पहिल्या पावसात आदित्यची घसरण

    26-Jun-2023   
Total Views | 56
Former Environment Minister Aditya Thackeray Statement

पहिल्याच पावसात मुंबईतील काही ठिकाणी पाणी साचल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौरा केला. ‘जिकडे नाले तुंबतील, तेथील अधिकार्‍यांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर कारवाई करू’ आणि जिथे नाले तुंबणार नाही, त्या अधिकार्‍यांचा सत्कार करू, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच, ‘तक्रार काय करता पहिल्या पावसाचे स्वागत करा,’ असेही ते म्हणाले. त्यावर ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख मात्र चांगलेच संतापले. त्यांनी याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरून पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदेंवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. स्वयंघोषित संस्कारी आणि अभ्यासू आदित्य यांनी अशा पद्धतीने एका मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीवर टीका करणे, हे मूळातच शोभनीय नाही. ‘इतका निर्लज्जपणा, नाकर्तेपणा, इतका भ्रष्टाचार मी कधीही मुंबईत पाहिला नाही,’ असा साक्षात्कार युवराजांना झाला. स्वयंघोषित अभ्यासू असलेल्या आदित्य यांनी सध्याच्या सरकारला नेहमीप्रमाणे ‘घटनाबाह्य’ही ठरवले. लगोलग युवराजांनी मुंबई मनपाच्या प्रशासकांना आणि मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, असेही म्हटले. लाज काढल्यानंतर युवराजांनी काही कागद दाखवत जुन्या प्रथा परंपरांचे गोडवे गायले. अडीच वर्षें सत्तेत असलेल्या आदित्य यांना मुंबईसह ठाणे आणि पुणेकरांचाही कळवळा आला. सत्तेत मिंधे होऊन केलेला कारभार न आठवता युवराजांनी दुसर्‍यांना ‘मिंधे’ म्हणण्यातच धन्यता मानली. गल्लोगल्ली फिरलोय, दिवस-रात्र काम केलंय, अशी कबुलीही आदित्य यांनी दिली खरी; पण फिरून नेमका काय बदल झाला, हे तर याची देही याची डोळा जनता पाहतेय. दरम्यान, आदित्य यांनी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून इतका बालिशपणा मान्य नसल्याचा उल्लेख करत, त्यांनी स्वतःसाठी खोके आणि जनतेला धोके, हे ध्येय घेऊन हे सरकार चालल्याचे सांगितले. मुंबईत चक्क ४०० मिमी पाऊस झाल्याचा अनोखा शोध युवराज आदित्य लावून मोकळे झाले. आपल्या अभ्यासूपणाची पोलखोल केली ती केली. परंतु, इतका पाऊस तर दि. २६ जुलै, २००५च्या मुंबई महापुरादरम्यानही पडला नव्हता. आकड्यांची फेकाफेकी केली, तेही एकवेळ समजण्यायोग्य. परंतु, ऐन पावसाळ्यात आदित्य ठाकरेंच्या विखारी शब्दांची घसरण बरी नव्हे!

युवराज नवे विश्वप्रवक्ते?

२६ वर्ष मुख्याध्यापक राहिलेल्या व्यक्तीने नव्या मुख्याध्यापकाला एका वर्षातच शाळेचा विकास का झाला नाही, असे विचारणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच २६ वर्ष मुंबई महापालिकेत सत्तेत असणार्‍या ठाकरेंनी एका वर्षापूर्वी मुख्यमंत्रिपदी बसलेल्या एकनाथ शिंदे यांना मुंबई का सुधारली नाही, असा प्रश्न विचारणेही हास्यास्पदच. एका वर्षाचा हिशोब मागताना २६ वर्षांचा हिशोब नेमका मांडणार कोण की, मग हिशोब कुणी विचारायचाच नाही? मुंबई महापालिकेच्या कारभाराची ‘एसआयटी’ चौकशी करणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि ठाकरे कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यामुळेच तर दि. १ जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला गेला. चौकशीनंतर ठाकरे गटाचे धाबे दणाणले आहेत. जेव्हा-जेव्हा ठाकरेंचे धाबे दणाणतात, तेव्हा मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसावर अन्याय होत असल्याच्या आवया उठवल्या जातात. परंतु, फडणवीस यांनी या आवयांची हवा आधीच काढून घेतली आहे. ‘तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आणि तुम्ही म्हणजे मराठी नाही,’ अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंवर घणाघात केला होता. ‘मुंबईची तुंबई’ कुणी केली आणि ती साफ कुणी केली, याची उत्तरे चौकशीतून समोर येतीलच. संजय राऊतांचे ऑन कॅमेरा थुंकणे असो किंवा मग घाणेरड्या शिव्या देणं असो, त्यांनी आतापर्यंतच्या सर्व पातळ्या ओलांडल्या. त्यात आता भर पडली आहे ती नव्या विश्वप्रवक्त्यांची अर्थात आदित्य ठाकरे यांची. नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक केली, हे महाराष्ट्राने पाहिले. कंगना, अर्णब, केतकी आणि राहुल भामरे यांना कशा पद्धतीने छळले, हेदेखील सर्वांसमोर आहेच. परंतु, एका माजी मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र आणि राज्याचे माजी मंत्री थेट सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाज काढत विखारी शब्द बोलतात, तेव्हा हेच का ते आदित्य ठाकरे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आदित्य यांच्यावर सुमोटो कारवाई करण्याची मागणीही शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी केली आहे. परंतु, मुद्दाम असे काही तरी बोलून चर्चेत राहायचे आणि कारवाई केली, तर नंतर भावनिक लाटेवर स्वार व्हायचे, हा खेळ तर युवराज खेळत नाही ना, या शंकेलाही वाव आहे.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबईतील १०० किलोमीटर रस्ते झाले मोकळे; एमएमआरडीएची मान्सूनपूर्व तयारी पूर्ण

मुंबईतील १०० किलोमीटर रस्ते झाले मोकळे; एमएमआरडीएची मान्सूनपूर्व तयारी पूर्ण

100 km roads in Mumbai cleared MMRDA pre-monsoon preparations पावसाळा जवळ येत असताना मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील चालू पायाभूत सुविधा प्रकल्पांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी एक व्यापक मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद योजना तयार केली आहे. पावसाळ्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी एमएमआरडीएने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कार्यालयात एक केंद्रीकृत नियंत्रण..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121