ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक आबाळ होऊ नये यासाठी ठाण्यातील बाळकुम येथे उभारण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात दोन आठवड्यात आवश्यक सेवा सुविधा देण्यात येणार. अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. ठाणे व परिसरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी २०१४ रोजी ठाण्यात सुरु करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात असुविधांमुळे बोजवारा उडाल्याने विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या निषेधार्थ 'भाजयुमो'च्यावतीने निदर्शने करून, दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास उपकेंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. याबाबतचे वृत्त दै. मुंबई तरुण भारतने प्रसिद्ध केले होते.
त्यानंतर आ. संजय केळकर यांनी शासकिय विश्रामगृहात तत्काळ मुंबई विद्यापीठाचे उप कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर कुलकर्णी यांनी दोन आठवड्यात सर्व सुविधा उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. या वेळी ठा.म.पा. परिवहन् सदस्य विकास पाटील, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सुरज दळवी, भाजपा उपाध्यक्ष राजीव नारंग,भाजप पदवीधर प्रकोष्ठचे कोकण विभाग प्रदेश सहसंयोजक सचिन मोरे आदी उपस्थित होते.
याबाबत बोलताना आ. केळकर म्हणाले, ठाणे जिल्हा आणि महानगर क्षेत्रातील विद्यार्थ्यांची मुंबईत होणारी पायपीट थांबावी यासाठी, ठाण्यात विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले. यासाठी महापालिकेकडून अवघा एक रुपया वार्षिक भाडे तत्वावर जागा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र येथील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सुविधांचा बोजवारा उडाला आहे.
ठाणे शहराला आणि जिल्ह्याला शैक्षणिक हब बनवण्याचा संकल्प असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील याच शहराचे आणि जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे उपकेंद्रात लवकरच सर्व सुविधा उपलब्ध होतीलच, शिवाय उपकेंद्र अद्ययावत करण्याचा निर्णयही चर्चेत झाल्याची माहिती आ.केळकर यांनी दिली. यासाठी मी स्वत: कामावर लक्ष ठेवून आहे तर आमदार निरंजन डावखरे हे देखील या कामी पाठपुरावा करतील, असेही आ. केळकर म्हणाले.