नवी दिल्ली : (Germany backs India in war against terrorism) भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Dr. S. Jaishankar) हे सध्या जर्मनी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकाच व्यासपीठावरून संयुक्त पत्रकार परिषदेतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाकपुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला जर्मनीने पाठिंबा दर्शवला आहे.
यावेळी बोलताना एस. जयशंकर म्हणाले, "पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली आणि त्यानंतर मी लगेच बर्लिनला आलो आहे. दहशतवादाविरोधात भारताची झिरो टॉलरन्सची भूमिका आहे. तसेच भारत पाकिस्तानच्या आण्विक हल्ल्याच्या धमक्यांना भीक घालणार नाही. पाकिस्तानने कितीही आण्विक हल्ल्याचा आडोसा घेत भारताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तरी भारत घाबरणार नाही. भारत सरकार पाकिस्तानशी केवळ द्विपक्षीय चर्चा करेल. यावर कुठल्याही देशाचा आक्षेप असता कामा नये", असं म्हणत जागतिक व्यासपीठावरून पाकिस्तानला इशारा दिला आहे. तसेच "प्रत्येक देशाला दहशतवादापासून स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे. आमची ही भूमिका जर्मनीने समजून घेतली आहे. त्याबद्दल मी त्यांच्या मतांचा आदर करतो." दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या या जर्मनी दौऱ्यामुळे दहशतवादाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताला आणखी एक मोठा विजय मिळाला आहे.
Excellent meeting today with FM @JoWadephul in Berlin.
Deeply appreciate Germany’s understanding of India’s right to defend itself against terrorism.
Discussed making our Strategic Partnership stronger, deeper and closer. Identified areas of further promise and potential.… pic.twitter.com/teX3h6DDWb
भारताच्या दहशतवादाविरोधातील भूमिकेला जर्मनीचे जाहीर समर्थन
दरम्यान, जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वडेफुल यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य केले. ते म्हणाले, "भारताला दहशतवादाविरोधात स्वतःचं संरक्षण कण्याचा पूर्ण अधिकार आहे. दहशतवादाविरोधातील कोणत्याही लढाईला जर्मनी पाठिंबा देईल. यासह वडेफुल यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. पुढे ते म्हणाले, "जगात कुठेही दहशतवादाला थारा मिळता कामा नये. त्यामुळेच आम्ही दहशतवादाविरोधात लढणाऱ्या प्रत्येकाला पाठिंबा देऊ. भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदी केली आहे, या निर्णयाचं आम्हाला कौतुक वाटतं. आम्हाला आशा आहे की या दोन्ही देशांमधील तणावावर लवकरच तोडगा निघेल."
Addressing the press alongside FM Johann Wadephul @AussenMinDE in Berlin.
काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय मुद्दा, यामध्ये तिसऱ्या देशाने लक्ष घालू नये
"काश्मीरचा प्रश्न तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात उद्भवणारे इतर कोणतेही प्रश्न हे त्या देशांनी एकमेकांना सहकार्य करून सोडवायचे आहेत. हे द्विपक्षीय प्रश्न आहेत, या प्रश्नांमध्ये तिसऱ्या देशाने लक्ष घालू नये, हे भारताचे धोरण योग्य असून जर्मनीचे त्याला समर्थन आहे", असेही प्रतिपादन जोहान वडेफुल यांनी यावेळी केले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\