अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळासाठी ६८१ कोटी

- प्रशासकीय मान्यता; नियोजन विभागाकडून निर्णय जारी

    28-May-2025
Total Views |
अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळासाठी ६८१ कोटी

मुंबई, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या मौजे चौंडी येथील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे जतन, संवर्धन आणि विकासा’सासाठी ६८१ कोटी ३२ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

बुधवार, दि. २८ मे रोजी नियोजन विभागाने त्याबाबतचा शासननिर्णय जारी केला. या आराखड्याच्या संनियंत्रण आणि अंमलबजावणीची जबाबदारी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

जगातील सर्वकालिन सर्वश्रेष्ठ स्त्री राज्यकर्त्या असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडी येथील त्यांच्या स्मृतीस्थळाचा विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू होते. दि. ६ मे २०२५ रोजी चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आराखड्याला मान्यता देण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने ६८१ कोटी ३२ लाख रुपये खर्चाच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मंजूरीचा शासन निर्णय आज जारी केला.

३१ मे २०२८ची डेडलाईन

या शासननिर्णयानुसार विकास आराखड्यातील कामे करताना त्यांचे ऐतिहासिक महत्व, वास्तूंची मूळ शैली जपण्याचे तसेच पुरातत्वीय जाण असलेल्या व्यक्ती, संस्थांकडूनंच ही कामे करु घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. जी कामे केंद्र शासनाच्या ‘प्रसाद’ योजना, स्वदेश दर्शन योजना किंवा अन्य योजनांमधून शक्य आहेत, ती त्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहेत. विकास आराखड्यातील सर्व कामे पुढील तीन वर्षांत, दि. ३१ मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.