्या निर्धाराने विकसित भारत घडवण्यासाठी 140 कोटी भारतीयांची आगेकूच सुरू आहे. गेल्या 11 वर्षांत देशातील सर्व क्षेत्रांमध्ये अनेक सकारात्मक बदल झाले असून जीवन सुलभता अर्थात ‘इज ऑफ लिव्हिंग’मध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे,” असे पंतप्रधानांनी म्हटले. ’‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हे रालोआ सरकारचे प्रमुख तत्त्व आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “रालोआ सरकारने वेग, व्याप्ती आणि संवेदनशीलतेने अभूतपूर्व बदल घडवून आणले आहेत. आर्थिक विकासापासून ते सामाजिक उत्थानापर्यंत, सरकारने लोककेंद्रित, समावेशक आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिले आहे,” असेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
मोदी सरकारची 11 वर्षे म्हणजे संकल्प, साधना आणि समर्पण : अमित शाह
“गेल्या 11 वर्षांत देशाने आर्थिक पुनरुज्जीवन, सामाजिक न्याय, सांस्कृतिक अभिमान आणि राष्ट्रीय सुरक्षेचे एक नवे पर्व पाहिले आहे. मोदी सरकारने हे सिद्ध केले आहे की, जेव्हा नेतृत्व स्पष्ट असते, संकल्प दृढ असतो आणि हेतू सार्वजनिक सेवेचा असतो, तेव्हा सेवा, सुरक्षा आणि सुशासनाचे नवे विक्रम घडतात. मोदी सरकारची 11 वर्षे राष्ट्रीय सुरक्षेच्या दिशेनेही महत्त्वाची ठरली आहेत. नक्षलवाद शेवटच्या टप्प्यात आहे, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील भागात शांतता प्रस्थापित झाली आहे. भारत आता दहशतवाद्यांच्या घरात घुसून दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देतो. मोदी सरकारच्या काळात भारताचे बदलते चित्र यावरून दिसून येते,” असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.