ठाण्यात ९० टक्के नालेसफाई झाल्याचा महापालिकेचा दावा !

पावसाळ्यानंतरच नालेसफाईचा हिशोब ...ठेकेदार लटकले

    01-Jun-2023
Total Views |
Thane Municipality drain cleaning

ठाणे
: ठाणे महापालिका हद्दीत नालेसफाईची कामे सुरू होती. पालिका प्रशासनाने ३१ मे पर्यंत नालेसफाईचे कामे पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली होती. त्यानुसार ठाणे शहरात ९० टक्के नालेसफाई झाली असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला आहे. दरम्यान पाणी तुंबणार नाही अशी खात्री पावसानंतरच कळणार आहे.

पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असुन ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाई दरवर्षी चर्चेचा विषय असतो. गेले कित्येक वर्ष नालेसफाईच्या नावावर फक्त हात सफाई करत असल्याचा आरोप वारंवार केला जातो. यावर्षी २९ एप्रिल रोजी नालेसफाईला सुरूवात करण्यात आली होती. तर ३१ मे पर्यंत शहारातील सर्व नालेसफाई करावी असे आदेश पालिका आयुक्त अभिजित बागर यांनी दिले होते. त्यानुसार ९० टक्के नालेसफाई झाली असल्याचा दावा केला जात असून हा दावा कितपत खरा ठरतो हे येत्या पावसाळ्यात समजणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात शहारत एकूण १४ मोठे, २३५ छोटे नाले आहेत. १८३ किलोमीटर लांबीच्या नाल्यासह महामार्गावरील तसेच रस्त्याच्या खाली असलेले १०६ कल्वर्ट तर रेल्वे मधील २५ कल्वर्ट देखील अत्याधुनिक यंत्राद्वारे साफ करण्यात आलेत. नालेसफाईच्या कामाकरिता यंदा सुमारे १० कोटी खर्च अपेक्षित धरला असून एकूण ९ प्रभाग समितीसाठी ९ ठेकेदारांकडून कामे करण्यात आली आहेत.

मुख्यमंत्र्यांचे नालेसफाईवर लक्ष ; ठाणेकरांच्या तक्रारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी ठाणे शहरात नालेसफाईचा दौरा केला होता.या दौऱ्यात शिंदे यांनी ठाणे महापालिकेने नालेसफाईबाबत तक्रारी आणि अभिप्राय नोंदविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करून त्यावर ठाणेकर नालेसफाई बाबतचा प्रतिसाद घ्यावा असे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने पालिकेने सुरू केलेल्या नालेसफाई हेल्पलाईन क्रमांकावर ५० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.