ओं देव सवितरेष ते ब्रह्मचारी तं गोपाय स मामृत।
(अश्वलायन गृह्यसूत्र-१/२०/६)
ओं युवा सुवासा:परिवीत स उ श्रेयान् भवति जायमान:।
(ऋग्वेद -३/८/४)
ओं सूर्यस्य आवृतम् अन्वार्तस्व (.....बटू चे नाव)।
अन्वयार्थ
१)सूर्याला संबोधून आचार्य म्हणतात- (देव सवित:!) हे सूर्य देवा! (एष ते ब्रह्मचारी) हा तुझा ब्रह्मचारी आहे. (तं)त्याचे तू (गोपाय) रक्षण कर. (स:) तो (मा मृत )कधीही मरू नये. म्हणजेच सदैव चिरंजीवी राहो!
२) (युवा) नव सामर्थ्याला, युवाशक्तीला धारण करणारा (सुवासा:) सुंदर वस्त्रे परिधान केलेला (परिवीत) यज्ञोपवीत, जानवे ग्रहण केलेला बटू आगात् आला आहे. (उ स) आणि तो (जायमान:) नवीन जन्म धारण करीत म्हणजेच द्वि+ज (द्वितीय जन्म) ही संज्ञा घेऊन (श्रेयान् भवति) पूर्वीपेक्षाही चांगल्या प्रकारे, श्रेयस्कररीत्या उदयास येत आहे.
३) हे ब्रह्मचार्या ! (सूर्यस्य) सूर्याच्या (आवृतम्) चहू बाजूने गोलाकार भ्रमण मार्गाचे (अनु आ वर्तस्व) अनुवर्तन कर, त्याच्या मागोमाग चालत राहा, त्याचे अनुकरण कर!
विवेचन
उपनयन संस्कारामागचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे बालक-बालिकांचा सर्वांगीस विकास साधून त्यांच्या माध्यमाने राष्ट्राला व एकूणच समग्र विश्वाला ब्रह्म, क्षत्र आणि वैश्य वृत्तीने परिपूर्ण अशा सुप्रजेची प्राप्ती! कारण, त्यामुळेच कुटुंब, समाज, देश व जगाची चौफेर प्रगती साधण्याचे सत्कार्य घडणार आहे. उपनयन संस्कारात केल्या जाणार्या सर्व विधींचे सूक्ष्मतेने अध्ययन केले, तर आपणांस निश्चितच असे लक्षात येईल की त्या त्या प्रत्येक प्रसंगातून बटूंना प्रगत होण्यासाठी नवी दिशा मिळते. शुभ संकल्पांनी परिपूर्ण ही प्रतीके त्याला दिव्यत्वाकडे घेऊन जाण्यास प्रवृत्त करतात. आचार्याद्वारे केल्या जाणार्या क्रियांमधून उच्च भावनांसह वैज्ञानिकतादेखील दिसून येते. यासाठीच संस्कारातील सर्व विधींना केवळ अवांतर क्रिया न समजता त्याच्या पाठीमागची भूमिका ग्रहण करणे अगत्याचे ठरते, अन्यथा गतानुगतिकाप्रमाणे त्या केवळ अंधश्रद्धा होऊ लागतात. जसे की आजकाल धार्मिक कर्मकांडात घडत आहे. दुर्दैवाने कोणीही परमार्थिक होण्यास म्हणजेच त्या विधी मागील मूळ संकल्पना किंवा मुलार्थ जाणण्यास तयार नाही. परिणामतः आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विविध धार्मिक संस्कारांवरचा जिज्ञासू व तर्कनिष्ठ नवशिक्षितांचा विश्वासच उडत चाललेला आहे. उपनयनासह इतर सर्व संस्कारांबाबतीत असे होता कामा नये. याकरिता तर्कशुद्धता व वास्तविक सत्य समजून घेणे गरजेचे ठरते.
मागील भागात ब्रह्मचार्याकरवी तीन वेळा जलसमर्पणाची क्रिया करून घेतली गेली. या मागची भावना किती उदात्त आहे पाहा! अगाध अशा ज्ञान-विज्ञानाची परंपरा तशी पूर्वापार आहे. कोणताही जीवात्मा जन्माला येतो, तेव्हा सूक्ष्म शरीरासोबतच ज्ञान व संस्कारांची बिंदू घेऊन येत असतो. पणन संस्कार प्रसंगी ब्रह्मचारी पहिल्यांदा आपल्या ओंजळीत पाणी घेतो, ते त्याचे स्वतःचे जन्मगत स्वाभाविक (उपजत) ज्ञान. या ज्ञानाचा विकास गुरुकुलात राहून बटूंना करावयाचा आहे. स्वतःचे ज्ञानच नसेल, तर आचार्य काहीच करू शकत नाही म्हणून विद्यार्थ्यांना आपल्या संचित ज्ञानात व सद्यज्ञानात प्रयत्नपूर्वक वाढ करावयाची आहे. याकरिता या संस्कारात तो पहिल्यांदा जलरूपी ज्ञान ग्रहण करतो. नंतर आचार्य त्या ओंजळीत आपले पाणी सोडतो. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आचार्य हे आपल्या ज्ञानाची भर टाकतो.
या दोन्ही ज्ञानासाठी विद्यार्थ्याला (ब्रह्मचार्याला) गुरुकुलात राहून अहर्निश प्रयत्न करावयाचा आहे. आळस किंवा प्रमाद न करता मोठ्या कष्टाने सर्व प्रकारची विद्या अधिगत करावयाची आहे. पण या ज्ञानग्रहणाचा उद्देश तरी काय ? कशासाठी गुरू व शिष्यांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेद्वारे ज्ञानाचे शिखर गाठावयाचे? याचे उत्तर शेवटच्या प्रक्रियेत दडले आहे. ओंजळीतील स्वतःचे व आचार्याचे जल जेव्हा तो भूमीवर (ताटात) सोडतो. तेव्हा त्यामागे सार्या पृथ्वीतलावर ज्ञानतत्वे विखुरणे हे सिद्ध होते.ब्रह्मचार्याला केवळ स्वतःची काळजी नाही, तर समाज, राष्ट्र व सबंध विश्वाची चिंता सतावते. ज्या कारणामुळे सारे विश्व अज्ञान, अविद्या व नाना प्रकारच्या दुर्गुणांनी, दोषांनी ग्रासले आहे, त्या सर्वांना ज्ञानतत्त्वांच्या प्रबोधनाच्या माध्यमाने दूर करणे, हे कर्तव्य आणि हेच त्या ब्रह्मचार्याच्या जीवनाचे लक्ष दिसून येते. किती व्यापक संकल्पना आहे ही!
भूमीवर पसरलेले पाणी सूर्य नष्ट होऊ देत नाही. तो त्याला बाष्पीभवनाच्या माध्यमाने ग्रहण करतो. त्याचे मेघमंडळात रूपांतरण होते. हाच सूर्य आपल्या प्रखर किरणांनी मेघांना भेदून तेच घेतलेले पाणी वर्षावाच्या माध्यमाने सार्या भूतलावर पसरवतो. ही क्रिया निरंतर वर्षानुवर्षे चालूच आहे. मग अशा सूर्याचे दर्शन का घेऊ नये ? कोमल मनाच्या ब्रह्मचार्याच्या अंत:करणात सूर्याची ही दातृत्व भावना, उदार दृष्टिकोन व त्याचे इतर गुण ग्रहण करण्याच्या उद्देशानेच सूर्यदर्शनाचा प्रसंग येतो. आचार्य हे आपल्या शिष्याला खुल्या मैदानात घेऊन येतात व आकाशात चमकणार्या सूर्याचे दर्शन करवित त्याला संबोधत म्हणतात-
ओम् देव सवित: एष ते ब्रह्मचारी!
हे सूर्यदेवा, हा तुझा ब्रह्मचारी आहे. याचे रक्षण कर! जीवनाच्या प्रवासातील प्रत्येक प्रसंगी हा त्रिविध दुःखाने संतप्त होता कामा नये. याला कधीही मृत्यू येऊ नये. हा नेहमी दीर्घायुष्य ठरावा. याच प्रसंगात तच्चक्षुर्देवहितं पुरस्तात् शुक्रमुच्चरत्! पश्येम शरदः शतम्! हा मंत्र उच्चारला जातो. गुरुकुलात वास्तव्य करीत असताना ब्रह्मचार्याने आचार्यांसोबतच सूर्याला देखील पाहावे. एखादी वेळी आचार्यांकडूनदेखील प्रमाद घडू शकतो, पण सूर्याकडून कधीही त्याच्या दैनंदिन क्रियेत खंड पडत नाही. तो सतत गतिमान असतो. आपल्या तेजोमय किरणांनी सबंध आसमंताला उजळवतो. म्हणूनच हे सूर्यदर्शन जो सूर्याचे अनुकरण करतो, मग सूर्य त्याचे रक्षण का करणार नाही.
यानंतर शिष्याने आचार्याची प्रदक्षिणा करावी. जसा नभोमंडळातील तो तेजस्वी सूर्य, तसाच गुरुकुल आश्रमातील ज्ञानसूर्य आचार्य, जो की शुद्धाचरणाने व सर्व प्रकारच्या विद्यांनी चमकत असतो, अशा आचार्यांच्या सान्निध्यात राहूनच बटूला आपली सर्वांगीण उन्नती साधावयाची आहे. यासाठी तो आपल्या आचार्यांपासून दुरावता कामा नये. ज्याप्रमाणे घरी लहान मुले आई-वडिलांच्या आजूबाजूला फिरतात. त्याचप्रमाणे ब्रह्मचार्यांनी आपल्या आचार्यांच्या परिघात राहूनच विद्योपार्जन करावे. बटुंनी आचार्यांना सूर्य समजावे आणि स्वतःलापृथ्वी! जशी पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आचार्यांच्या सान्निध्यात परिभ्रमण करीत राहावे व त्यांच्याकडून ज्ञानाने प्रकाशित व्हावे. याप्रसंगी म्हटला जाणारा मंत्र आहे-
ओम् युवा सुवासा: परिवीत आगात्.....जायमान: !
परिवीत म्हणजेच यज्ञोपवीत धारण केलेला ब्रह्मचारी! आज तो इथे आला आहे, त्याचा उद्देश काय तर ‘जायमान:’ म्हणजेच नवा जन्म मात्या-पित्याच्या माध्यमाने पहिला जन्म, ज्यामुळे हे शरीर लाभले. पण आता दुसरा जन्म होतो, तो आचार्यांद्वारे म्हणजेच त्याला द्विज (द्वितीय जन्म) ही संज्ञा प्राप्त होते, ती आचार्यरुप या मात्या-पित्याकडून आचार्य प्रदक्षिणेतून हाच बोध घ्यायचा यासाठीच तर आचार्य म्हणतात- सूर्यस्य आवर्तम् अनु आ वर्तस्व! हे बटू जशी पृथ्वी सूर्याच्या गोल परिघात भ्रमण करते, तसे तू तिचे अनुवर्तन करीत आचार्यांना सूर्य मानून भ्रमण करीत राहा. गुरुकुलातील आचार्यरुपी सूर्य व नभांगणातील सूर्य यांच्यातील सद्गुणांचे ग्रहण करीत त्यांना जीवनात धारण कर.
यानंतर प्रसंग येतो तो ब्रह्मचार्याच्या अंगस्पर्शाचा आचार्य हे बटूला समोर बसवून त्याच्या अंगावरील उपवस्त्राने आपला उजवा हात झाकतात व त्याने क्रमशः उजवा खांदा, नाभी, उदर, हृदय व शेवटी डावा खांदा या अवयवांना स्पर्श करतात. याकरिता वेगवेगळ्या मंत्रांचे उच्चारण केले जाते. या स्पर्शविधीमागे त्या त्या इंद्रियामध्ये बळ व सामर्थ्य यावे, यासाठी आचार्य ईश्वराकडे प्रार्थना करतो. उजवा खांदा बळाचे प्रतीक आहे. कोणतेही कार्य करताना उजव्या हाताचाच सर्वाधिक उपयोग केला जातो. म्हणून दक्षिण स्कंधाला स्पर्श नाभीस्थानातून प्राण शक्ती उदयास येते. सर्व प्राणांचा व एकूणच जीवनाचा मूल आधार म्हणजे म्हणजेच नाभीस्थळ प्राणमय कोश विकसित होण्याचे नाभी हेच स्थान असे हे प्राण स्थिर राहावेत म्हणून मृत्यूचा अंत करणार्या भगवंताकडे आचार्य बटूला सुपुर्द करतो व म्हणतो-
.....हे अंन्तक! अमुं बालकं इदम् ते परिददामि!
उदर म्हणजेच पोट हे शरीराचे भरण-पोषणाचे स्थान खाल्लेले सर्व प्रकारचे अन्न सुव्यवस्थितरित्या पोटातच पचते. यामुळे अन्नमयकोश सुव्यवस्थित होतो. पाचन क्रिया बरोबर नसेल तर नानाविध आजार उद्भवतात म्हणून आचार्यांना चिंता सतावते, ती बालकाच्या अन्नपचनाची म्हणून आपल्या शिष्याचे उदर सुरक्षित राहावे, यासाठी आचार्यांद्वारे उदर स्पर्श प्रेमभावना विकसित होण्याचे आणि दया, करुणा यांचे आगर म्हणजे हृदयस्थान याचकरिता हृदयस्पर्श परिपूर्णता येते ती सर्वांगांनी... म्हणूनच शरीराच्या चांगल्या-वाईट अशा सर्वच अवयवांचे प्रतिनिधी म्हणून ओळख असलेले अंग म्हणजे डावे खांदे याकरिता शेवटी आचार्य आपल्या डाव्या हाताने डाव्या खांद्याला स्पर्श करतात.
यानंतर गुरुकुलात शिकत असताना विद्यार्थ्यांनी शिष्यांच्या आधीच राहावे, त्यांच्या विचाराप्रमाणे चालावे व आचार्यांनीदेखील आपल्या विद्यार्थ्यांच्या भावना ओळखून त्यांच्या गुण व वृत्तींप्रमाणे त्याला ज्ञान देण्याचा, त्याच्याशी व्यवहार करण्याचा व त्याचा विकास साधण्याचा प्रयत्न करावा. म्हणूनच गुरु व शिष्य या दोघांचेही एक मन असावे. विचारांमध्ये एकरूपता असावी. यासाठी आचार्य बालकाच्या हृदयाला स्पर्श करतात. व दोघेही प्रतिज्ञाबद्ध होतात-
मम व्रते ते हृदयं दधामि
मम चित्तम् अनुचित्तं ते अस्तु।
मम वाचमेकमना जुषस्व
बृहस्पतिष्ट्वा नियुनक्तु मह्यम्॥
ही पारस्परिक प्रतिज्ञा म्हणजे एक प्रकारे प्राचीन शिक्षण व्यवस्थेचा एक मौलिक आदर्श. आचार्य व शिष्य यांपैकी कोणीही कमी किंवा अधिक नाही. ज्ञान, शरीर व वयाने भिन्न- भिन्न असले तरी हृदय व मनाने मात्र दोघेही सारखेच तेव्हा दोघांनाही एकमनाचे, एकहृदयाचे, एकविचाराचे होणे आवश्यक असते. गुरू-शिष्यांमध्ये मतभिन्नता किंवा अविचार असेल, तर परस्परांत सामंजस्य प्रस्थापित होणार नाही. दोघांचीही हृदये एकमेकांच्या आधीन, दोघांचेही मने एक दुसर्यांच्या अनुकूल व त्याचप्रमाणे वाणीदेखील एकसारखीच आणि सर्व प्रकारचे संकल्पदेखील एक सारखेच असतील, तर निश्चितच गुरू आणि शिष्यांचे नाते अधिक दृढ होत जाते. त्यामुळे व्यष्टी ते समष्टीचा विकास साधत जातो. म्हणूनच हा प्रतिज्ञेचा प्रसंग! यानंतर दोघांमधील नाते दृढ होण्याच्या उद्देशाने पुन्हा एकदा एक दुसर्यांचा परिचय होतो. आचार्य गुरुकुलात प्रविष्ट झालेल्या या यज्ञोपवीतधारी ब्रह्मचार्याला आपले शिष्यत्व बहाल करीत म्हणतात- “तू माझा ब्रह्मचारी आहेस. पण, याहीपेक्षा तू त्या महान भगवंताचा व सतत अग्रभागी घेऊन जाणार्या अग्निदेवतेचा तू ब्रह्मचारी आहेस!”
यानंतर शेवटी आचार्य ब्रह्मचार्याला ‘त्वं जीव शरदः शतं वर्धमान:,आयुष्मान् तेजस्वी वर्चस्वी भूया:’ असा आशीर्वाद देऊन त्याच्या विद्याध्ययनास प्रारंभ करतात.
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
९४२०३३०१७८