असावे नाव सरल-सुंदर, परि साधेल जीवनाचा उद्धार!

    31-May-2023
Total Views |
Vedic shodash Sanskar

आता वेळ येते ती बाळाचे नाव ठेवण्याची. बाळाच्या माता-पित्यांनी अथवा निकटच्या नातेवाईकांनी बाळाचे नाव अगोदरच निश्चित करून ठेवावे. यानंतर हा बाळ एका विशेष संज्ञेने ओळखला जाणार आहे. आज ठेवण्यात येणारे नाव हे त्या बाळास अजरामर करेल, असे नाव ठेवण्यात यावे की त्याच्या नावाचा उद्घोष केल्याबरोबर त्या बाळाला जीवनभर नाम-अर्थाचा बोध होत राहावा व इतरांनाही प्रेरणा मिळत राहील. यादृष्टीने नाममहात्म्य मोलाचे आहे.

कोऽसि कतमोऽसि कस्यासि को नामासि।
यस्य ते नाम आमन्महि यं त्वा सोमेनातीतृपाम। भूर्भुव:स्वः सुप्रजा: प्रजाभि: स्यां सुवीरो वीरै: सुपोष: पोषै: ॥ (यजुर्वेद-७/२९)
कोऽसि कतमोऽस्येषोऽस्यमृतोऽसि।
आहस्पत्यं मासं प्रविशासौ॥
(मंत्र ब्राह्मण-१/१५/१४, गोपथ ब्राह्मण-२/८/१३)
अन्वयार्थ
 
हे बाळा! (यस्य) ज्या (ते) तुझे (नाम) आम्ही नामकरणाचे (आमन्महि) आयोजन केले आहे,(यं त्वा) ज्या तुला (सोमेन)दुग्ध-अमृताने (अतीतृपाम) आम्ही तृप्त केले आहे, असा तू (क: असि) कोण आहेस? (कतम: असि) कितवा आहेस ? (कस्य असि) कोणाचा आहेस? (क: नामासि ) तू कोणत्या नावाचा आहेस? (भू: भुव: स्व:) हे सृष्टीच्या निर्मात्या, प्राणस्वरूप, दुःखहर्त्या, सुखकर्त्या परमेश्वरा! आम्ही (प्रजाभि:) प्रजांद्वारे (सुप्रजा:) उत्तम संततींनी परिपूर्ण, तसेच (वीरै:) अनेक वीरांद्वारे (सुवीरा:) बलवान असे शूरवीर संततीयुक्त आणि (पौषै:) पुष्टिकारक पदार्थांद्वारे (सुपोष:) पुष्टियुक्त (स्याम् ) होवोत!
अरे बाळा ! (क: असि ) तू कोण आहेस ? (कतम: असि) अरे तू तर (क:+तम) सुखस्वरूप (एष:) असा तू (अमृत: असि) मृत्युविरहित ,अमर आहेस. (असौ) हे बाळा! (इथे मुलाचे नाव ठेवावे) (आहस्पत्यं )दिवसाचा स्वामी असलेल्या सूर्याच्या (मासं) प्रत्येक महिन्यामध्ये (प्रविश) तू प्रविष्ट हो, अर्थातच तू दीर्घायुषी हो !!

विवेचन

नावात काय असते? असे कधीही म्हणू नये. कारण वस्तू, व्यक्ती अथवा एखाद्या प्राण्याला दिले गेलेले नाव हे त्यांस ओळखण्याची खूण किंवा निशाणी मानली जाते. किंबहुना, त्याचे नामाभिधान हेच तर त्या सर्वांना खुलवत असते. मानव समाजाचा इतिहास लिहिला गेला, तो त्या -त्या व्यक्तिमत्त्वांच्या यशवंत नावांनीच! बाह्य शरीराकृती ही बर्‍याच प्रमाणात वेगवेगळी असली , तरी मानव म्हणून जी एकसमानता असते, त्या समानतेलादेखील वेगळेपण देण्याचे काम करते ते नाव! कारण, या जगात सर्व प्रकारचे व्यवहार चालतात, ते नावांनीच! जोपर्यंत व्यक्तीला संज्ञा दिली जात नाही, तोपर्यंत त्याला जग ओळखणारतरी कसे? म्हणूनच आई-वडिलांनी आपल्या बालकाला दिलेल नाव हे व्यक्तिशः त्या बाळाला, त्याच्या कुटुंबीयांना व समग्र वंश, गाव व समाजालादेखील समुज्ज्वल बनवते.

जेव्हापासून बाळाने मातृगर्भी प्रवेश केला, तेव्हापासून आई-वडिलांच्या मंगलमय आकांक्षा आकाशात घिरट्या घेऊ लागतात. याच तीव्र अभिलाषेने बाळाच्या शारीरिक विकासासाठी दुसर्‍या किंवा तिसर्‍या महिन्यांत केलेला पुंसवन संस्कार किंवा मानसिक विकासाकरिता चौथ्या अथवा सहाव्या महिन्यांत पार पडलेला सीमंतोन्नयन संस्कार. हे दोन्ही संस्कार त्या बाळाची शरीर व मनाच्या उत्तम प्रगतीस्तव काळजी घेण्याकरिताच! पुढे बाळ जन्मल्यानंतर सार्‍या कुटुंबाला आनंदाचे उधाण राहत नाही. हा बाळ ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करावा, म्हणून त्याच्या जिभेच्या अग्रभागावर सुवर्णशलाकेने ओम् लिहिणे असो की कानामध्ये ‘वेदोऽसि’ या पवित्र शब्दाचे उच्चारण करणे असो! या सर्व प्रक्रिया म्हणजे शिशुच्या प्रगतीसाठीची पाऊलेच! याच आनंदाने बहरलेल्या वातावरणात प्रत्यक्ष आई-वडील, घरातील आजी-आजोबा किंवा इतर नातलग एकाच गोष्टीची वाट बघतात, ती म्हणजे बाळाच्या बारशाची! बाळाच्या जन्माचा बारावा दिवस आला की त्याला पाळण्यात टाकले जाते. पाळण्यात टाकत असताना काहीतरी गोड नाव असावे म्हणूनच संस्कारविधीनुसार एक दिवस अगोदर म्हणजेच बाळाच्या जन्माच्या अकराव्या दिवशी नामकरण संस्कार आयोजित केला जातो.

या दिवशी शक्य झाले नाही, तर जन्माच्या १०१व्या दिवशी नाव ठेवण्यात यावे. याही दिवशी शक्य झाले नाही, तर मग बाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पहिल्या वाढदिवशी हा नामकरण संस्कार करण्याचे विधान शास्त्रात सांगितले आहे. असे असले तरी आपल्या सोयीनुसार योग्य तो दिवस निवडून विधीपूर्वक अग्निहोत्राचे आयोजन करावे. मात्या-पित्यांना यजमानपदी बसवून पुरोहिताने सर्वप्रथम संकल्पपाठ करून स्वस्तिवाचन व शांतिकरणमंत्रांचे पठण करावे व यज्ञारंभ करावा. बाळालादेखील चांगल्याप्रकारे स्नान घालून, नव वस्त्रे परिधान करून यज्ञवेदीवर आणावे. आईने बाळाला घेऊन पतीच्या मागे उभे राहावे व नंतर उजव्या बाजूला येऊन बाळाचे डोके उत्तर दिशेकडे व पाय दक्षिणेकडे करीत त्याला पित्याच्या मांडीवर द्यावे. पुन्हा पत्नीने आपल्या बाळास त्याच स्थितीत आपल्या मांडीवर घ्यावे. आता पत्नी पतीच्या डाव्या बाजूस आहे, तर पती हे पत्नीच्या उजव्या दिशेला आहेत.

बृहद् यज्ञविधी पार पडल्यानंतर यजमानांनी ‘ओम् प्रजापतये स्वाहा’ अशी एक तुपाची आहुती द्यावी. त्यानंतर ज्या तिथीला बाळाचा जन्म झाला आहे, त्या तिथीची व ज्या नक्षत्रात तो जन्मला आहे, त्या नक्षत्राची अशी एक-एक आहुती देण्यात यावी. पुन्हा त्या तिथीच्या व नक्षत्राच्या देवतांची पण आहुती देण्यात याव्यात. अशा एकूण चार आहुत्या दिल्या जाव्यात. या आहुत्या देत असताना त्या त्या शब्दात चतुर्थी विभक्तीचा प्रयोग करण्यात यावा. एका पक्षात १६ तिथी, तर त्यांच्या देवतादेखील १६ तसेच, २७ नक्षत्र, तर त्यांच्या देवतादेखील २७ आहेत. उदाहरणार्थ, जर बाळाचा जन्म दुसर्‍या तिथीला झाला असेल, तर ‘ओं द्वितीयायै स्वाहा’ व तिथीचा देवता त्वष्ट्रा आहे, म्हणून ‘ओं त्वष्ट्रे स्वाहा.’ जन्माचे नक्षत्र भरणी असेल, तर ‘ओं भरिण्यै स्वाहा’ आणि त्या नक्षत्राचा देवता यम आहे, त्यामुळे ‘ओं यमाय स्वाहा.’ यासंदर्भात अधिक माहिती पारंपरिक पंचांग किंवा महर्षी दयानंद कृत संस्कारविधी ग्रंथात अभ्यासावयास मिळेल.

आता वेळ येते ती बाळाचे नाव ठेवण्याची. बाळाच्या माता-पित्यांनी अथवा निकटच्या नातेवाईकांनी बाळाचे नाव अगोदरच निश्चित करून ठेवावे. यानंतर हा बाळ एका विशेष संज्ञेने ओळखला जाणार आहे. आज ठेवण्यात येणारे नाव हे त्या बाळास अजरामर करेल, असे नाव ठेवण्यात यावे की त्याच्या नावाचा उद्घोष केल्याबरोबर त्या बाळाला जीवनभर नाम-अर्थाचा बोध होत राहावाव इतरांनाही प्रेरणा मिळत राहील. यादृष्टीने नाममहात्म्य मोलाचे आहे. माणूस जो मनाने विचार करतो, तोच वाणीतूनबाहेर पडणार्‍या शब्दाने व्यक्त करतो आणि नंतर तेच कर्माद्वारे प्रकट करतो. म्हणून मनात येणारे विचार हे भावपूर्ण असावेत आणि मग ते सुंदर, स्वच्छ व सुवाच्य शब्दांनी अभिव्यक्त व्हावेत. शेवटी त्या शब्दाची कृती त्याच्या आधीन असेल. उद्देश हाच की, बाळाचे नाव हे खूप अर्थपूर्ण असावे. इतरांना उच्चारण करण्यासाठी ते सरळ व सोपे असावे. संस्कारविधीत असे म्हटले आहे की, बाळाच्या नावात ग, घ, ङ्, ज, झ, ञ, ड, ढ, ण, द, ध, न, ब, भ, म या मृदू व्यंजनांचा, य, र, ल, व या अंतस्थ व ह या उष्म व्यंजनाचा समावेश असावा. जेणेकरून नाव उच्चारण्यासाठी सहज, सोपे व सुटसुटीत वाटावे.

शक्यतो क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ या कठोर व्यंजनांचा अंतर्भाव असता कामा नये. असे असले तरी कुटुंबीयांनी जे योग्य व अर्थपूर्ण असेल, अशाच शब्दांचे नामाभिधान करावे. एकूणच बालकांचे किंवा बालिकांची नावे ठेवत असताना, ते सर्वांना उच्चारण्याकरिता अतिशय सरळ, सुबोध व उच्च भाव व्यक्त करणारे असावेत. जड पदार्थांची किंवा पशुपक्ष्यांची निरर्थक नावे ठेवता कामा नयेत किंवा अंधश्रद्धा पसरवणारी, ज्यांच्या नावांनी इतिहास कलंकित झालेला आहे, अशांची नावे कदापि ठेवू नयेत. चरक शास्त्रात म्हटले आहे- ‘तत्र आभिप्रायिकं नाम.’ म्हणजेच ज्यांचा अभिप्राय अतिशय उत्तम प्रतीचा आहे, अशीच नावे ठेवण्यात यावी. आधुनिक युगात आई-वडील आपल्या मुला- मुलींची संस्कृतनिष्ठ नावे ठेवत आहेत, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. पण, तिथेही शब्दातून चांगलाच आशय व्यक्त झाला पाहिजे, अन्यथा केवळ अक्षरांची जुळवाजुळव करून काहीतरी वेगळे नाव ठेवावे, ही नवी अंध परंपरा निर्माण होता कामा नये.असेच एखादे महान आशय व्यक्त होणारे नाव निश्चित करून यजमान आई-वडिलांनी आता नामकरणास सज्ज व्हावे. आईच्या मांडीवरील असलेल्या बाळाच्या नासिकेसमोर वडिलांनी आपली दोन बोटे ठेवावीत. नाकातून बाहेर पडणार्‍या श्वासांना आपल्या तर जुनी व मध्यमा या दोन बोटांचा स्पर्श करीत वडिलांनी वरील दोन मंत्रांचा उच्चार करावा.

या मंत्रातील भाव अतिशय पवित्र असा आहे. इथे जणू काही बाळासाठी संबोधन आले आहे आणि प्रश्नांच्या माध्यमाने विचारण्यात आले आहे की, ‘हे बाळा, आज आम्ही तुझे नामकरण करत आहोत. तेव्हा तू कोण आहेस? कितव्या क्रमांकाचा आहेस? कोणाचा आहेस?’ वगैरे!! तेव्हा उत्तरात आढळते की, ‘तू परमेश्वराचा आहेस. अमृतस्वरूपी आहेस. तू कधीही मृत्यूला प्राप्त होणार नाहीस. दिवसाचा स्वामी असलेला सूर्य हा ज्याप्रमाणे दिवसेंदिवस वाढतो आहे, त्याचप्रमाणे तूदेखील दिसामासाने दीर्घायुष्याला प्राप्त हो.’ सुरुवातीच्या द्वितीय मंत्रात असलेल्या ‘असौ’ या पदाच्या ठिकाणी मुलाचे अथवा मुलीचे नाव स्थापित करून त्यास घोषित करण्यात यावे. शेवटी उपस्थित आप्तेष्ट, स्वकीय, मित्रजन व समुदायाने फुलांचा वर्षाव करून बाळाच्या नूतन नावाचे करतलध्वनीने स्वागत करावे व बाळास आशीर्वाद देण्यात यावा.

एकूणच नामकरण संस्कार हा बाळाच्या भावी जीवनाला उत्कर्षाच्या दिशेने घेऊन जाणारा व त्याच्या उच्च नाम संबोधनातून त्याला प्रगतिपथावर नेण्याकरिता ऐतिहासिक व अतिशय मौलिक स्वरूपाचा आहे.

प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.