आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपाची लगबग सुरु

कार्यकारिणी पाठोपाठ जिल्हाध्यक्षही बदलण्याचा निर्णय

    25-May-2023
Total Views |
Devendra Fadnavis maharashtra bjp

मुंबई
: निवडणूक असो वा नसो कायम इलेक्शन मोडमध्ये असणारा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपने निवडणुकांसाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. राज्य सरकार स्थिरस्थावर झाल्यानंतर पायाभूत सुविधा आणि विकासात्मक प्रकल्पांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने भाजप सेनेचे प्रयत्न सुरु झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पायाला भिंगरी लावून राज्याच्या दौरा करत असून संघटनात्मकदृष्ट्या पक्षाला मजबूत बनविण्याचे प्रयत्न या माध्यमातून केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखायला सुरुवात केली असून २०२४ रणधुमाळीसाठी भाजपात लगबग सुरु झाली आहे.

कार्यकारिणी पाठोपाठ जिल्हाध्यक्ष बदलणार

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र भाजपकडून संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले जातील असे भाजपातील सूत्रांनी म्हटले आहे. येत्या काही दिवसांत पक्षाकडून ४८ लोकसभा मतदारसंघात भाकरी फिरवली जाणार असून अनेक जिल्हाध्यक्षांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. पक्षाकडून जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी म्हणून युवा चेहऱ्यांना पुढे आणण्याचे प्रयत्न केले जात असून युवा चेहऱ्याला पुढे करणे निवडणुकीच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते असा कयास बांधण्यात आला आहे. जुन्या जिल्हाध्यक्षांच्या अनुभवानुसार त्यांची लोकसभा निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती होणार असून लोकसभा मतदारसंघांच्या बांधणीची जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर देण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने आपल्या प्रदेश कार्यकारिणीत बदल करत पदाधिकाऱ्यांची एक नवी फळी पक्षासमोर ठेवली होती. त्यामुळे तसाच काहीसा प्रकार जिल्हाध्यक्ष बदल प्रक्रियेत होण्याची दाट शक्यता आहे. त्यासोबतच तालुकाध्यक्ष आणि इतर महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या देखील नव्याने नेमणुका होणार असल्याची माहिती भाजपातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी भाजपकडून विशेष तयारी

मागील २ दशकांचा अभ्यास केला तर भाजपने निवडणुकीत मिळणारे मतदान आणि मतांची टक्केवारी, विधानसभा - लोकसभेच्या जिंकणाऱ्या जागा, महापालिका - स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य संख्या आणि निवडणुकीच्या राजकारणात आवश्यक असलेल्या बाबींमध्ये सातत्याने वाढ केली आहे. उदाहरणार्थ स्थापनेपासून काँग्रेसच्या हाती असलेल्या सांगली महापालिकेवर अनेक दशकांच्या संघर्षानंतर भाजपने आपला झेंडा रोवला होता. तर पवारांचा अभेद्य किल्ला म्हणून पवारांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितल्या जाणाऱ्या बारामतीत देखील भाजपने नोंदणीय कामगिरी करून दाखवली होती. त्यामुळे जिथे भाजप नाही तिथे पक्ष उभारण्यासाठी आणि जिथे मतदानाची टक्केवारी कमी आहे तिथे वाढ करण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरु करण्यात येणार आहेत.

भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी आणि विजयी जागा (टक्केवारी)   -

विधानसभा २०१४ - जागा १२२ (२७.८१%)
लोकसभा २०१४ - जागा २३ (२७.६०%)
विधानसभा २०१९ - जागा १०५ (२५.७५%)
लोकसभा २०१९ - जागा २३ (२७.८४%)

साडेपाच कोटी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने पन्नाप्रमुख ही नवी यंत्रणा कार्यान्वित करत पक्षाचे संघटन बळकट करण्यावर भर दिला होता आणि त्याची परिणीती भाजपाला मिळालेल्या विजयातून दिसून आली होती. त्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रात बूथ सक्षम करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे टार्गेट समोर ठेवले आहे. भाजपकडून राज्यातील ९७ हजार बूथ बांधणी करण्याचे नियोजन आखण्यात आले असून त्याची जबाबदारी भाजप नेते आणि 'महासंकल्प २०२४' अभियानाचे सदस्य अरविंद निलंगेकर पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. निलंगेकर यांना या अभियानाचे संयोजक पद देण्यात आले असून बूथ संरचना, बूथमार्फत जनतेसाठी साधला जाणारा संवाद, सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न आणि इतर बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.