मुंबई : गेल्या १७ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले होते. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, मनोज पाटील यांनी वेळोवेळी माझ्याकडे मराठा आरक्षणासंदर्भात योग्य ती भुमिका मांडली. मुळात पाटील यांनी वैयक्तिक फायदयासाठी आंदोलन केले नाही. त्यामुळे चिकाटीने आंदोलन केल्या बद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन ही केले.
तसेच ज्यांचा हेतू शुद्ध असतो त्यांच्यामागे जनता खंबीरपणे उभी असते, ह्यांची प्रचिती मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर आपल्याला दिसून येत आहे, असे ही शिंदे म्हणाले. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या आधारावर ३७०० तरुणांना नोकरी शासनाने मिळून दिली. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची भूमिका सरकारची पण आहे, असे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान लाठीचार्ज ही घटना दुर्देवी होती. त्यामुळेच दोषींना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे रद्द केला जाणार असल्याची आश्वासन ही मुख्यमंत्री शिंदेनी दिले. त्याचबरोबर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळाले पाहिजे, अशी सरकारची भुमिका आहे.
दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला आहे. तसेच, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने याआधीच जाहीर केला आहे. त्याशिवाय, ज्यांच्या वंशावळीत कुणबी उल्लेख आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचंही सरकारने मान्य केलं आहे.