मुंबई : ”ओबीसी समाजाच्या मनात आपले आरक्षण जाणार किंवा ते काढून घेतले जाणारस, याबाबत जी भीती निर्माण झाली आहे, तसा सरकारचा काहीही हेतू नाही. ओबीसी समाजाने कुठलाही गैरसमज मनात करून घेऊ नये, अशी माझी त्यांना विनंती आहे. दोन समाज एकमेकांच्या समोर येतील, असा कुठलाही निर्णय राज्य सरकार घेणार नाही. आमचे सरकार काहीही झाले, तरी ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला दिली.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा मुद्दा चर्चेत आल्यापासून राज्यातील ओबीसी नेते आणि काही संघटना सक्रिय झाल्या आहेत. काँग्रेससह इतर काही पक्षांनी मराठा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात टिप्पणी केली असून, त्यामुळे दोन्ही समाजात संभ्रम निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि.11 सप्टेंबर रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करताना ओबीसी समाजाला आश्वस्त केले.
व्यापक एकमत होणे गरजेचे!
“जेव्हा राज्यात कुठल्याही समाजाचे निर्णय होतात, तेव्हा त्यांची व्याप्ती पक्षांच्या पलीकडे असते. आता सुरू झालेल्या उपोषण आणि आंदोलनामुळे मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आले असून, इतर काही संघटनांच्याही काही मागण्या समोर आल्या आहेत. अशा प्रश्नांवर राजकारण न करता समाजोपयोगी निर्णय घेणे गरजेचे आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना उपोषणाच्या संदर्भात आवाहन केले असून, सर्वांनी मिळून, यावर निर्णय घेण्याची आज आवश्यकता आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षीय परिघापलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र येऊन व्यापक एकमत तयार करणे आणि निर्णय घेणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे," असेही फडणवीसांनी म्हटले आहे.