पीएमजीपीच्या रहिवाशांना मोठा दिलासा ; मंत्री मंगलप्रभात लोढांच्या प्रयत्नांना यश

दहा कोटींच्या विशेष निधीला मान्यता

    11-Sep-2023
Total Views |
Mangalprabhat Lodha news
 
मुंबई: मुंबई भागातील पीएमजीपी इमारती गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळ पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असून ही प्रतीक्षा आता संपणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि 'म्हाडा'च्या सहकार्यातून पीएमजीपी इमारतींच्या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील ६५ पेक्षा अधिक पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'म्हाडा'च्या वतीने दहा कोटींची निधीची विशेष तरतूद करण्यात आल्याने पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सोमवार, दि. ११ सप्टेंबर रोजी उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विशेष उपस्थितीत पीएमजीपी इमारतींच्या अनुषंगाने ही घोषणा करण्यात आली आहे. वांद्रे येथील 'म्हाडा'च्या कार्यालयात झालेल्या बैठकीत इमारत पुनर्विकास आणि इतर बाबींसाठी म्हाडाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या बैठकीला मुंबईतील पीएमजीपी इमारतींच्या प्रतिनिधींसह मंत्री मंगलप्रभात लोढा, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल तथा म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे हे या बैठकीला उपस्थित होते.


बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, ''मुंबईतील ६५ पेक्षा अधिक पीएमजीपी इमारतींसाठी 'म्हाडा' दहा कोटींच्या विशेष निधीची तरतूद करणार आहे. यामुळे रहिवाशांना तात्काळ दिलासा मिळणार असून पुनर्विकासाला चालना मिळणार आहे. इमारत पुनर्विकासाबाबत रहिवाशांच्या मनात असलेल्या शंका - गैरसमज आणि प्रश्नांची उकल करण्यासाठी 'म्हाडा'ची एक टीम रहिवाशांना सहकार्य करणार आहे. इमारत पुनर्विकासासाठी रहिवाशांना दोन पर्याय देण्यात आले आहेत. रहिवाशांनी आपल्या इमारतीच्या पुनर्विकासाचा आराखडा घेऊन 'म्हाडा'कडे यावे, त्यात आवश्यक असलेले सहकार्य म्हाडाच्या वतीने करण्यात येईल,'' असा विश्वास इमारतीतील रहिवाशांना म्हाडाच्या वतीने देण्यात आला आहे.

लोढांच्या विशेष प्रयत्नांतून कामाला मिळाली गती

उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासासाठी मागील काही दिवसांपासून जातीने लक्ष घालत हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. रहिवाशांची होणारी हेळसांड आणि इमारतींची सद्यस्थिती यामुळे त्रासलेल्या ६५ इमारतीतील हजारो कुटुंबांना लोढा यांच्या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आपल्या मलबार हिल मतदारसंघातील पीएमजीपी इमारतींसाठी आपण आमदार निधीतून तरतूद करणार असल्याचे लोढा यांनी म्हटले असून उर्वरित निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन त्यांनी यावेळी दिले आहे.

पुनर्विकासाला येणार फास्ट ट्रॅकवर - मंगलप्रभात लोढा


पीएमजीपी इमारतींच्या प्रश्नाबाबत एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही 'म्हाडा'च्या सहकार्याने प्रयत्न करत असून रहिवाशांना आपल्या हक्काची घरे लवकरात लवकर देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला पीएमजीपी पुनर्विकासाचा प्रश्न आता फास्ट ट्रॅकवर येणार असून याबाबत महिनाभरानंतर आणखी एक विशेष बैठक घेतली जाणार आहे.''

- मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री, मुंबई उपनगर


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.