वाराणसी : तामिळनाडूच्या मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यानंतर सनातन धर्मावर अनेक विधाने समोर येत आहेत. दरम्यान, आता योगगुरू बाबा रामदेव यांनीही सनातन धर्मावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “सनातन धर्माचा अपमान केला जातोय, त्या सर्वांना २०२४ ला मोक्ष मिळेल”, असे विधान बाबा रामदेव यांनी केले आहे. यासोबतच बाबा रामदेव म्हणाले की, काशी हे स्वतःच दिव्य आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीला भव्यता दिली आहे.
वाराणसी दौऱ्यावर पोहोचल्यानंतर बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केलं आहे. योगगुरू बाबा रामदेव यांचे काशी येथे आगमन होताच लाल बहादूर शास्त्री विमानतळावर भाजप खासदार बीपी सरोज यांनी त्यांचे स्वागत केले. नुकतेच बाबा रामदेव वाराणसीला पोहोचले होते आणि त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजाही केली. यावेळी ते ज्ञानवापी प्रकरणाबाबत म्हणाले होते की, न्यायालय जो काही निर्णय घेईल त्याचा आदर केला पाहिजे.
तसेच बाबा रामदेव यांनी भारत विरुद्ध इंडिया प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, भारत म्हणण्यास संकोच करू नये. त्याचबरोबर बाबा रामदेव म्हणाले की- "आपली सनातन संस्कृती प्राचीन काळापासून ओळखली जाते, परंतु इंग्रजांनी गुलामगिरीच्या काळात आपल्या देशाचे नाव इंडिया ठेवले होते." या संपूर्ण वादात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, भारतात अनेक आक्रमक आले आणि गेले, पण सनातन धर्म नेहमीच चमकत राहिला. त्यामुळे सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा.