रसिका शिंदे-पॉल
मुंबई : दिग्दर्शक ऋषिकेश जोशी एक विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांची प्रमुख भूमिका असलेला 'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून याच निमित्ताने प्राजक्ता माळी हिने महाएमटीबीशी संवाद साधला. याचवर्षी प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना दोन सरप्राईज दिले होते. तिचा स्वत:चा दागिन्यांचा ब्रॅन्ड 'प्राजक्तराज' आणि तिने खरेदी केलेलं कर्जत येथील फार्म हाऊस 'प्राजक्तकुंज'. यानंतर आणखी एक सरप्राईज प्राजक्त घेऊन येणार असल्याची कबूली तिने 'महाएमटीबी'शी बोलताना दिली.
काय म्हणाली प्राजक्ता?
'तीन अडकून सीताराम' या चित्रपटाचे निम्म्याहून अधिक चित्रिकरण लंडनमध्ये झाले आहे. "ज्यावेळी चित्रपटाचे चित्रिकरण सुरु होते तेव्हा 'प्राजक्तराज' हा ब्रॅन्ड लॉंच झाला नव्हता. मात्र, आता परदेशात सर्वाधिक मागणी आपल्या दागिन्यांना आहे. त्यामुळे परदेशात आपल्या पारंपारिक दागिन्यांची मागणी अधिक वाढली तर लवकरच परदेशात देखील प्राजक्तराजची शाखा सुरु करण्याचा विचार नक्कीच आहे", असे प्राजक्ताने म्हटले. याशिवाय 'प्राजक्तराज' आणि 'प्राजक्तकुंज' नंतर पुढे काय असा प्रश्न विचारला असता, "ज्या कारणासाठी आता आपण मुलाखत करत आहोत, त्याच्याच जवळपास जाणारी नवी गोष्ट भेटीला आणणार आहे", असे सुतोवाच प्राजक्ता माळी हिने तिच्या चाहत्यांसाठी दिले आहेत. 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटाच्या निमित्ताने तिच्याशी बातचीत केल्यामुळे प्राजक्ता दिग्दर्शन अथवा लेखक किंवा निर्माती म्हणून समोर येणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
'तीन अडकून सीताराम' या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश जोशी यांनी केले आहे. तर या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे सांच्यासह आनंद इंगळे, विजय निकम, समीर पाटील आणि ऋषिकेश जोशी अशी भलीमोठी कलाकारांची फौज दिसणार आहे.