कुंडलिनीशक्ती - ज्ञान-विज्ञान

    24-May-2023
Total Views |
Article on Kundalini Shakti

कुंडलिनी जागृत होत असताना विभिन्न आवेगांचा अनुभव येत असतो. या आवेगांना धरून कुंडलिनी जागृतीचे विभिन्न चार प्रकार सांगितले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत. १) पिपीलिका २) दर्दुर ३) सर्प आणि ४) विहंग

१) पिपीलिका गती : साधनेच्या उच्च अवस्थेत साधकाला असा भास होतो की, तो ध्यानात असताना त्याच्या अंगावर खालून वर पिपीलिका म्हणजेच मुंग्या चढत आहेत, असे त्याला वाटते. भ्रमाने साधक त्या मुंग्या झटकायला पाहतो. पण, त्या प्रत्यक्ष मुंग्या नसून मुंग्या अंगावर चढण्याचा आभास असतो. त्याचे कारण अंगातील नव्याने उत्पन्न होणार्‍या दिव्य विद्युत प्रवाहात आहे. शरीरातील प्रत्येक पेशीत विद्युतभार अधिक होऊन तो नाड्यांद्वारे खालून वर संचारित होत असतो. तो मुंगीच्या चालीप्रमाणे लघु असल्याने त्या संचाराद्वारे साधकाला असा भास होतो की, त्याच्या अंगावर मुंग्या चढत आहेत.पण, ती विद्युत संभाराची उर्ध्व चाल आहे. त्यामुळे अंगावर मुंग्या चढण्याचा आभास होतो. कुंडलिनी जागृतीची चाल उर्ध्वगतिक असते. असल्या उर्ध्वगतिक चालीला ‘उर्ध्व रेतस गती’ असे म्हणतात. कुंडलिनीची खालून वर जाणार्‍या गतीची जाणीव प्रथम मूलाधार चक्रावर होत असते आणि तिची गती वरच्या चक्रावर जात असताना पिपीलिकेची उर्ध्व गती जाणवते. साधना चालूच ठेवावी, असे केल्यास असला मुंग्या चढण्याचा भ्रम दूर होऊन साधक कुंडलिनी जागृतीच्या वरच्या टप्प्यावर जात असतो. असल्या अधिक विद्युत प्रक्षेपण प्रवाहाला दर्दुर गती, असे म्हणतात.

२) दर्दुर गती : दर्दुर म्हणजे बेडूक आणि दर्दुर गती म्हणजे बेडकासारखे साधकाच्या अंगाला उड्डाणरूप झटके बसणे होय. अधिक उच्च साधनेमुळे शरीरातील पेशी-पेशीतून अधिक प्रमाणात विद्युत चुंबकत्व उत्पन्न होऊन प्रक्षेपणाचा आवेग वाढून शरीरातून झटके बसू लागतात. स्नायूंना एकदम आवेगामुळे चालना मिळून झटके बसतात, असे झटकेसारखे किंवा अधूनमधून चालूच असतात. काही साधक आसनावर बसले असताना ते आसनावरूनही फेकले जातात, असा अनुभव आहे, असे झटके आल्यास साधकाने सुयोग्य मार्गदर्शकाला भेटून त्रास कमी करण्याचा प्रयत्न करावा. चार लोकांत फारसे वावरू नये, अन्यथा टिंगल होऊ शकते किंवा साधकाची बुद्धी विपरित होऊन तो त्यातूनही बुवाबाजी करू शकतो. असल्या अवस्थेत साधकाने स्वत:ला सांभाळायचे असते. कुंडलिनी जागृतीची ही मध्य अवस्था आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे अथवा त्याचा बाजार करण्याचे कारण नाही. अधिक साधना नेटाने चालू ठेवल्यास असले झटके आपोआप कमी होऊन ते शांत होतात. यावेळेस गरुडासन, धनुरासन, मत्स्यासन, भुजंगासन, शलभासन, नौकासन, पवनमुक्तासन अशी आसने केल्याने झटके बसण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. ध्यान व धारणा सतत चालू ठेवा. ध्यानात असल्यानंतर असल्या झटक्यांना आपोआप आवर बसून शरीराला कमी त्रास होतो. आता अधिक विद्युत चुंबकीय शक्ती उत्पन्न होऊन पुढील सर्प गती प्राप्त होत असते.

३) सर्पगती : साधनेच्या सातत्याने शरीरात अधिक मात्रेत विद्युतचुंबकीय शक्ती उत्पन्न होऊन त्याचे प्रक्षेपण आता सर्पासारख्या गतीत होत असते. शरीरात नसानसातून सर्प सरकत असल्याचा आभास होतो आणि साधक बेचैन होतो. काहींना तर त्यांच्या अंगाखांद्यावर सर्प खेळत असल्याचा भास होतो. आता सर्पदंश झाल्यासारखा अंगाचा दाहसुद्धा होऊ लागतो. शरीर अतिशय संतप्त होऊन शरीराचा दाह होत असतो. पण, उष्णतामापक यंत्र लावल्यास त्यात तपमान वाढलेले दिसत नाही. काहींना एक विचित्र अनुभव येत असतो. त्यांचे अर्धे अंग अती शीत तर अर्धे अंग अती उष्ण असे भासते. पण, शरीराचा दाह अती भासतो. तो असह्य वाटतो. शरीरातील मेद म्हणजे चरबी जळून शरीर रोड होत असते. अंगावर कोंडा तयार होऊन अंगावर भेगा अथवा सुरकुत्याही पडतात. कारण, नसताना चिडचिड उत्पन्न होत असते. पण, आपल्या मनाला सतत शांत ठेवयाचा साधकाने प्रयत्न करावा. संबंधित लोकांना आपल्या या अवस्थेची कल्पना दिल्यास व्यवहारात गैरसमज उत्पन्न होणार नाहीत. उठसूठ क्रोध आणि अशांतता उत्पन्न होत असते. बोलण्याचे लहान सहान प्रकारसुद्धा अती प्रचंड वाढून साधक संतापी व चिडचिडा होतो, याची जाणीव ठेवून साधकाने व्यवहार करायला हवा.

शरीर दाह व त्यावरील उपाय

स्वामी विवेकानंदांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांना असाच दाह झाला होता, असा त्यांच्या चरित्रात उल्लेख आहे, अशी परिस्थिती उत्पन्न झाल्यास साधकाने ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा सतत जप करावा. जमल्यास एका शुभ्र वर्णाच्या कांस्याच्या वाटीत पिण्याचे पाणी घेऊन ‘ॐ नमः शिवाय’चा मंत्र सतत जपावा. अध्येमध्ये जांभया येतात. तशा आल्यास पात्रातील पाण्यावर फुंकर घालून मग जप झाल्यावर ते फुंकर प्रभावित पाणी प्यावे. म्हणजे दाह कमी होऊ शकतो. कपालभाती प्राणायाम करावा. श्वास आत ओढून नंतर तो श्वास तीन झटक्यात शिंक आल्याप्रमाणे नाकातून झटक्याने आवाजकरून उच्छवास करावा, असे सकाळ-सायंकाळ २५-३० वेळा कपालभाती प्राणायाम केल्यास दाह कमी होऊ शकतो. सितोपलादी चूर्ण, प्रवाळ भस्म, वंशलोचन व गुळवेलसत्व अल्पमात्रेत दुधातून, गुलकंदातून अथवा मधातून सकाळ-सायंकाळ ग्रहण करावे. दाह कमी होईल, मद्यमांस इ. अखाद्य प्रकार वर्ज्य करावे. फळे, दूध, घरचे विरजलेले आंबट नसलेले दही खावे. त्यामुळे दाह कमी होऊन साधना सुरक्षित राहते.

४) विहंग गती : विहंग गती कुंडलिनी जागृतीतील शेवटची अवस्था होय. शरीरातील पेशीपेशीतील गुणाणुंची पुनर्रचना संपून सर्व गुणकण आता आवश्यक त्या उच्च उत्क्रांत सापेक्ष अवस्थेत स्थिरावले असतात. आता अपार शांतीचे साम्राज्य सुरू झालेले असते. घटाघटातील विद्युत चुंबकीय प्रवाह आता मंद व शांत झालेला असतो. त्यामुळे रक्तप्रवाह संथ व मंद झालेला असतो. शरीरातील सर्व विद्युत्कर्षण व्यवहार पूर्णत्वामुळे संयमित झालेला असतो. त्यामुळे आता साधकाचे शरीर, मन, बुद्धी व चित्त शांत झालेले असते. एखादा विहंग पक्षी चिमणीप्रमाणे फडफड न करता जसा शांतपणे पंख पसरून भयानक वेगाने इतस्ततः भ्रमण करीत असतो, तद्वत् साधकाचे शरीर वरून शांत पण व्यवहार अतिशय वेगाने विश्वाशी निगडित झालेले असतात. साधकाच्या असल्या वरवर शांत वाटणार्‍या, परंतु आतून विश्वाशी गतिमानतेने संलग्न असणार्‍या अवस्थेला धरून ऋषिमुनींनी ‘विहंग’ अवस्था असे यथार्थ नाव दिले आहे.

योगिराज हरकरे 
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.