गरज इंटरनेट सुरक्षेची आणि साक्षरतेची!

    24-May-2023   
Total Views |
need for Internet safety and literacy

संसदेच्या आगामी अधिवेशनात ‘डिजिटल इंडिया’ विधेयक मांडण्यासंबंधीची चाचपणी केंद्र सरकारने सुरु केली आहे. यापूर्वीच्या माहिती-तंत्रज्ञान कायद्याला पर्याय म्हणून या नव्या विधेयकाकडे पाहिले जात आहे. दुसरीकडे ‘डिजिटल इंडिया’च्या युगात अद्याप ग्रामीण भागात पुरेसे डिजिटल कौशल्य आत्मसात केले नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तेव्हा, डिजिटल सुरक्षा आणि साक्षरता असा दोहोंचा सुयोग्य मेळ साधण्याचे आव्हान या नव्या विधेयकानिमित्ताने सरकारसमोर असेल.

नव्या माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार, आता मजकुरावर वयोगट, जाहिरातींचे निकष, अल्गोरिदम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), फेक न्यूज इत्यादी प्रमुख मुद्द्यांचा विचार केला जाईल, अशी माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी नुकतीच एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने मंगळवार, दि. २३ मे रोजी आयोजित केलेल्या द्वितीय सल्लागार समितीच्या बैठकीत याविषयी सविस्तर चर्चाही झाली. केंद्र सरकार, स्टार्टअप्स, तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्यांचे ‘सीईओ’, कायदेतज्ज्ञ यांच्यासह अन्य मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत ही चर्चा पार पडली. तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलणार्‍या नव्या पैलूंना डोळ्यासमोर ठेवून ‘डिजिटल इंडिया’ विधेयक संसदेत सादर केले जाणार आहे. पूर्वीपेक्षा या नव्या कायद्याची व्याप्ती अधिक असून, समाजमाध्यमे, ‘ओटीटी’, ‘सेन्सॉरशिप’ असा सर्वांगाने विचार करून हे नवे विधेयक संसदेत चर्चेसाठी आणले जाणार आहे.

या सर्व गोष्टींमध्ये प्रामुख्याने मुद्दा चर्चिला गेला तो मुलांच्या सुरक्षिततेचा. मुलांसाठी सुरक्षित आणि त्यांना सुशिक्षित करणारे असे इंटरनेट तयार करू, अशी सरकारची इच्छाशक्ती आहे. तसेच या नव्या आयटी कायद्यामुळे नव्या नियामकाची गरज राहणार नाही, अशी हमीदेखील केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे. येणारा हा कायदा संपूर्ण ‘डिजिटल’ विश्वाला स्पर्श करणारा ठरणार असल्याने अनेक आमूलाग्र बदल होणार, हे निश्चित. त्यातच प्रामुख्याने चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे ‘सेन्सॉरशिप.’ ‘ओटीटी’, इंटरनेट आणि सोशल मीडियावर येणारा ‘सेन्सॉरशिप’चा मुद्दा विधेयक संसदेत आल्यावर साहजिकच गाजू शकतो. बर्‍याच अंशी ‘डिजिटल’ आशयनिर्मितीवर ‘सेन्सॉरशिप’ची गरज भासत असली तरीही प्रामुख्याने सुरक्षित इंटरनेट हा मुद्दा कळीचा ठरावा.

‘डिजिटल इंडिया’चा विचार करताना केंद्रीय नियामक म्हणून विचार व्हायलाच हवा. मुलांच्या हाती इंटरनेटवरुन सहज सापडणार्‍या अश्लील मजकुरावर बंधने आणण्याचे पाऊल स्वागतार्ह आहेच. शिवाय ‘डार्क वेब’, कुत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सेक्युरिटी या मुद्द्यांना धरुनही कायदे कठोर होण्याची गरज वेळोवेळी व्यक्त केली गेली. म्हणूनच इंटरनेट सुरक्षा ही फक्त लहान मुलांच्याच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांच्या, तरुणाईच्या दृष्टीनेही तितकीच सुरक्षित होण्याची गरज आहे.

नव्या डिजिटल युगात आता गुन्हेगारही अद्ययावत तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करू लागले आहेत. ’व्हाईट कॉलर क्राईम’ ही संज्ञा भारतात पूर्वी फक्त चित्रपटांपुरतीच मर्यादित होती. परंतु, गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन दरोडा टाकून बँकांच्या तिजोर्‍यांवर डल्ला मारणार्‍या गुन्हेगारांचे वाढते प्रमाण पाहता इथेही सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो. नव्या कायद्यात अशा दरोडेखोरांनाही चाप लागेल, अशी अपेक्षा आहे. तसेच, अशा गुन्ह्यांमध्ये पोलिसांना लागणारी अद्ययावत यंत्रणा उपलब्ध करून देणेही तितकेच मोठे आव्हान असणार आहे. यामुळेच केवळ यंत्रणांवर अवलंबून न राहता प्रत्येकाने ‘डिजिटल’ साक्षर होणे तितकेच गरजेचे आहे.

याच ‘डिजिटल’ साक्षरतेबद्दल एक चिंताजनक सर्वेक्षण नुकतेच समोर आले आहे. आपण कितीही ‘डिजिटल इंडिया’, ‘५ जी’, ‘६ जी’च्या गप्पा मारत असलो तरी, तळागाळापर्यंत तंत्रज्ञानाच्या वापरासाठी लागणारी आवश्यक ती कौशल्ये अद्याप रुजललेलीच नाहीत. १५ ते २९ वयोगटातील ७० टक्के मुलांना ई-मेल कसे पाठवावे, याचे ज्ञान नाही. यापैकी ८० टक्के मुलांना तर फाईल ट्रान्सफर कशी करायची, याचीही माहिती नाही. ‘मल्टिपल इंडिकेटर सर्वे इन इंडिया’ २०२०-२१ तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार,ग्रामीण भागात केवळ ३३.८ टक्के इतक्याच जणांना फोल्डर कॉपी आणि मूव्ह करता येतो.

शहरात ही आकडेवारी ६१.१ टक्के इतकी आहे. एखाद्या डॉक्युमेंटमध्ये असलेल्या माहितीत बदल करण्याची क्षमता ग्रामीण भागातील ३१.४ टक्केच लोकांकडे आहे. शहरात हा आकडा ५९.२ टक्के इतका आहे. सर्वात महत्त्वाचे आणि धक्कादायक आकडेवारी म्हणजे, ग्रामीण भागातील १९.२ टक्के लोकांनाच केवळ ई-मेल अटॅचमेंट्स शेअर करता येणे शक्य झाले. शहरात ही आकडेवारी ४५.२ टक्के इतकीच आहे. म्हणजेच काय तर उर्वरित ५० टक्क्यांहून अधिक जणांना ते शक्य झाले नाही. सॉफ्टवेअर शोधणे आणि ते ‘कॉन्फिगर’ करणे ही प्रक्रिया ग्रामीण भागातील १५.५ टक्के लोकांनाच जमली, शहरात हेच प्रमाण ३४ टक्क्यांवर आहे.

संगणकातून इतर ठिकाणी डाटा पाठविण्याची प्रक्रिया ग्रामीण भागात केवळ १३.७ टक्के लोकांनाच जमली. शहरात हे प्रमाण ३५.३ टक्के इतके होते. याशिवाय अन्य बर्‍याच गोष्टींवर या सर्वेक्षणात प्रकाश टाकण्यात आला होता. मात्र, प्रामुख्याने एक महत्त्वाची बाब जी शहरी भागांमध्येही चिंतेचा विषय ठरली ती म्हणजे, संगणकावर ‘एखादी स्पेशलाईज् प्रोग्राम लॅग्वेज शिकणे’ आणि तिचा वापर करणे ही गोष्ट फक्त ५.२ टक्के जणांनाच जमली. शिवाय, ग्रामीण भागात हीच आकडेवारी १.३ टक्के इतके होते. ‘इलेक्ट्रोनिक प्रेझेंटेशन’ ही गोष्टदेखील गावातील पाच टक्के जणांनाच जमते. १५ ते २९ वयोगट हाच काळ प्रामुख्याने नव्या गोष्टी शिकण्याचा तसेच नोकरीवर स्थिरस्थावर होण्यापूर्वीच्या काळातला असतो.

मात्र, याच काळात या गोष्टींचे कौशल्य अवगत नसेल, तर मग अपेक्षेप्रमाणे नोकर्‍या मिळत नाही, अशी तक्रार करणेही तितकेच चुकीचे नाही का? आजघडीला युट्यूबसारख्या माध्यमातूनही जगातील कुठल्याही प्रकारच्या गोष्टी शिकणे अशक्य नाही. सर्व प्रकारचे प्रशिक्षणाच्या गोष्टी उपलब्ध असतानाही अशी स्थिती असेल, तर तग कसा धरणार हा प्रश्न आहे. नवे तंत्रज्ञान येईल. नवे कायदेही येतील. मात्र, काळानुरुप बदल करणे, हेही क्रमप्राप्तच.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.