यंदा पुण्यात 'अयोध्येतील राममंदिरात' बाप्पा विराजमान होणार!

    16-Sep-2023
Total Views |
Pune pandal to showcase Ram Mandir theme

पुणे
: दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही गणेश चतुर्थीची तयारी जोरात सुरू आहे. पण यावेळी गणेश उत्सवाची सजावटी विशेष ठरणार आहेत. यावर्षी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ‘अयोध्येचे राम मंदिर’चा देखावा करणार आहेत. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे १३१ वा गणेशउत्सव साजरा केला जाणार आहे.

दरम्यान या देखाव्याचे उद्धाटन करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच 'श्रीं' ची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे.एकीकडे २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामल्लांची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे या भव्य मंदिराच्या प्रतिकृतीत पुण्यात ६४ कलांच दैवत असणारे गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत.
 
मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. प्रतिकृतीमध्ये २४ खांब व २४ कमानी उभारण्यात येणार आहेत. मंदिराचा मुख्य घुमट १०० फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे १०८ फूट उंच मंदिर असेल. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव ११ कळस असणार आहेत.

मुख्य सभागृहात श्री गणरायाचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी असणार आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये रामायणातील घटनांचा आढावा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात येणार आहे. बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू उभारण्यात येणार आहे. तेथून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल, हे देखील यंदाचे आकर्षण असणार आहे. याशिवाय भगवान श्रीराम, प्रवेशद्वारावर श्री हनुमंत आणि वानरसेनेच्या वानरांच्या प्रतिकृती देखील लक्षवेधी ठरणार आहेत.

सजावट विभागात १०० कारागिर दिवस-रात्र सलग ७५ दिवस कार्यरत राहणार आहेत. मंदिराची प्रतिकृती फायबर मध्ये उभारण्यात येणार असून त्यावर रंगकाम करण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात येत असून यामुळे भाविकांना लांबून देखील सहजतेने श्रीं चे दर्शन घेणे शक्य होणार आहे. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, या देखाव्याच्या सजावटीच्या समुहात १०० कुशल कारागीर आहेत. तसेच या देखाव्याच्या आणि प्रकाशयोजनेचे काम कलादिग्दर्शक अमन विधाते यांच्याकडे होते.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.